वास्तवाच्या सुसंगतीचं भान बिघडतं तेव्हा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 06:45 AM2018-11-18T06:45:22+5:302018-11-18T06:50:02+5:30

वास्तवाची सुसंगत जाणीव असणे, ताणातही स्वत:ला सक्रिय ठेवणे आणि इतरांशी नाते जोडणे. या तिन्ही गोष्टी एखादी व्यक्ती योग्य रीतीने करीत असेल तर, ती स्वस्थचित्त आहे असे समजले जाते; मात्र ते जमत नसेल, तर त्या व्यक्तीला उपचारांची आवश्यकता असते.

what happen if accure inbalance in the sense of real. | वास्तवाच्या सुसंगतीचं भान बिघडतं तेव्हा.

वास्तवाच्या सुसंगतीचं भान बिघडतं तेव्हा.

Next


-डॉ. यश  वेलणकर

जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आरोग्याची व्याख्या ठरवताना त्याचे तीन निकष निश्चित केले आहेत. या तीनपैकी कोणताही एक निकष कमी असतो त्यावेळी त्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही असे म्हणतात. त्यातील पहिला निकष म्हणजे वास्तवाची सुसंगत जाणीव होणे हा आहे. अशी जाणीव असते त्यावेळी त्या व्यक्तीला तिचे नाव, गाव माहीत असते. आपण कोठे आहोत, काय करीत आहोत याचे भान तिला असते. ती व्यक्ती जे काही पाहते, ऐकते, अनुभवते त्याचा तिने लावलेला अर्थ सुसंगत असतो. 

स्वास्थ्याचा दुसरा निकष म्हणजे परिस्थितीतील तणावांना सामोरे जाताना ती व्यक्ती स्वत:ला उत्साही आणि सक्रि य ठेवू शकते.

तिसरा निकष अन्य व्यक्तींशी संवाद साधून नाते जोडणे हा आहे. हे तीनही निकष महत्त्वाचे आहेत. त्यातील कोणताही एक कमी असतो त्यावेळी त्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही, तिला कोणता तरी मानसिक आजार आहे, असे म्हटले जाते.

यातील पहिला निकष धोक्यात येतो, म्हणजे वास्तवाचे भान सुसंगत नसते त्यावेळी स्किझोफ्रेनिया नावाचा आजार असू शकतो. रस्त्यावर फाटक्या कपड्यात फिरणारे, आपले नाव, गाव सांगू न शकणारे बर्‍याचदा या आजाराचे रुग्ण असतात. मुले, माणसे त्यांची वेडा म्हणून चेष्टा करतात ही अतिशय क्रूरता आहे. या रुग्णांना योग्य उपचार मिळाले तर त्यांचा आजार कमी होतो, ते स्वत:चे नाव, गाव सांगू शकतात. 

यावर्षी मॅगसेसे पारितोषिक मिळालेले मुंबईतील डॉक्टर भरत वासवानी अशा रस्त्यावर फिरणा-या रुग्णांना उपचार देऊन त्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्याचे अवघड  कार्य करीत आहेत. स्किझोफ्रेनियाला मराठीत छिन्नमनस्कता म्हणतात. याचे कारण त्या रु ग्णांना जो अनुभव येतो, जाणीव होते, ती सुसंगत नसते, छिन्नभिन्न असते. म्हणजे असा आजार झालेली व्यक्ती हातात लाडू घेऊन खात असेल तर दोन घास खाल्ल्यानंतर अचानक तिला आपल्या हातात दगड आहे असे वाटते आणि ती तो फेकून देते. 

वास्तवाची सुसंगती बिघडल्यामुळे असे होते. हा आजार असलेल्या व्यक्तीला आपल्याशी देव, मृत व्यक्ती किंवा वस्तू, झाडे बोलतात असे वाटते. त्यांचे आवाज त्यांना ऐकू येतात, तशी दृश्ये त्यांना दिसतात. समोर कुणीच नसते; पण ‘कुणीतरी आहे तेथे’ असे त्यांना वाटत राहाते. या आजाराचे अधूनमधून झटके येऊ शकतात. म्हणजे काहीकाळ ही व्यक्ती नॉर्मल असते आणि काहीकाळ या आजाराने ग्रस्त असू शकते. या आजाराचे अनेक प्रकार आहेत आणि वैद्यकीय उपचारांनी हा आजार आटोक्यात ठेवता येतो.

हा आजार तीव्र असतो त्यावेळी त्या रु ग्णाला औषधोपचार आणि काहीवेळा इलेक्ट्रिक शॉक थेरपी आवश्यक असते. त्यावेळी त्या रुग्णाला माइण्डफुलनेस थेरपीचा उपयोग होत नाही. पण आजार तीव्र नसतो, ती व्यक्ती स्वत:चे लक्ष स्वत:च्या इच्छेने पुन:पुन्हा वर्तमानातील कृतीवर किंवा नैसर्गिक श्वासाच्या हालचालींवर आणू शकते त्यावेळी माइण्डफुलनेस थेरपीचा उपयोग होऊ शकतो.

