पाणी संपण्याआधी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 06:05 AM2019-05-19T06:05:00+5:302019-05-19T06:05:10+5:30

शहरात राहणार्‍या माणसांच्या डोक्यावरही  पाऊस पडतोच. हे पावसाचे पाणी वाहून जाते. ते आसपासच जमिनीत मुरवण्याचे  प्रयत्न करणे अवघड आहे का? - मुळीच नाही!

remedies to save water in urban areas | पाणी संपण्याआधी.

पाणी संपण्याआधी.

googlenewsNext
ठळक मुद्देप्रत्येकाने पाणी जपून वापरणे आणि असलेल्या पाण्याचे नीट नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे. ग्रामीण भागात अलीकडे त्यासंदर्भातली जागरूकता वाढल्याचे दिसते आहे, शहरी नागरिकांमध्ये मात्र अद्यापही ही जाणीव दिसत नाही.

- उल्हास परांजपे

दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढते आहे. पाण्याचे स्रोत कमी होत आहेत. यापुढेही पाणी कमी कमीच होत जाणार आहे. अशावेळी प्रत्येकाने पाणी जपून वापरणे आणि असलेल्या पाण्याचे नीट नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे.
ग्रामीण भागात अलीकडे त्यासंदर्भातली जागरूकता वाढल्याचे दिसते आहे, शहरी नागरिकांमध्ये मात्र अद्यापही ही जाणीव दिसत नाही.
पावसाचे पाणी वाया जाऊ न देता, रेनवॉटर हार्वेस्टिंगसारखे प्रयोग करणे हा त्यातला एक महत्त्वाचा उपाय.
पावसाचे पाणी जमा करून साठवणे व नंतर आवश्यक तेव्हा जरुरीइतके वापरणे म्हणजे रेनवॉटर हार्वेस्टिंग. या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा प्रथम स्रोत म्हणून वापर केला जातो.
सर्व महापालिका व नगरपालिकांमध्ये नव्या इमारतींकरता रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे केले आहे. तसे असेल तरच नवीन इमारतींना बांधकाम वापर  परवाना मिळतो.
प्रत्येक शहरात हजारो शहरातील जुन्या इमारती, अपार्टमेंट, बंगले आहेत. येथेही पावसाचे पाणी साठवून वापरले गेले तर पाणीप्रश्नाची दाहकता बरीच कमी होऊ शकेल. 
पावसाच्या पाण्याचे नियोजन
छतावर पडणारे पाणी -

