- अंजली पाटील

हिंदीसह सहा प्रादेशिक भाषांतील सिनेमांमध्ये आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवत स्वत:च्या शोधात खोल उतरू पाहणारी अभिनेत्री अंजली पाटील. ‘ना बंगारु थल्ली’ या तेलुगु सिनेमासाठी तिला विशेष राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘विथ यू विदाउट यू’ या श्रीलंकन सिनेमामध्ये तिनं स्वत:साठी सिंहली भाषेत डबिंग केलं. तिथेही अभिनयाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार तिनं पटकावला. आता भारतातर्फेआॅस्करवारीत पाऊल ठेवलेल्या ‘न्यूटन’मधली तिची भूमिका लक्ष वेधून घेतेय. अंजलीशी मारलेल्या या गप्पा..

अभिनयच करायचा ठरलं होतं?

नाशिकमध्ये मी अकरावी-बारावी सायन्समधून केलं. तोवर नाटक वगैरे काही करायला मिळालं नव्हतं. मी अतिशय अभ्यासू मुलगी होते. शिवाय शेंडेफळ. गोष्टी सांगून स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याची कला होती. सगळ्यांची इच्छा मी डॉक्टर व्हावं अशी होती, मात्र बारावीनंतर पुणे विद्यापीठात, ललित कला केंद्रात अभिनयाचं शिक्षण घ्यायला सुरु वात केली. तिथं मी लाईट व सेट डिझाइन करायचे, असिस्ट करायचे. त्यावेळी जाणवायचं की अभिनेत्री म्हणून जे क्षेत्र आहे ते थोडं मर्यादित पडतं, मात्र दिग्दर्शक म्हणून खूप बाजू पाहाव्या लागतात. त्या कुठल्या कुठल्या बाजू असतात हे जरा पाहून घेऊ, करून बघू म्हटलं... एनएसडीच्या त्यावेळच्या आमच्या ज्या डिरेक्टर होत्या त्यांच्याकडे मी हट्टच धरला की मला दिग्दर्शनच शिकायचं आहे. बाहेरून बघताना एक आलेख बघतात माणसाचा तर तसं माझ्याबाबतीत एक सूत्र दिसतंय असं नाहीये. त्याची ही कारणं!

आणि तुझा तजेलदार सावळा रंग...

तेवढ्यानं भागत नाही. पुढे नंदिता दास, स्मिता पाटील नि अशी नावं सावळेपणाशी जोडून व मला त्यात गोवून विचारले जाणारे प्रश्न मला खूप बोअर करतात. ‘त्या’ माणसांनी त्यांच्या त्यांच्या काळात कामं केली, ती थोर आहेतच, मात्र मी नेहमीच ही खंत व्यक्त करत आलेय की माझं काम अंजली पाटील म्हणून का बघितलं जाऊ नये? माझा सावळा रंग किंवा मी जे वेगळे रोल निवडतेय, त्यावरून तुम्ही सगळं आखून घेऊ नका! कलेच्या वाटेतून जाताना मी स्वत:ला शोधण्याचा जो प्रयत्न करतेय त्यात असं ढोबळ मतप्रदर्शन अन्यायाचं वाटतं मला. आणि जेव्हा कुठलीही समीक्षा केली जाते, मग ती साहित्यिकाची असो, चित्रकाराची असो, तेव्हा जर पूर्वसुरींशी तुलना केली गेली तर मग समीक्षक किंवा विचारवंतांच्या बाजूने झालेला तो आळस असतो असं काही मी वाचलं नुकतंच. संबंधित व्यक्तीच्या गुणांना तुम्ही पूर्णत: बघू शकत नाही तेव्हा इतर गोष्टींचा आधार घेऊन रेटलं जातं. ती व्यक्ती काहीतरी वेगळं करू पाहत असते तिकडं लक्ष द्यायला काय बरं आड येतं? तर लेबल्स नको! अजून कुणीतरी पुढे स्मिता, नंदिता नि अंजली सारख्यांची आठवण ‘अमुक’चं काम पाहताना येते असं लिहील... हे त्रोटक व मर्यादित असतं.

वेगळ्या भाषांमध्ये काम सुरू करताना कम्फर्ट झोन मोडण्याची भीती वाटली?

