समुद्रस्नान

By admin | Published: April 22, 2017 02:47 PM2017-04-22T14:47:29+5:302017-04-22T15:11:15+5:30

समुद्राच्या ओढीने कोकणच्या किनाऱ्याकडे धाव घेणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे,आणि त्याचबरोबर अशा हौशी पर्यटकांना समुद्राने गिळल्याच्या बातम्याही!

Sea breeze | समुद्रस्नान

समुद्रस्नान

Next

-  महेश सरनाईक

समुद्राच्या ओढीने कोकणच्या किनाऱ्याकडे धाव घेणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे,
आणि त्याचबरोबर अशा 
हौशी पर्यटकांना समुद्राने 
गिळल्याच्या बातम्याही!
- समुद्र इतका का संतापतो?
कुणावर? आणि कशामुळे?

माझ्याजवळ या.. माझ्या सौंदर्याचा आणि खजिन्याचा आस्वाद अवश्य घ्या.. मात्र माझ्या जगात शिरताना थोडे भान बाळगा. या सृष्टीतील सारे काही माझ्यात सामील होते, पण मी मात्र कोणतीही गोष्ट माझ्या पोटात ठेवत नाही. ‘आत’ शिरताना हे लक्षात ठेवा’ - ही हाक आहे धगधगत्या उन्हाळ्यात सर्वांना मोह घालणाऱ्या कोकणातल्या किनारपट्टीवर उसळणाऱ्या समुद्राची!
सिंधुदुर्गातील तारकर्ली-देवबाग किनारपट्टीवर वायरी-भूतनाथ येथे पर्यटन आणि समुद्रस्नानाची मजा लुटण्यासाठी आलेल्या बेळगावच्या मराठा मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयातील आठ विद्यार्थी (प्राध्यापकासह) बुडून मृत्यू पावले, त्याला आठेक दिवस होत असताना वायरी, तारकर्ली, देवबाग या भागातून फिरून आलो.
- तिथला समुद्र ‘हे’ बोलला नसेल, पण त्याची रहस्ये जाणून असलेले स्थानिक लोक मात्र पुन्हा पुन्हा हेच सांगत होते : इथला समुद्र वेगळा आहे. त्याच्या लाटांमध्ये शिरताना भान बाळगले पाहिजे. आणि त्याची रहस्ये न जाणणाऱ्या पर्यटकांनी तर जास्तच! कोकणच्या समुद्रकिनारपट्टीवर पर्यटकांची वर्दळ वाढली आहे आणि त्याबरोबरच वायरीसारख्या दुर्घटनांचे प्रसंगही! दरवर्षी कुठे ना कुठे पर्यटक बुडतात. त्यातील काही सुदैवाने बचावतात. परंतु समुद्रात बुडून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. त्यामध्ये अतिउत्साही, स्थानिकांचे सल्ले धुडकावून लावणाऱ्या अनभिज्ञ महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे. कोकणात बुडून मृत्यू पावणाऱ्या पर्यटकांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, बेळगाव आदी भागातील पर्यटकांचा समावेश असल्याचे आढळून आले आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथून आलेल्या पर्यटकांना समुद्राच्या भरती-ओहोटीच्या परिणामांची माहिती नसते. समुद्राची रचना, त्याची खोली, त्याचा उतार, लाटांपासून निर्माण होणारा धोका याची काहीच कल्पना नसते. मात्र, अति उत्साहात केवळ मौजमजा करण्याचा अट्टाहास यातून समुद्राच्या बाबतीत अनभिज्ञता असूनही हे उत्साही पर्यटक समुद्रस्नानाला उतरतात आणि बुडतात. वायरीच्या किनाऱ्यावरली दुर्घटना घडली, तेव्हाही समुद्र तसा ‘शांत’ होता, तरीही जीव गेले; कारण?
- समुद्राचे अंतरंग न जाणणाऱ्या पर्यटकांचा अति-उत्साह! सिंधुदुर्गातील समुद्रकिनारपट्टी प्रदूषणविरहित आहे. ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, स्कुबा डायव्हिंग, वॉटर स्पोटर््स अशा अनेक अंगाने येथील समुद्र जगभरातील पर्यटकांना खुणावतो. समुद्रावरील तपमान हे एकसंध (स्टेबल) असते. उष्णता किवा थंडीची लाट आली तरी समुद्राचे तपमान वर्षभर समान राहते. थंडी असो वा उन्हाळा, दोन्ही गोष्टींपासून बचाव करण्यासाठी पर्यटक समुद्रस्थळी धाव घेतात. कुठलाही पर्यटक अथांग समुद्र पाहून प्रफुल्लित, उत्साहित होतो. नंतर तो डुंबायला लागतो. भारतीयांमध्ये पोहण्याबद्दलची आवड (त्यातले ज्ञान, सवय आणि सराव हे सारेच) खूपच कमी असते. यामागे कारणे वेगवेगळी असतील. मात्र बहुतांश पर्यटकांना पोहता येत नाही. त्यातल्या त्यात पोहायला येणाऱ्या पर्यटकांचा अनुभव हा शहरातल्या स्विमिंग पूलचा असतो. अशा तरणतलावांमध्ये पोहता येणे ही समुद्रात पोहण्यासाठी उतरण्याची ‘पात्रता’ नाही, हे अनेक पर्यटकांच्या गावी नसते. त्यामुळे ऐनवेळी ओढावणाऱ्या संकटाचा मुकाबला करता न आल्याने नाकातोंडात पाणी जाणे अटळ होऊन बसते.
किनारपट्टीवर असणाऱ्या स्थानिकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे आणि उपलब्ध वेळात समुद्रात जास्तीत जास्त मजा करण्याची घाई हे संकट आणखीच गहिरे बनवते. शहरातील तरणतलाव तसेच ग्रामीण भागातील विहिरींमध्ये पाणी तसे स्थिर असते. त्यात कुठल्याही प्रकारचा प्रवाह नसतो. नदी, नाल्यांमध्ये प्रवाह हा एक दिशेने असतो. परंतु समुद्रामध्ये मात्र विशिष्ट प्रकारचे प्रवाह असतात. समुद्र अथांग असल्यामुळे समुद्रसपाटीवर वाहणारी हवा, भरती-ओहोटीमुळे निर्माण होणारी ऊर्जा व ज्याठिकाणी नदी समुद्राला मिळते त्याठिकाणी नदीचा प्रवाह आणि समुद्राचे प्रवाह यामुळे निर्माण होणारा अंतर्गत प्रवाह हे बरेच गुंतागुंतीचे असतात. जरी समुद्र वरून शांत, संयमी वाटला तरी अंतर्गत बऱ्याच हालचाली सतत आणि वेगाने होत असतात. ही गोष्ट समुद्राबाबतची भीती दर्शविण्यासाठी नव्हे, तर समुद्राबद्दल जाणून घेण्यासाठी महत्त्वाची आहे. समुद्रात बुडून पर्यटकांचा मृत्यू होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत सतत वाढत्या संख्येने होत आहेत. कोकणच्या समुद्रात अनोख्या समुद्रस्नानाचा मनसोक्त आनंद लुटावा, समुद्राच्या फेसाळत येणाऱ्या लाटा अंगावर घेऊन तृप्त व्हावे, समुद्र सफरीचा आनंद मनसोक्त घ्यावा यासाठी कोकणात येणाऱ्यांची संख्या आता सुट्यांच्या काळात अधिकच वाढेल.
त्यांच्यासाठी समुद्राचे सांगणे आहे ते एवढेच की,
बाबांनो, जरा जपून!!
पुढील रविवारी:
समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेसाठीचे उपाय

