सुप्त मन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 06:01 AM2018-12-09T06:01:00+5:302018-12-09T06:05:02+5:30

कोणाला पटकन काही बोलायचे नाही, चिडायचे नाही, रागवायचे नाही, उद्धट प्रतिक्रिया द्यायची नाही.. असे बरेच काही आपण ठरवत असतो. असे वागणे चुकीचे आहे, हेही आपल्याला कळते; पण वळत नाही. का होते असे?

The unconscious mind is a reservoir of feelings, thoughts.. | सुप्त मन

सुप्त मन

Next
ठळक मुद्देआपल्या बऱ्याच भावना सुप्त मनातूनच जन्म घेत असतात. त्या प्रकट होतात त्याचवेळी जागृत मनाला समजतात.

- डॉ. यश वेलणकर

अनेक गोष्टी आपल्या बुद्धीला पटत असतात; पण कृतीत येत नाहीत. पटकन रागवायचे नाही, अंध प्रतिक्रि या द्यायची नाही, योग्य प्रतिसाद निवडायचा अशा अनेक गोष्टी आपल्याला मान्य असतात.
भाषण करण्यात घाबरण्यासारखे काय आहे, झुरळ पाहून दचकण्यासारखे काहीही नाही हेही पटलेले असते; पण प्रत्यक्षात तो प्रसंग येतो त्यावेळी प्रतिक्रि या दिली जाते, भीती वाटते, राग येतो. हे असे का होते? याचा आधुनिक मानसशास्त्राचे जनक डॉ. सिग्मंड फ्रोईड यांनी शोध घेतला आणि सुप्त मनाचा सिद्धांत मांडला.
आपल्याला ज्याची जाणीव असते ते जागृत मन सर्वांना परिचित आहे. पण ज्याची जाणीव नसते असाही मनाचा भाग असतो ते सुप्त मन. हे खूप शक्ती असलेले असते, आपले वागणे ते नियंत्रित करते आणि बऱ्याच मानसिक आजारांचे कारण या सुप्त मनात असते. तेथे जे काही साठवले गेले आहे ते बदलण्यासाठी फ्रोईड यांनी मनोविश्लेषण ही मानसोपचारपद्धती सुरू केली.
ही सुप्त मनाची संकल्पना योग्य आहे असे मेंदूच्या आधुनिक संशोधनात दिसत आहे. माणसाच्या भावनिक मेंदूतील अमायग्डला नावाचा अवयव सक्रि य होतो, प्रतिक्रिया करतो त्याचा परिणाम म्हणून शरीरात युद्धस्थिती निर्माण होते. त्यामुळेच माणसाला राग येतो किंवा भीती वाटते. कोणताही धोका आहे हे जाणवलं की हा अमायग्डला प्रतिक्रि या करतो.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने अमायग्डलाची प्रतिक्रिया किती वेळात होते हे मोजता येऊ लागले आहे. शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, एखादी गोष्ट काय आहे याचे बुद्धीला आकलन होण्यापूर्वीच अमायग्डलाला त्याचे आकलन होते आणि तो प्रतिक्रि या करतो. यासाठी विविध प्रयोग शास्त्रज्ञ करीत आहेत. अशाच एका प्रयोगात त्यांनी काही चित्रे माणसांना दाखवली. ही चित्रे कसली आहेत हे ओळखणारा मेंदूतील भाग किती वेळात सक्रि य होतो ते नोंदवले. आपल्या स्मृतीच्या पूर्वानुभवावर आणि ते चित्र किती परिचयाचे आहे त्यावर हा वेळ अवलंबून असू शकतो. काहीवेळा तो पन्नास ते शंभर मिलिसेकंद इतकाही असतो. भयंकर सापाचे चित्र ओळखायला साधारण तीस मिलिसेकंद लागतात; पण सापाचे चित्र दाखवल्यानंतर अमायग्डलाची प्रतिक्रि या मात्र अधिक जलद असते. ते चित्र दृष्टीसमोर आल्यानंतर फक्त दहा मिलिसेकंदात अमायग्डला प्रतिक्रि या करतो. एक मिलिसेकंद म्हणजे सेकंदाचा एक हजारावा भाग हे लक्षात घेतले की ही प्रतिक्रि या किती त्वरित होते ते आपल्या लक्षात येईल. हा साप आहे हे जागृत मनाला समजण्यापूर्वीच सुप्त मनाने म्हणजे जागृतीच्या पलीकडील मनाने त्याला प्रतिक्रिया केलेली असते. अशा प्रतिक्रियेनेच आपले अनेक विचार निर्माण होत असतात. थिंकिंग फास्ट अ‍ॅण्ड स्लो या पुस्तकात डॅनिएल कोहमन या नोबेल विजेत्या संशोधकाने याच दोन प्रकारच्या विचारप्रक्रि यांचा ऊहापोह केला आहे. सुप्त मनात साठलेल्या गोष्टींमुळेच अनेक कृती आपण करीत असतो. त्यामुळेच बºयाचदा कळते पण वळत नाही. बुद्धीला जे पटते ते जागृत मनाला पटलेले असते पण सुप्त मनापर्यंत ते पोहोचतच नाही. त्यामुळेच तंबाखू वाईट आहे हे बुद्धीला पटूनदेखील ती पटकन सुटत नाही.
यासाठीच मनात येणारे भीतिदायक विचार बदलायचे असतील किंवा नखे खाण्यासारख्या कोणत्याही सवयी बदलायच्या असतील तर सुप्त मनापर्यंत पोहोचायला हवे.
मेंदूला हे ट्रेनिंग देण्यासाठी प्रत्यक्ष सराव करायला हवा, केवळ माहिती उपयुक्त नाही. कारण केवळ माहिती सुप्त मनापर्यंत पोहोचतच नाही. विपश्यना शिबिरामध्ये हाच सराव करून घेतला जातो; पण ज्यांना काही मानसिक त्रास आहे अशा व्यक्ती दहा दिवसांचे शिबिर पूर्ण करू शकत नाहीत. अनेक निरोगी माणसे शिबिर करतात; पण नंतर सराव करीत नाहीत. माइण्ड फुलनेस थेरपीमध्ये मात्र पाच मिनिटे, दहा मिनिटे असा सराव करायला प्रवृत्त केले जाते. विचारांची सजगतादेखील वाढवली जाते. त्यामुळेच चिंता, भीती, औदासीन्य असे त्रास असलेल्या व्यक्तीदेखील याचा उपयोग करून सुप्त मनापर्यंत पोहोचू शकतात आणि ‘कळते पण वळत नाही’ ही स्थिती बदलू शकतात.