मला कम्फर्ट झोन म्हणजे काय हे ठाऊकच नाहीये... मी कुठं कम्फर्टेबल आहे असं मी स्वत:ला विचारलं तर मी कोणत्याही नव्या कामात विचलित झाले नाहीये असं माझ्या लक्षात येतंय. जे समोर आलं, ते हेड आॅन करत गेले. तेलुगु फिल्म मिळाली तेव्हा ती त्याच वेळी मल्याळममध्येही बनत होती. दोन्ही भाषा येत नव्हत्या. शिकले. राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्या रोलसाठी. श्रीलंकन फिल्मसाठी मी स्वत: सिंहली भाषेत डब केलं ही माझ्यासाठी व या देशासाठीही महत्त्वाची गोष्ट होती. माझ्यासमोर असं कुठलंही स्पेसिफिक ठिकाण नव्हतं व नाही जे मला गाठायचंच आहे. ज्या- ज्या गोष्टी समोर येत गेल्या त्यातून माझ्या कलाकार असण्याच्या शक्यता मी शोधत गेले. कलाकार म्हणून माझ्या काही मर्यादा असणार होत्या. प्रत्येक प्रोजेक्टगणिक माझ्या याबाबतीतल्या कक्षा मी शोधत, रुंदावत गेले. बांधून घेतलं नाही. एक उदाहरण सांगते, रजनीकांत यांच्याबरोबरची फिल्म आहे हातात, तर आता विचारणारे विचारतात की अगं तू ‘इंडिपेंडंट फिल्म्स करणारी. कमर्शिअल करणं बरोबर आहे का? - आता ‘समांतर’ नाही म्हणत, ‘इंडिपेंडंट’ म्हणतात. माझं उत्तर हे की ज्यात मला मजा येईल ते मी करणार. बहुधा पुढच्या वर्षात मी दिग्दर्शित केलेली फिल्म येईल. तेव्हा विचारलं जाईलही, अगं तू तर अभिनेत्री! दिग्दर्शक कशी झालीस?

दिग्दर्शक म्हणून सर्जनशक्यता अधिक आहेत की अभिनेत्री म्हणून?

सध्या माझ्याकडे येणाऱ्या संधी अभिनयासाठी म्हणून येताहेत. माझ्यासाठी आनंद खूप महत्त्वाचा. त्यातली गंमत मी पडताळून पाहतेय व पाहीनही. कुठल्याही कामातून नवं काय शिकता, साठवता येईल हे मी खूप बघत असते. सेटवर असताना मी अभिनय करतेय, तर त्याक्षणी दिग्दर्शनासाठी उत्सुक असा माझा मेंदू पूर्णपणे बंद असतो असं होत नसतं. जेव्हा मी दिग्दर्शकाबरोबर कुठलंही काम करते तेव्हा कोलॅबरेटर असते, फक्त अभिनेत्री नव्हे. मी सिनेमा करते इन टोटॅलिटीमध्ये! सध्या अभिनयात मजा येतेय. काही आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट आहेत, त्यांच्या स्क्रीप्टवर मी लेखक म्हणून काम करतेय. बऱ्याचशा स्क्रीप्टवर विश्लेषक म्हणून मी मदत करतेय. माझीही एक स्क्रीप्ट लिहिणं चालूय. कविता सुचतात कुठंतरी सेटवर असताना तेव्हा त्या अभिनेत्री किंवा दिग्दर्शक म्हणून सुचत नसतात ना! दिसतं ते उतरतं हातून.

अभिनय व दिग्दर्शन याचप्रमाणे भटकणं हीसुद्धा तुझी पॅशन आहे का?

अभिनय किंवा दिग्दर्शन जसा माझ्या आयुष्यातला एक भाग आहे तसंच भटकणंही. जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तुम्ही निरनिराळ्या माणसांना भेटता. वेगवेगळ्या कहाण्या ऐकता. एखाद्या कष्टानं पिचलेल्या बाई किंवा बुवाची मुलांना वाढवण्यातली तगमग पाहता. एखादा चहावाला तुम्हाला सांगतो की त्याच्या मागच्या दहा पिढ्या इथंच जगल्या नि हे छोटंसं शहर सोडून तो कधीच बाहेर पडलेला नाहीये. दिल्ली, मुंबई त्याच्यासाठी लंडन-पॅरिससारखं आहे. असं आहे ते. पॅशन म्हटलं तर त्यासोबत न्याय होत नाही. शब्द गहन अर्थ घेऊन येतात. फिरणं, लोकांना भेटणं, त्यांच्या जाणिवा, त्यांच्या जखमा, त्यांना कशात आनंद मिळतो हे समजून घेणं ही माझ्यासाठी जीवनशैली आहे. अशाच पद्धतीनं मी माणूस म्हणून विकसित होऊ शकते.

‘चक्र व्यूह’मध्ये तू नक्षली लीडर म्हणून दिसतेस, तर ‘न्यूटन’मध्ये नक्षली गावातली प्रत्यक्षदर्शी. अभिनयातून यात फरक करताना काय अभ्यास असतो?