गच्चीवर (छतावर) पडणार्‍या पावसाच्या पाण्याचा साठा करून तो पिण्याव्यतिरिक्त अन्य उपयोगाकरिता वापरणे. उदा. शौचालय सफाई, बागेकरिता, वाहने धुण्यासाठी इत्यादी.
याकरिता प्रथम खालील गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.
अ) गच्चीचे किंवा छताचे क्षेत्रफळ, ब) इमारतीतील सदनिकांची माहिती, क) सरासरी पडणारा वार्षिक पाऊस.
गच्चीचे क्षेत्रफळ आणि सरासरी पडणारा पाऊस यावरून पावसाळ्यात उपलब्ध होणार्‍या पाण्याची उपलब्धता काढता येईल. तसेच इमारतीत राहणार्‍या लोकांच्या संख्येवरून शौचालय साफ करण्यास लागणार्‍या रोजच्या पाण्याची आवश्यकता काढता येईल.
या माहितीच्या आधारे योग्य त्या क्षमतेची टाकी बांधावी आणि टाकीला गच्चीवरून पाणी घेऊन येणारे पाइप योग्य प्रकारे जोडावेत. पावसाचे पाणी घेऊन येणार्‍या प्रत्येक पाइपास एक टी व एक व्हॉल्व्ह व फिल्टर जोडावा. पावसाळ्याच्या सुरुवातीस व्हॉल्व्ह बंद ठेवल्यास गच्चीवरील प्रथम पडणार्‍या पावसाने पाण्याबरोबर येणारी गच्चीवरील घाण टीवाटे बाहेर पडेल. एकदा का गच्ची साफ झाली की व्हॉल्व्ह उघडावा. म्हणजे पाणी फिल्टरमधून  फिल्टर होऊन टाकीमध्ये जमा होईल. अशा प्रकारे जमा झालेले पाणी शौचालय साफ करण्यास, गाड्या धुण्याकरिता किंवा बगिचामध्ये वापरावे. 
आवारात पडणारे पाणी 
इमारतीच्या आवारातील मोकळ्या जागेवर पडणार्‍या पावसाच्या पाण्याचा उपयोग खालीलप्रमाणे करता येईल.
अ) जमिनीमध्ये जिरवणे, ब) भूगर्भातील साठय़ाचे पुनर्भरण करणे किंवा भूगर्भात साठवणे, क) विंधनविहिरीचे पुनर्भरण करणे.
पाणी जमिनीमध्ये जिरवणे
जमिनीमध्ये पाणी जिरवण्यासाठी प्रथम खालीलप्रमाणे टेस्ट करावी.
प्रथम 4 फूट बाय 4 फूट बाय 6 फूट असा खड्डा खोदावा आणि तो पाण्याने पूर्ण भरावा. एका तासात पाण्याची पातळी किती कमी होते, हे पाहावे. तो खड्डा पुन्हा पाण्याने भरावा व पुन्हा एक तासात पाणी किती कमी होते, त्याची नोंद घ्यावी. साधारणपणे असे दिवसभरात 7 ते 8 वेळा करावे. म्हणजे पावसाळासदृश परिस्थिती जमिनीखाली तयार होईल. शेवटची पाणी कमी झालेली नोंद लिहून ठेवल्यास या नोदींचा उपयोग करून किती खड्डे खोदणे जरुरीचे आहे, हे काढता येईल. साधारणपणे 1000 चौरस मीटरला एक नमुना खड्डा योग्य होईल. अशी तपासणी सुरुवातीचा जोरदार पाऊस पडून गेल्यानंतर केल्यास चांगले.
मोठय़ा जमिनीवर (गावांमध्ये) दोन रिंगा वापरून पाणी जमिनीत झिरपण्याचा वेग काढतात. (डबल रिंग इनफिट्रो मीटर) यासाठी बाहेरील रिंग 60 सें.मी. व्यास व आतली रिंग 30 सें.मी. किंवा बाहेरील 30 सें.मी. व आतली 15 सें.मी. व उंची 30 सें.मी. असावी.
भूगर्भातील साठय़ाचे पुनर्भरण करण्यासाठी पर्मिअँबिलिटी टेस्ट करावी.
विंधनविहिरीच्या पुनर्भरणासाठी पंपिंग टेस्ट करून विंधनविहिरीची दर दिवशी पाणी आत घेण्याची क्षमता समजेल.
वरील प्रकारे वेगवेगळ्या चाचण्या करून योग्य ती उपाययोजना केल्यास आवारातील मोकळ्या जागेवरील पाणी आवारातच जिरवता येईल किंवा जमिनीमध्ये साठविता येईल.
गच्चीवर (छतावर) पडणार्‍या पावसाच्या पाण्याचा साठा करून विंधनविहिरीचे पुनर्भरणही करता येते.
छतावरील पाणी टाकीमध्ये साठवावे व हे पाणी विंधनविहिरीचे पुनर्भरण करण्याकरिता वापरावे. विंधनविहिरीची पाणी आत घेण्याची क्षमता (इनटेक कपॅसिटी) काढून त्याप्रमाणे पाण्याच्या टाकीचा आकार निश्चित करावा, जेणेकरून छतावरील पडणार्‍या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग पुनर्भरणासाठी करता होईल.
विंधनविहिरीच्या पुनर्भरणासाठी वापरलेल्या पाण्याची गुणवत्ता ही पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेएवढी असावी. छतावरील पडणारे पावसाचे पाणी योग्य ती काळजी घेऊन साठवल्यानंतर पुनर्भरणास वापरावे.
पाण्याचे पुनर्भरण
पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यानंतर काही वेळा तेथेच जमा होते किंवा वाहत जाऊन ओढा, नाला, नदीला मिळते. अशावेळी काही प्रमाणात पाणी जमिनीत मुरते व त्यातील काही पाणी भूगर्भात जाते. यामुळे पाण्याचे नैसर्गिक पुनर्भरण होते. अशा प्रकारे जे पाणी जमिनीत मुरते त्याचे प्रमाण एकंदर पावसाच्या पाण्याच्या जास्तीत जास्त दहा टक्यांपर्यंत असते. भूगर्भातील पाण्याचा उपसा खूपच जास्त असल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे होणार्‍या भरण्यापेक्षा त्या भागातील पाण्याचा उपसा जास्त असतो. परिणामी मानवनिर्मित किंवा कृत्रिमरीत्या पाण्याचे पुनर्भरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पावसाच्या पुनर्भरणाचे फायदे
1) पावसाचे वाहून जाणारे पाणी भूगर्भात साठवता येते.
2) भूगर्भातील पाण्याची प्रत सुधारते. भूगर्भातील पाणी खारट असेल तर त्याचा खारटपणाही कमी होतो. 
3) वर्षभरात भूगर्भातील पाणी जेवढे वापरले जाते, तेवढे किंवा त्यापेक्षा जास्त पाणी भूगर्भात साठवता येते.
4) ओढे, नाले, नदी यामधील पाण्याचे प्रमाण वाढते.
5) विहीर किंवा विंधनविहिरीतील पाण्याची उपलब्धता वाढते.
6) भूगर्भात किंवा जमिनीमध्ये पाणी साठवणे  कमी खर्चाचे आहे. कारण जमिनीवर टाकी बांधणे किंवा तलावात पाणी साठवणे यासाठी जागा तर लागतेच, शिवाय बांधकामाचा खर्च पाणी जमिनीत जिरवण्यापेक्षा बराच अधिक असतो.
विहिरींचे पुनर्भरण
1) विहीर किंवा विंधनविहिरीपासून 6 फूट अंतरावर 10 मी. बाय 6 मी. बाय 3 मी. अशा आकाराचा खड्डा खोदावा. पावसाळ्यात त्यात पाणी साठेल आणि जमिनीखालील पाणीसाठय़ाचे पुनर्भरण होईल. जेथे असे करणे शक्य नसेल, तेथे गोलाकार किंवा अन्य प्रकारचा खड्डा विहीर किंवा विंधनविहिरीपासून दोन मीटर अंतरावर करावा आणि पावसाळ्यात पाणी साठेल असे बघावे.
2) घराच्या छतावरील पावसाचे पहिले पाणी सोडून देऊन छत नीट स्वच्छ झाल्यानंतर पडणारे पावसाचे पाणी गाळण्याचे यंत्र बसवून ते विहिरीत किंवा विंधनविहिरीत सोडावे.
अन्य पाण्याचे नियोजन
रस्ते, उद्याने व शहरातील मोकळ्या जागेवर पडणारे पावसाचे पाणी वेगवेगळ्या ठिकाणी तलाव बांधून तलावांमध्ये साठवावे. असे पाणी तलावांमध्ये साठवल्यामुळे शहरांमध्ये पाणी तुंबून राहणार नाही व या साठवलेल्या पाण्यामुळे जमिनीमधील व भूस्तरातील पाण्याची पातळी वाढेल. तसेच तलावांमुळे शहराची शोभाही वाढायला मदत होईल.
वरील सर्व प्रकार नीट नियोजनपूर्वक व अभ्यास करून अमलात आणल्यास शहरातील पावसाच्या पाण्याचे नियोजन चांगल्या प्रकारे करता येऊ शकेल आणि शहरातील पाण्याची गरज काही प्रमाणात तरी नक्की भागवता येईल.
पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी त्या त्या शहरातील ज्या तज्ज्ञ मंडळींनी बरीच कामे केली आहेत. त्यांचा सल्ला तसेच नगरपालिका/महापालिका यांची परवानगी अवश्य घ्यावी.
पाणी हा जागतिक प्रश्न आहे. आज सुपात असलेले उद्या जात्यात येणारच आहे. परिस्थिती आणखी बिकट होत जाणार आहे. आपण वेळीच सावध झालो नाही तर कोणीच आपल्याला माफ करणार नाही आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी आपलीच असेल. 