जागृत मन आणि अंतर्मन
एखादी गोष्ट, कृती, स्थळ धोकादायक आहे हे अमायग्डलामध्ये साठवले गेलेले असते आणि जागृत मनाला समजण्यापूर्वीच तो प्रतिक्रि या करतो. सुप्त मन जागृत मनापेक्षा खूप मोठे आहे, अधिक ताकदीचे आहे हे फ्रोइड यांचे मतदेखील खरे आहे असे दिसते आहे. जो विचार आपल्याला जाणवतो त्याला आपण जागृत मन म्हणतो. हत्ती हा शब्द वाचला की तुम्हाला हत्ती आठवतो, तो तुम्ही कधी पाहिला होता तो एखादा प्रसंगही आठवतो. म्हणजे आता हत्ती तुमच्या जागृत मनात आहे, इतका वेळ तो सुप्त मनात होता. म्हणजेच जागृत मन खूप छोटे आहे, सुप्त मनात मात्र बरेच काही आहे. माणूस पाहातो, ऐकतो, वाचतो यामधून माहिती मिळत असते. त्याचवेळी काहीतरी आठवत असते, शरीरात काहीतरी जाणवत असते; पण हे सर्व जागृत मनाला समजत नसते. आपले लक्ष जेथे असते तेवढेच जागृत मनाला समजते. अन्य सर्व प्रक्रि या सुप्त मनात होत असतात. शरीरातील अनेक क्रि या, रक्तदाब, हृदयाचा वेग, श्वासाची गती, आतड्यांची हालचाल ही सुप्त मनाने नियंत्रित होत असते. आपल्या बऱ्याच भावना सुप्त मनातूनच जन्म घेत असतात. त्या प्रकट होतात त्याचवेळी जागृत मनाला समजतात. चिंता, भीती, राग, वासना, व्यसने या सर्वांचे मूळ सुप्त मनात आहे.

(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)

manthan@lokmat.com

Web Title: The unconscious mind is a reservoir of feelings, thoughts..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.