बऱ्याचदा गोष्टी स्पष्ट होतात त्या स्क्रीप्टमधून. त्यासाठी वापरलेले कपडेही महत्त्वाचे. शिवाय त्याहून वेगळ्या घटना असतात गाठीशी. माझ्यासाठी माझी जी काही तयारी असते ती जगण्यातूनच होत गेलीय. माझ्या आईवडिलांनी दिलेल्या नावासह मी जेव्हा जगात वावरत असते, त्यावेळी जे बघत असते ते माझ्या तयारीचं रूलबुक किंवा बायबल म्हणता येईल. पुणे विद्यापीठात पाऊस पडताना एकटीच छत्री घेऊन महिना महिना रुटिन जगातून मी गायब होत असे... या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं तुमच्या कामात येतात. ‘चक्रव्यूह’मध्ये नक्षल लीडर म्हणून मी मारधाड करते किंवा दंडकारण्यातील नक्षली भवतालात राहणारी डिग्नफाईड, पण मातीशी जोडलेली, नाजूक नि भेदरलेलीही मुलगी असते. काही कौशल्यं तुम्हाला अवगत करून घ्यावीच लागतात. बंदूक कशी चालवायची, त्या-त्या पात्राची भाषा कशी वापरायची वगैरे. मात्र मानसिक किंवा भावनिक गोष्टींचा अभ्यास सतत चालू असतो. यासाठी रविवार नसतो, सुटी नसते. बऱ्याचदा मी स्वप्नसुद्धा तसेच बघते. कलाकार म्हणून तुम्ही किती उमदं जगू शकता यासाठी बॅक आॅफ दि माइंड विचार चालू असतो. पोटापाण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावंच लागणार. त्यासाठी खूप सारे पर्याय आहेत माझ्याकडे. मी शिक्षिका होऊ शकते, नाटक शिकवू शकते, अभिनय शिकवू शकते. दिग्दर्शन, लेखन पाचवी-सहावीपासून करतेय. कथा, कविता चालूहेत. गुंतागुंतीची प्रक्रिया आहे एक कलाकार असणं. मामाच्या गावी जाणं असेल, तुमच्या हक्कासाठी शाळेत झालेलं एखादं भांडण असेल, मासिक पाळीच्या वेळेस युनिफॉर्मवर पडलेल्या रक्ताच्या डागामुळं लाज वाटण्याचा प्रसंग असेल, मग त्यानंतरचं स्वत:ला समजावणं की हे सगळ्यांनाच होतं, मी का लपवावं? - तर या छोट्याछोट्या गोष्टी कुठंतरी नेणिवेत आहेत, ती एकच एक अशी गोष्ट नव्हे जी मला ‘सायलेन्स’सारख्या सिनेमात उपयोगी पडली किंवा कुणीतरी कधीतरी वाईट स्पर्श केलेला असतो तो मला उपयोगी पडला! ड्रामा स्कूलमध्ये मी इतकी वर्षं आहे म्हणून ते माझ्यातून उमटतं असंही नाहीये! ही प्रक्रिया खूप लहानपणापासून चालू होती किंवा आहे आणि ती शेवटच्या श्वासापर्यंत चालत राहणार आहे.

समाजातील महत्त्वाच्या किंवा दुर्लक्षित घटकांचा प्रतिनिधी म्हणून ‘कॅरेक्टर’ निभावल्यावर ती बांधिलकी मानून बाह्य जगात प्रतिक्रि या देणं भाग पाडलं तर?

हे खूप सबजेक्टिव्ह आहे, खूप व्यक्तिगत आहे, प्रत्येकाचंच. प्रत्येकजण आपली समाजाशी बांधिलकी आपापल्या परीने व कुवतीने जपत असतो, व्यक्त करत असतो. कलाकारावर ती लादली गेली नाही पाहिजे. प्रत्येक फिल्म ज्वलंत विषयावर किंवा समाजोपयोगी विषयावर नाही येऊ शकत. अशी मागणी झाली तर तुम्ही माझा कलाकार म्हणून हक्क हिरावून घेत असता. कलाकार म्हणून मी माझी एखादी कृती दिग्दर्शित करते किंवा अभिनित करते किंवा कविता लिहिते तेव्हा मला काहीतरी बोलायचं, सांगायचं असतं म्हणून घडतं. म्हणून मी अ‍ॅक्ट करते.

तेलुगु फिल्ममध्ये सेक्स ट्राफिकिंगमध्ये अडकलेल्या किशोरवयीन मुलीचा रोल केला. तो माझा अधिकार आहे नि स्वातंत्र्यही हे लक्षात घ्या. ‘यातलं’ अमुक इतकं तुम्हाला माहितीच हवं नि तुम्ही बोलायलाच हवं ही मागणी बळजबरी होते. बळजबरीतून परिपक्व कृती होत नसते.