हिमालयाची अनेक रूपं आहेत; आयुष्यात एकदा तरी ती अनुभवायलाच हवीत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 03:00 AM2018-07-15T03:00:00+5:302018-07-15T03:00:00+5:30

सुमारे पासष्ट दिवसांचा अविस्मरणीय प्रवास !प्रचंड, अफाट, अविचल तरीही स्खलनशील हिमालय. एकीकडे सिक्कीमचा, खळाळत्या नद्या, निर्झरांनी ओथंबलेला निसर्ग तरपाण्याचा टिपूसही न मिळेल असं शुष्क, थंड, अतिउंचीवरील लडाखचं वाळवंट. रोहतांग पासवरील साडेतीन तासांचा, हॉर्नच्या कलकलाटातील ट्रॅफिक जॅम आणि ‘की’ मोनॅस्ट्री परिसरातील नीरव शांतता. विरोधाभासी वाटणारी हिमालयाची अनेक रूपं! त्याने जे दिलं त्याची मोजदाद अशक्य आहे..

roaming through Himalayas | हिमालयाची अनेक रूपं आहेत; आयुष्यात एकदा तरी ती अनुभवायलाच हवीत.

हिमालयाची अनेक रूपं आहेत; आयुष्यात एकदा तरी ती अनुभवायलाच हवीत.

