संपूर्ण भारत पालथा घालण्याचा बेत आखणा-या संगीता श्रीधर यांना काय संदेश द्यायचाय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 03:00 AM2018-08-12T03:00:00+5:302018-08-12T03:00:00+5:30

संगीता श्रीधर.या अनिवासी भारतीय बाई आज मुंबईहून गुजरातच्या दिशेने रवाना होणार आहेत. एकटीने गाडी चालवत 150 शहरं आणि 24,000 किलोमीटर्सचा प्रवास करून संपूर्ण भारत पालथा घालण्याचा बेत त्यांनी आखला आहे.

Traveling around the country on a clean India trail | संपूर्ण भारत पालथा घालण्याचा बेत आखणा-या संगीता श्रीधर यांना काय संदेश द्यायचाय?

संपूर्ण भारत पालथा घालण्याचा बेत आखणा-या संगीता श्रीधर यांना काय संदेश द्यायचाय?

Next

-पवन देशपांडे

महात्मा गांधी यांची 150 वी जयंती येऊ घातली आहे. गांधीजींच्या स्वप्नातील भारत सध्या आहे तरी कसा? तो खरंच महिलांसाठी सुरक्षित आहे का? स्वच्छ आहे का? पुढारलेला आहे का? विकसीत झाला आहे का? 
महिलांनी संपूर्ण भारत एकट्याने फिरावं एवढा सुरक्षित आहे का? 

या प्रश्नाची उत्तरं कोणताही राजकारणी घरबसल्या देईल, देतही आहेत. पण कोण्या एका महिलेने संपूर्ण भारत फिरून हीच चाचणी घेतली तर?

हीच कल्पना घेऊन एक अनिवासी भारतीय महिला भारतात आली आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये ही महिला भारतातील प्रत्येक कोपर्‍यापर्यंत एकटीने प्रवास करणार आहे.
या महिलेचा अनोखा प्रवास सुरू होण्यापूर्वी लोकमतने त्यांना गाठलं. हा थरार सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या मनातील उत्सुकता, भीती आणि संपूर्ण भारत बघण्याची.. जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

संगीता श्रीधर असं या महिलेचं नाव. आयटी इंजिनीअर. मूळ राहणारी दक्षिण भारतातील. पण गेल्या तीस वर्षांपासून संयुक्त अरब अमिरात येथे नोकरी करतात. आज त्यांचं तिथे एक कुटुंब आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी भारत भ्रमंतीवर निघण्याचा निर्णय घेतला. 

मृत्यूच्या काही दिवस अगोदर त्यांच्या वडिलांनी त्यांना विचारलं होत.. ‘‘भारतात शिकलीस.. भारतात लहानाची मोठी झालीस.. भारताला काय परत काय दिलंस?’’ - वडिलांच्या या प्रश्नावर त्यावेळी निरूत्तर झालेल्या संगीता  यांनी भारतात एक नवी चळवळ रुजवण्याचा संकल्प केला.  महिलांसाठीची चळवळ! 

आतापर्यंतचं आयुष्य वैभवशाली घरामध्ये जगलेल्या संगीता  यांनी एक चार चाकी गाडी यासाठी निवडली. खाण्यापासून ते राहण्या-झोपण्यापर्यंतच्या सगळ्या सुविधा त्यांनी त्या गाडीतच तयार केल्या. त्यांची भेट झाली, तेव्हा  त्या हीच गाडी घेऊन पुण्याहून मुंबईत आल्या होत्या. 

काळी पलाझो आणि काळा टॉप घालून आलेल्या संगीता  एका पार्किंग एरियामध्ये एका सोशल मीडिया टीमसोबत चर्चा करत होत्या. आपल्या गाडीचा मागचा दरवाजा  उघडा ठेवून त्यांनी तेथेच मिटींग सुरू केली होती. टाटा कंपनीने संगीताला या भारत भ्रमंतीसाठी आपली हेक्सा ही गाडी दिली आहे. त्यात त्यांनी मागच्या सर्व सीट्स काढून टाकलेल्या दिसत होत्या. त्यातच समोरील दोन सिट्स सोडल्या तर बसण्यासाठी अशी वेगळी जागा नव्हती. पण मागच्या बाजूला त्यांनी संपूर्ण घरच तयार केलेलं दिसलं. दोन छोटे फॅन, दोन लाइट्स, बॅटरी चार्जर असं वरवर दिसत होतं. एक लाकडी बेड दिसत होता. पण त्याखाली त्यांनी संपूर्ण किचन, लायब्ररी असं साठवून ठेवलंय.अशा अनेक महत्त्वाच्या वस्तू . सोबत स्वयंपाकासाठी एक छोटी आधुनिक चूलही दिसत होती. रस्त्यात कुठेही थांबून थोडेफार जळण जमा करून मी कुठेही स्वयंपाक करू शकते- असं त्या सांगत होत्या.