दर पावसाळ्यात बहुतांश शहरात पडते 1 कोटी 60 लाख लिटर पाणी

1. बहुतांश शहरातील पावसाचे प्रमाण 500 ते 4000 मिलिमीटर आहे.
2.  जेथे पावसाचे वार्षिक प्रमाण सरासरी 500 मि.मी. आहे, तेथे एक एकर क्षेत्रावर 2000 घनमीटर म्हणजेच 20 लाख लिटर पाणी पडते.
3. याच हिशेबाने पावसाची सरासरी 4000 मिमी असलेल्या ठिकाणी 16000 घनमीटर म्हणजे एक कोटी 60 लाख लिटर एवढे पाणी पडते. 
4. बर्‍याच ठिकाणी वार्षिक सरासरी पाऊस नियामितपणे पडत असल्यामुळे तेवढय़ा पाण्याची उपलब्धता दरवर्षी असतेच. 
5. एवढय़ा प्रचंड प्रमाणात उपलब्ध होणार्‍या पाण्यापैकी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवणे व उपयोगात आणणे  सहज शक्य आहे.

शहरात पडणारे पाणी कसे सांभाळता येईल?
अ) जमिनीमध्ये जिरवणे
ब) भूगर्भातील साठय़ाचे पुनर्भरण करणे किंवा भूगर्भात साठवणे 
क) विंधनविहिरीचे पुनर्भरण करणे.

(लेखक जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत.)

paranjpe.ulhas@gmail.com

Web Title: remedies to save water in urban areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.