ही थेरपी मिळाली तर या रुग्णांचे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागण्याचे प्रमाण कमी होते, भावनिक अस्वस्थता कमी होते आणि वास्तवाचे भान वाढते असे संशोधनात दिसत आहे. हा मानसिक आजार झालेली व्यक्ती आपले आयुष्य आनंदाने जगू शकते, असामान्य कर्तृत्व दाखवू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे नोबेल पारितोषिक विजेते डॉ जॉन नॅश हे आहेत. त्यांच्या आयुष्यावर ‘ब्यूटिफुल माइण्ड’ नावाचा सुंदर सिनेमा असून, त्याला 2001 साली ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

गणितामध्ये आणि अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचे संशोधन करणा-या जॉन नॅश यांना त्यांच्या वयाच्या तिसाव्या वर्षी स्किझोफ्रेनियासाठी उपचार घ्यावे लागले. त्यापूर्वी त्यांना आपल्याला रशियाच्या केजीबीच्या गुप्तहेरांनी वेढले असून, ते आपाल्याला ठार करण्याचा कट रचत आहेत असे वाटू लागले. ते अस्वस्थ, भयग्रस्त राहू लागले. गणित विषयातील व्याख्याने देत असताना त्यांचे बोलणे असंबद्ध आणि विसंगत होत आहे असे त्यांच्या सहका-याना जाणवू लागले. अखेर त्यांना मेण्टल हॉस्पिटलमध्ये दाखल करून शॉक ट्रीटमेण्ट द्यावी लागली. दहा वर्षे हॉस्पिटलमध्ये अधून-मधून राहावे लागल्यानंतर पत्नीचे प्रेम, सहकारी मित्नांचा आधार आणि गणित, अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास यामुळे त्यांचा त्रास कमी झाला. अर्थशास्त्नातील गेम थिअरीमधील कूट समस्या सोडवल्याबद्दल त्यांना 1995 साली नोबेल पारितोषिक मिळाले. त्यानंतर केलेल्या एक भाषणात ते म्हणतात, मला अजूनही रशियाचे हेर दिसतात, पण ती खरी माणसे नसून मला होणारा भास आहे हे माझ्या लगेच लक्षात येते. त्यामुळे त्यांची भीती मला वाटत नाही.
मानसिक स्वास्थ्याचा दुसरा निकष औदासीन्य म्हणजे  डिप्रेशन, चिंतारोग, पॅनिक अटॅक, फोबिया, आघातोत्तर तणाव, मंत्रचळ हे वेगवेगळे त्रास असताना त्या व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते. सतत अस्वस्थता राहाते. स्वमग्नता म्हणजे ऑटिझम असेल तर दुसर्‍या व्यक्तीशी नाते जोडता येत नाही. म्हणजेच मानसिक स्वास्थ्याचा तिसरा निकष अपुरा ठरतो. या सर्व प्रकारच्या त्नासात माइण्डफुलनेस थेरपी म्हणजे सजगता उपयोगी ठरते. कारण सजग होण्याच्या सरावामध्ये परिस्थितीचे भान, भावनांचे नियमन आणि अन्य व्यक्तींविषयी कृतज्ञता याचेच प्रशिक्षण माणसाला मिळत असते. त्यामुळे हा सराव करणार्‍या निरोगी व्यक्तीला मानसिक आजार होण्याची शक्यता खूप कमी असते. मानसिक अस्वास्थ्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रत्येक सुजाण व्यक्तीने सजगता अंगीकारायला हवी, तिचा प्रसार करायला हवा.

आपल्याला दिसणारे दृश्य खरेच असेल असे नाही !

नोबेल पारितोषिक विजेते प्रसिद्ध गणिती आणि अर्थशास्त्नज्ञ डॉ. जॉन नॅश यांना त्यांच्या तरुणपणी स्किझोफ्रेनिया या आजाराने ग्रासले होते. रशियाचे केजीबीचे गुप्तहेर आपल्याला ठार करण्याचा कट रचत आहेत असे त्यांना वाटायचे. यासंदर्भात डॉ. जॉन नॅश यांनी त्यांचा जो अनुभव शब्दबद्ध केला आहे, नेमके तेच माइण्डफुलनेस थेरपीमध्ये शिकवले जाते. नॅश यांनी माइण्डफुलनेस थेरपी घेतली असण्याची शक्यता नाही. कारण ही थेरपी या आजारासाठी गेल्या दहा वर्षांत वापरली जाऊ लागली आहे. नॅश यांनी त्यांच्या अनुभवातून जे जाणले त्याचाच अनुभव माइण्डफुलनेस थेरपिस्ट रुग्णांना देते. सतत विचारात भरकटणारे मन कृतीवर आणायचे. चालताना, जेवताना, अंघोळ करताना लक्ष वर्तमानात आणण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करायचा याची रुग्णांना आठवण करीत राहाणे ही थेरपिस्टची जबाबदारी असते. त्याचबरोबर मनात येणारे शब्द, ऐकू येणारे आवाज आणि दिसणारी दृश्ये हे सर्व विचारांचेच प्रकार आहेत आणि मनातील विचार हे खरे असतातच असे नाही याची जाणीव होणे महत्त्वाचे असते. विचारापासून स्वत:ला अलग करण्याचे कौशल्य विकसित झाले की त्यामुळे जे काही दिसते आहे, ऐकू येते आहे ते सत्य नसून भास आहे याचे भान रु ग्णाला येऊ लागते आणि त्याचा त्रास कमी होतो.

(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)

manthan@lokmat.com

Web Title: what happen if accure inbalance in the sense of real.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.