 

 

दुर्घटना का होतात?

१) समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर धडकतात, तेव्हा त्यांच्यामध्ये एक ऊर्जा असते. ती ऊर्जा लाटांच्या स्वरूपात किनाऱ्यावर येताना अत्यंत वेगवान प्रवाह निर्माण करते. हे प्रवाह समुद्र किनाऱ्याला समांतर असतात.

२) जेव्हा दोन प्रवाह एकमेकांना मिळतात. तेव्हा तो प्रवाह किनाऱ्याच्या दिशेने येतायेता अचानक उलटा फिरून समुद्राकडे सरकतो. त्याला ‘रिप’ करंट म्हणून ओळखले जाते. (वरील छायाचित्र पाहा)

३) हाच ‘रिप’ करंट पर्यटकांसाठी घातक ठरतो.

४) या प्रवाहाची रूंदी २0 ते ३0 मीटर तर लांबी ४0 ते ६0 मीटर असते.

५) या प्रवाहाचा अंदाज ना पर्यटकांना असतो, ना स्थानिकांना असतो. त्यामुळे काहीवेळा पर्यटकांबरोबरच स्थानिक मच्छिमारही मृत्यू पावतात.

६) आतापर्यंतच्या दुर्घटनांमध्ये असे दिसते की, ९0 टक्केंपेक्षा जास्त मृत्यू हे पर्यटक ‘रिप’ करंटमध्ये सापडल्याने झाले आहेत.

७) पर्यटक मद्यधुंद होऊन पाण्यात शिरतात. क्षणिक मौजमजेसाठी आयुष्यावर बेतते. हेदेखील एक कारण आहे.

Web Title: Sea breeze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.