संगीता यांचं नियोजन पक्कं आहे. त्या सांगतात,  ‘‘या संपूर्ण भारत भ्रमंतीतून मी फार मोठी माहिती जमा करणार आहे. भारतात असलेल्या जवळपास सगळ्याच जागतिक वारसास्थळांना ( युनेस्को साइट्स) भेट देणार आहे. माझ्या मार्गात लागणारे अनेक पेट्रोल पंप, शाळा येथील स्वच्छता गृह महिला-मुलींसाठी सुरक्षित आहेत का? हे तपासणार आहे. राष्ट्रीय महामार्ग कायमच चकचकीत असतात. त्यामुळे त्यावरून जातना प्रत्यक्ष स्थिती लक्षात येत नाही. त्यामुळे असे हायवे शक्यतो टाळून अंतर्गत मार्गांचा वापर अधिकाधिक करण्याचा विचार आहे. त्यामुळे रस्त्याची चाळण किती झाली आहे ? कोणत्या भागातील रस्ते अधिक चांगले आहेत? कुठे अधिक सुरक्षित प्रवास करता येऊ शकतो? कुठल्या भागात अधिक असुरक्षित वाटतं, या सर्वांची मी नोंद करणार आहे. अनुभव घेणार आहे’- असं सांगताना संगीता यांच्या नजरेत या भ्रमंतीबद्दलचा दृढ निश्चय स्पष्ट जाणवत होता. 

भारतात बलात्कारांची प्रकरणं एवढी वाढत असताना  तुम्ही संपूर्ण भारत एकटीने एका गाडीतून फिरणार आहात, भीती नाही का वाटत? असं त्यांना विचारलं तर त्यांनी लगेच उत्तर दिलं.. डरने का क्या?
पण नंतर त्या असंही म्हणाल्या.. सुरुवातीला भीती वाटली होती. हे खरंच एकटीने करता येईल का? असंही वाटून गेलं. अनेक मित्र-मैत्रिनींनी विचारलंही.. एकट्याने जातेयस, परत येणार ना? म्हणून अधिक धास्ती होती. पण ठरवलं.. अब पिछे नहीं हटने का!’

मी एकटी जात असले आणि रस्त्यावर गाडी पार्क करूनही गाडीत झोपणार असले तरी माझ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट्स माझ्या घरच्यांना आणि मुंबईत बसलेल्या एका टीमला मिळणार आहेत. माझी गाडी कोणत्या रस्त्यावर आहे, किती स्पीडने मी गाडी चालवत आहे. कुठे पार्किंग केलं आहे हे सर्व ट्रॅक होणार आहे. कोणत्याही क्षणी मला मदत लागली तर पोहोचू शकेल, अशी टेक्नॉलॉजी मी सोबत ठेवली आहे, असं सांगताना संगीता यांनी प्रत्येक वस्तू काढूनही दाखवली. 
सुरक्षेसाठी काय करणार? असं त्यांना विचारलं तर त्यांनी लगेच पेपर स्प्रे बाहेर काढला. गाडीच्या प्रत्येक दरवाजाशी त्यांनी चाकूही ठेवलेला दिसला. एक धारदार सुरा माझ्या हँड ब्रेकच्या जवळच असल्याचंही त्या म्हणाल्या,  ‘ म्हणजे कोणी जर मला गाडीची काच खाली करण्याची बळजबरी केलीच तर माझ्या एका हातात पेपर स्प्रे असेल. त्याने काही केलेच तर पुढील अर्धा तास त्याला शुद्ध येणार नाही, एवढय़ा क्षमतेचा स्प्रे त्याच्या नाका-तोंडावर मारला जाईल,’- असं संगिता यांनी सांगितलं. 

