Use when needed | गरज तेव्हा वापर

- डॉ. राजन भोसले 

कण्डोमच्या वापराचा प्रश्न थेट स्त्रियांच्या आरोग्याशीही संबंधित आहे. गर्भनिरोधक गोळ्या किंवा तांबी हे सारं स्त्रियांना त्रासदायकही ठरू शकतं. पुरुषानेच त्याचा वापर करणं सोयीचं. मात्र त्याऐवजी केवळ लैंगिक सुखदर्शक गुदगुल्या करत उत्तान जाहिरातींनी मूळ हेतूलाच हरताळ फासायला सुरुवात केली.

ज्यांच्यावर बंदी घालण्यात आली त्या कण्डोमच्या जाहिराती लोकशिक्षण करतात? की लोकांना फक्त उत्तेजित करतात? मला वाटतं सध्या दाखवल्या जात असलेल्या जाहिराती, त्यांचं चित्रिकरणं, त्यातले दृश्य हे सारं कण्डोम वापराविषयी माहिती देणं, जनजागृती करणं यापासून कोसो दूर आहे. मुळात कण्डोमच्या जाहिरातीत सनी लिओनीची गरज काय? कारण या जाहिराती ‘टिटिलेटिंग’ आहेत. म्हणजे काय तर लैंगिक भावना हलक्याच चाळवणं किंवा त्या भावनेच्या गुदगुल्या करणं हा त्यांचा उद्देश असल्यासारखं त्यांचं दृश्यरूप आहे.
हा (आणि हाच) या जाहिरातींचा मुख्य किंवा मूळ हेतू आहे का? आणि असेल तर माझाही त्यांच्या प्रक्षेपणाला आक्षेप आहे. कण्डोमच्या जाहिराती करण्याला आणि त्या टीव्हीवरून कधीही दाखवण्याला मात्र आक्षेप नाही, मात्र ‘या अशा’ जाहिरातींना नक्कीच आहे. त्याचं कारण असं की, कण्डोम हे तुम्ही एक प्रॉडक्ट म्हणून जर विकणार असाल तर ते प्रॉडक्ट नेमकं काय आहे, त्याच्या गुणात्मक बाजू, त्यांचा दर्जा याविषयी बोला. त्या उत्पादनाची ‘गरज’ आणि योग्य वापराची माहिती द्या. त्यातून समाजाला ते उत्पादन वापरणं ‘आवश्यक’ आहे असं वाटलं पाहिजे. ते न होता केवळ लैंगिक सुखदर्शक गुदगुल्या या जाहिराती करत असतील तर त्या जाहिरातींचा मूळ हेतूच साध्य होत नाही.

कण्डोम वापरणं हे काही लपूनछपून बोलण्याची गोष्ट नाही. किंवा त्यात दडवावं असं काही नाही. अगदी मुलांना लैंगिक शिक्षण देतानाही त्याविषयी मोकळेपणानं बोलत शास्त्रीय माहिती द्यायला हवी. कण्डोमची गरज, त्याचा वापर करण्याची सुयोग्य रीत, त्यातली सुरक्षितता हे सारं मुलांशीही बोलण्यात काही गैर नाही. अगदी जाहिरातीतूनही ही शास्त्रीय माहिती दाखवली गेली तर त्याविषयीचं अज्ञान आणि धास्ती कमी होऊ शकेल. आणि मग अशा जाहिराती कुठल्याही वेळी दाखवायला काहीच हरकत नाही. मात्र हे न करता फक्त ‘गुदगुल्या’ करत जाहिरात करण्यानं कण्डोम वापराच्या जनजागृतीचा मूळ हेतूच साध्य होत नाही. जाहिराती दाखवण्यातही तारतम्य असावं, जाहिरातींचा कण्टेण्ट पाहणारं काही सेन्सॉरसारखी नियमन संस्था असेल तर त्यांनी या साऱ्याचा विचार करायला हवा. ते न होता या जाहिराती भलतंच काही दाखवत असतील तर त्यानं जनजागृतीच्या हेतूला हरताळ फासला जातो.

आणि कण्डोम वापराची आणखी एक बाजू म्हणजे स्त्रीच्या आरोग्याचा विचार. तो विचार आपल्या समाजात केला जात नाही. स्त्रियांनी गर्भनिरोधक साधनं वापरणं हे तसं आरोग्यासाठी फार सोयीचं नाही. अनेकजणी गर्भनिरोधक गोळ्या घेतात. पती बाहेरगावी राहत असेल आणि महिन्यातून दोन-चारदा किंवा अगदी एकदा जरी शरीरसंबंध होणार असेल तर महिनाभर ठरावीक वेळेस गोळी घ्यावीच लागते. त्या हार्मोन्सच्या गोळ्या असतात. त्या सतत घेतल्याचा शरीरावर परिणाम होतोच. तेच तांबी बसवण्याचंही. त्यानं काही स्त्रियांना रक्तस्राव होऊ शकतो. बाजारात मिळणाऱ्या आयपीलसारख्या गोळ्या, त्या ही हार्मोन्सच्याच. अपत्यप्राप्ती अपेक्षित नसेल तर त्या ही स्त्रियांनाच घ्याव्या लागतात. मात्र कण्डोमचं तसं नाही. शरीरसंबंधापुरता त्याचा वापर करता येतो, त्याचा आरोग्यावर अगर लैंगिक सुखावर काहीही परिणाम होत नाही. शिवाय सुरक्षित संबंधाचीही खात्री राहते. त्यामुळे मी नवविवाहित जोडप्यांनाच काय; पण लग्न होऊन अनेक वर्षं झालेल्या जोडप्यांनाही कण्डोम वापरण्याचा सल्ला देतो. शरीरसुखाच्या आनंदाआड हा वापर येत नाही हे पुरुषांनीही समजून घ्यायला पाहिजे.
त्यामुळे कण्डोमचा वापर, त्याविषयी जनजागृती व्हायला पाहिजे. ती जाहिरातींनी केली, जनमानसापर्यंत माहिती पोहचवली तर त्यात अडचण काहीच नाही. मात्र त्या जाहिरातींनीही थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे!

(लेखक सुप्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट आहेत.) शब्दांकन -मंथन टीम