googlenewsNext


-वसंत वसंत लिमये 

पुण्यात शिरताना, ठायी ठायी पंढरपूर वारीच्या स्वागताचे फलक लागलेले. गाडी फग्यरुसन रोडकडे वळली, लांबवर हॉटेल ‘रूपाली’ दिसू लागलं. 6 जुलैची सकाळ, 7 वाजत आलेले. समोरच हसतमुख कल्याण किंकर, हेमंत कटककर स्वागताला, मागोमाग सुखद आश्चर्याचा धक्का देत मृणाल, मिलिंद आणि प्रेमसह हाय प्लेसेसची मंडळी पोहचली. अशा त-हेने, हिमालयातील 11,725 किमी प्रवास करून ‘हिमयात्रा -2018’ सुफळ संपूर्ण झाली होती. 
आम्ही 1 जुलै रोजी चंडीगढला पोहचलो आणि न संपणार्‍या सपाटीवरील प्रवास सुरू झाला. आठ आठवड्यांच्या हिमालयातील प्रवासानंतर मला कसंतरीच वाटत होतं. रात्नी झोपेतदेखील डोक्यात हिमालयातील रमणीय चित्रफीत उलगडत होती. सभोवतालच्या गोष्टी जाणवत होत्या; पण आतपर्यंत पोहचत नव्हत्या. ‘न घरका, न घाटका’ अशा तरल अवस्थेत मी तरंगत होतो!
या वर्षाच्या सुरुवातीस हिमालयात ‘नुसतं भटकायला’ जावं अशा कल्पनेचा जन्म झाला. दोन आठवडे, भाड्याची गाडी आणि गढवालमध्ये जावं अशी सुरुवात झाली. ‘ओम गूगलाय नम:’ म्हणून मी नकाशाचा धांडोळा घेऊ लागलो. मूळच्या कल्पनेला अनेक धुमारे फुटत गेले आणि आठ आठवड्यांची ‘हिमयात्रा -2018’ आकार घेत गेली. मार्च अखेरीस इसुझु DMAX  ही गाडी आली आणि ‘गिरिजा’ असं तिचं नामकरण झालं. माझा जुना ड्रायव्हर, अमित शेलार एका पायावर तयार झाला. नुसत्या दोघांना कंटाळा आला असता, म्हणून दर आठवड्यात दोन असे सोळा सदस्य ठरले. सामानाच्या याद्या, खरेदी आणि अनेक बैठकी सुरू झाल्या. पूर्वानुभव, अनेकांच्या शंका आणि सूचना यामुळे नियोजन समृद्ध होत गेलं. दोन महिने कसे गेले ते कळलंच नाही. पण ही यात्रा म्हणजे  एक आनंद सोहळा होता हे नक्की !
या हिमयात्रेत नवे-जुने मित्न नव्यानं ओळखीचे झाले. जुन्या नात्यांना उजाळा मिळाला. धमाल हास्यविनोद करणारं त्रिकूट - प्रेम, संजय आणि माझी पत्नी मृणाल, शांत, समजूतदार पाठीराखा निर्मल आणि लहान मुलासारखा उत्साही बाबा देसवंडीकर, कुठलाही आव न आणणारे धमाल सुनील बर्वे आणि सचिन खेडेकर, स्थानिक जनजीवनात विशेष रस घेणार्‍या सुहिता थत्ते आणि राणी पाटील, अध्यात्मात रमलेले आनंदी भावेअण्णा आणि मोहिमेचं सारं इंटरनेट तंत्नज्ञान सांभाळणारा प्रशांत, ट्रेकिंग मधला जुना अनुभवी दोस्त राजू फडके आणि उत्साही जयराज, अखंड ‘गमती’ करणारा डॉ. अजित रानडे आणि हिमालयानं स्तिमित झालेला मक्या, शेवटच्या आठवड्यात स्केचिंग आणि कवितेत रमलेला डॉ. आनंद नाडकर्णी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा भरवश्याचा चक्र धर अमित अशी संगतसोबत.
एक खरं की ही यात्रा  माझ्या स्वत:साठीच होती. हा माझा ‘स्वांत: सुखाय’ प्रयत्न होता, मला अशा प्रवासात सोबती मिळाले हे माझं भाग्य !
एरवी अखंड मोबाइलमध्ये हरवलेल्या लोकांचा मला कंटाळा येतो आणि म्हणूनच गूगल, इंटरनेट अशा तंत्नज्ञानाचा मला काहीसा तिटकारा आहे. पण हिमयात्रेत मात्र या सा-या तंत्नज्ञानाचा फार मोठा उपयोग झाला. नियोजनात, तसंच प्रत्यक्ष प्रवासात, ‘गूगल मॅप्स’ आणि ‘मॅप मी’ या दोन अँप्सचा खूप उपयोग झाला. ‘पिक्सेल’ नावाच्या जादुई कॅमे-याने तर बहार आणली !
अशा मोहिमेत नियोजन अतिशय महत्त्वाचं. स्वत:सकट सर्व सदस्यांचा फिटनेस, त्यांची नेहमीची औषधं आणि सवयी माहिती असणं गरजेचं. प्रत्येक सदस्यानं जाण्यापूर्वी फिटनेससाठी थोडा व्यायाम केला होता. आम्ही सोबत ऑक्सिजन सिलिंडर, औषधं आणि प्रथमोपचाराचं किट घेतलं होतं. कॅम्पिंगची जय्यत तयारी होती. अवघड रस्ते, अतिथंडी आणि सर्व्हिस स्टेशन्सचा अभाव हे लक्षात घेऊन गाडीची तयारी करणं खूप महत्त्वाचं. पंक्चर किट, पंप आणि इंजिन ऑइलसकट स्पेअर्स आम्ही सोबत घेतले होते. जाणार त्या प्रदेशात चालतील अशी मोबाइल सिमकार्ड अतिशय उपयोगी ठरतात. एकंदरीत निसर्गात, विशेषत: हिमालयात त्याचा लहरीपणा लक्षात घेऊन विनम्रपणे जाणं र्शेयस्कर ! 
सुमारे पासष्ट दिवसांचा प्रवास अविस्मरणीय होता. ‘टुम्लिंग’हून झालेलं कांचनजंगेचं पुसट दर्शन, भरपावसात ‘साधूटार’च्या रात्नीचं जागरण आणि थरार, ‘बिर्दया’च्या अभयारण्यात दिसलेला वाघ, रूपकुंडच्या वाटेवर भेटलेली मधुलीदेवी, पब्बर नदीकाठचा कॅम्प, ‘वारी ला’च्या जवळ दिसलेले मारमॉट्स, पँगॉँगचा अफाट जलाशय आणि चिटकुल जवळचा बास्पा नदीचा जोशपूर्ण आवेग.
.आता फोटो पाहताना अशा अनेक आठवणींचा महापूर डोळ्यासमोर दाटतो.