त्याची भारत भ्रमंती मुंबईहून सुरू होणार आहे.  रविवारी - म्हण्जे आजच त्या मुंबईहून गुजरातच्या दिशेने जातील आणि संपूर्ण उत्तर भारत-मध्यभारत फिरून नंतर त्या पूर्वांचलमध्ये जाणार आहेत. शेजारी राष्ट्रांच्या सर्व सीमांवर जाण्याचा त्यांचा विचार आहे. त्यासाठी लष्कराचं सहकार्यही मिळवण्याचे प्रयत्नही चालू आहेत. 

या भ्रमंती मार्गात लागणार्‍या बहुतेक शाळांना मी भेट देण्याचा विचार आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं  आयोजनही झालं आहे. माझ्या मते लहान मुलं-विद्यार्थी सर्वांंत मोठे स्वच्छता दूत आणि स्वच्छतेचे इन्स्पेक्टर बनू शकतात. कारण, ते कचरा फेकणार्‍या किंवा टाकणा-या कोणत्याही व्यक्तीला आपल्या निरागस प्रश्नांतून भानावर आणू शकतात. म्हणून शाळांमधून स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्याचा माझा मानस असल्याचे, संगीता सांगतात. 

संपूर्ण भ्रमंती साधेपणाने करण्याची इच्छा व्यक्त करताना त्या म्हणाल्या , मी फक्त चार ड्रेस सोबत घेतले आहेत. कमीत कमी सामानात आणि सर्व प्रकारच्या स्वदेशी वस्तू वापरून भारतभर फिरणार आहे. 
जे भेटतील, ते सगळे माझेच!
सहा भाषा बोलता-वाचता येणार्‍या संगीता सांगतात की, मी एकटी आहे असं मानतच नाही. कारण प्रत्येक टप्प्यावर भेटणारी व्यक्ती ही भारतीय असेल. माझी बहीण किंवा भाऊ असेल. मला खात्री आहे की खुल्या मनाने जगलात की तुमच्यासोबत चांगली माणसं जोडली जातात. हेच भारतीय माझ्यासाठी संपूर्ण भ्रमंतीदरम्यान साथीदार असतील. 

रोजची सकाळ स्वच्छता कामगारांबरोबर!

संगीता यांचा आणखी एक बेत फार खास आहे. त्या सांगतात,  ‘प्रत्येक शहराची-गावाची स्वच्छता सकाळी सुरू होते. ही स्वच्छता करणार्‍या बहुतेक महिला कामगार असतात. त्यांना मी भेटणार आहे. त्यांचे आभार मानणार आहे आणि त्यांच्या समस्याही जाणून घेणार आहे. माझ्या संपूर्ण भ्रमंतीतून केवढय़ा लोकांची माहिती जमा होईल, याची कल्पना न केलेलीच बरी. त्यामुळे स्वच्छतेचे हे दूत कोण-कोणत्या संकटांतून जात आहेत, त्यांना चांगल्या प्रकारची साधनं उपलब्ध आहेत की नाही, याचा आढावा मी घेणार आहे.’ 

सौर ऊज्रेचा वापर

या संपूर्ण प्रवासात संगीता सौर ऊज्रेचा वापर करणार आहेत. त्यासाठी त्यांनी गाडीच्या टपावर सौर पॅनेल लावले आहेत. शिवाय गाडीचा एसी काढून त्याठिकाणी अन्नपदार्थांसाठी छोटा फ्रिज तयार करून घेतला आहे. मोबाइल चाजिर्ंंग, लाइट्स, फॅन, लॅपटॉपचे चाजिर्ंंग, फ्रिज यासाठी लागणारी वीज या पॅनेलमधूनही मिळेल. म्हणजे गाडीचं इंधनही वाचेल. 

टेस्ट ऑफ इंडिया

आतापर्यंंत भारत दर्शनाच्या अनेकांनी अनेक वेळा टूर काढल्या आहेत. काहींनी सर्वांंत वेगात भारत टूर केली. काहींनी पर्यटनासाठी भ्रमंती केली. पण, मी करत असलेल्या या भारत भ्रमंतीमागे स्वच्छतेचा संदेश आहे. क्लिन इंडिया मिशन पूर्ण व्हावं अशी माझीही इच्छा आहे. म्हणून माझी ही मोहीम वेगळी आहे, अशी संगीता यांची भावना आहे. 

(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत)

pavan.deshpande@lokmat.com

 


 

Web Title: Traveling around the country on a clean India trail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.