 

प्रचंड, अफाट, अविचल तरीही स्खलनशील हिमालय. एकीकडे सिक्कीमचा, खळाळत्या नद्या, निर्झरांनी ओथंबलेला निसर्ग तर पाण्याचा टिपूसही न मिळेल असं शुष्क, थंड, अतिउंचीवरील लडाखचं वाळवंट. रोहतांग पासवरील साडेतीन तासांचा, हॉर्नच्या कलकलाटातील ट्रॅफिक जॅम आणि ‘की’ मोनॅस्ट्री परिसरातील नीरव शांतता. 
- ‘हिमयात्रे’त सकृतदर्शनी विरोधाभासी वाटणारी हिमालयाची अनेक रूपं सामोरी आली. लाखो वर्षांपासून, या विरोधाभासातील संतुलन हा हिमालयाचा स्वभाव आहे. हे नाजूक संतुलन सांभाळणं ही आपल्यावरील फार मोठी जबाबदारी आहे. एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे हिमालय हा महासागर आहे आणि ‘हिमयात्ना’ ही केवळ काठावर मारलेली एक डुबकी !
हिमालयात बहुदा गिर्यारोहक, पर्यटक आणि र्शद्धाळू यात्रेकरू जातात. गिर्यारोहणात मानवी पराक्र माला आव्हान असतं. पर्यटक सुखसोयींचा विचार करून, ओळखीच्या पर्यटनस्थळी जाऊन हिमालयासारख्या आश्चर्याचा, सौंदर्याचा नमुन्यादाखल आस्वाद घेतो. र्शद्धाळू यात्नेकरू देवभूमीतील धार्मिक स्थळांना भेट देण्यात धन्यता मानतो. हिमयात्नेत ‘हिमालय’ हाच देव होता आणि त्याच्या सहवासात निखळ आनंद गवसेल अशी आमची र्शद्धा होती. आणि म्हणूनच नेहमीच्या गजबजलेल्या वाटा सोडून, काहीशा अनवट वाटांवरील हा प्रवास होता. अफाट, अर्मयाद हिमालयात, मी आणि आसमंत हे नातं उलगडण्याचा हा छोटासा प्रयत्न होता.
..त्या आल्हाददायक सौंदर्याचं अजीर्ण होईल असं वाटलं होतं. पण नाही, उलट त्या सौंदर्याची झिंग चढत गेली. अनेक वेगवेगळी, प्रेमळ अगत्यशील माणसं भेटली. खडतर आयुष्य, अतिशय कमी गरजा, अनंत कष्ट असूनही उदंड समाधानात जगणारा शेतकरी, ‘बगरवाल’ आणि कष्टकरी स्त्रिया यांच्याकडून थोडसं समाधान गाठीशी बांधून आणता आलं. सोबतच्या मित्नांबरोबर खूप आनंद लुटता आला. समृद्ध निसर्गात बाहेर जाऊन आतला शोध, हाही एक विरोधाभासच!
या हिमयात्रेनी मी समृद्ध झालो. खूप काही मिळालं. प्रत्यक्ष सोबत होतीच, त्याव्यतिरिक्त हितचिंतक, मित्न आणि असंख्य वाचक यांची अप्रत्यक्ष सोबत होती. 
‘अनंतफंदी’ नावाचे संगमनेरचे, दुसर्‍या बाजीरावाच्या काळातील एक कवी होते. ‘हिमयात्ने’नंतर, त्यांच्या ओळीत काही फरक करून, आवर्जून म्हणावंसं वाटतं, 
‘अनवट वाट वहिवाट असावी !’ 
मित्नांनो, थोडी काळजी, खूप नियोजन यासह जरूर अशा वाटांवर बाहेर पडा. प्रेमानी कवेत घेणा-या, अनंत करांनी आनंद उधळणा-या हिमालयाला जवळ करा ! 
शुभास्ते पंथान: सन्तु!     
(समाप्त)

(लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)

vasantlimaye@gmail.com

Web Title: roaming through Himalayas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.