प्रयोगशील शिक्षकांचा देशपातळीवरील आयसीटी पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 06:02 AM2018-12-09T06:02:00+5:302018-12-09T06:05:04+5:30

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा आणि तेथील शिक्षक याबद्दल शहरी भागात बऱ्याचदा नकारात्मक भावना दिसून येते; पण याच ठिकाणी वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग होताहेत आणि तेथील शिक्षक अभावातही धडाडीनं काम करताहेत. महाराष्ट्रातील विक्रम अडसूळ, सोमनाथ वाळके आणि रवि भापकर या तीन शिक्षकांना नुकताच देशपातळीवरील ‘आयसीटी’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त..

National ICT awad decalred for Maharashtra's three ZP teachers | प्रयोगशील शिक्षकांचा देशपातळीवरील आयसीटी पुरस्काराने सन्मान

प्रयोगशील शिक्षकांचा देशपातळीवरील आयसीटी पुरस्काराने सन्मान

googlenewsNext
ठळक मुद्देयावर्षी विक्रम अडसूळ, सोमनाथ वाळके आणि रवि भापकर या तीन शिक्षकांना देशपातळीवरील ‘आयसीटी’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

- हेरंब कुलकर्णी

ग्रामीण भागातील शिक्षक, शिक्षण आणि विद्यार्थी यांच्या दर्जाबाबत नेहमीच ओरड होत असते, मात्र कुठलेही पाठबळ आणि प्रोत्साहन नसतानाही या भागातील शिक्षक वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग करताहेत. हे प्रयोग देशपातळीवर नावाजलेही जाताहेत.
भारत सरकारच्या वतीने तंत्रज्ञानाच्या नवोपक्रमशील वापरासाठी शिक्षकांना राष्ट्रीय ‘आयसीटी’ (माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान) पुरस्कार दिला जातो. राष्ट्रपती पुरस्काराइतकाच देशपातळीवरील हा प्रतिष्ठित पुरस्कार आहे. २०१७च्या पुरस्कारासाठी यावर्षी देशभरातून ४३, तर महाराष्ट्रातून तीन शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
२०१० सालापासून हा पुरस्कार दिला जातो; पण २०१० ते २०१५ या पाच वर्षात या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून कोणीही पात्र ठरले नाही. २०१६ साली संदीप गुंड, सुनील आलूरकर व मनीषा गिरी या शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला.
या पुरस्कारासाठीची प्रक्रियाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्यातून ३ नावे पाठवली जातात. प्रधान सचिवांची समिती त्यातून फक्त ६ नावे राष्ट्रीय स्तरावर पाठवते. प्रत्येक राज्याचा कोटा ठरलेला असतो. दिल्लीतील ज्युरी महाराष्ट्रासाठी ३ शिक्षक निवडतात. यावर्षी अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील बंडरगरवस्ती शाळेतील विक्रम अडसूळ, याच जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद सरदवाडी शाळेतील रवि भापकर व बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद पारगाव जोगेश्वरी शाळेतील सोमनाथ वाळके यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा या पुरस्कारासाठी निवड झालेल्या तिन्ही शिक्षकांचे कामही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

विक्रम अडसूळ :

 

यावर्षी महाराष्ट्रातून राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले विक्रम अडसूळ एकमेव शिक्षक आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मेंढपाळ कुटुंबांची वस्ती असलेल्या बंडगरवस्ती या शाळेत ते तंत्रज्ञानाचे प्रयोग करतात. या वस्तीकडे जायला धड रस्ताही नाही. या पार्श्वभूमीवर हे यश अधिकच उठून दिसते. सुरुवातीला अडसूळ यांनी छोट्या-छोट्या लघुपटांची निर्मिती केली. अध्यापन करताना ते फेसबुक, यू-ट्यूबवरील अभ्यासोपयोगी व्हिडीओ विद्यार्थ्यांना दाखवतात. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे परदेशातील शाळेंशी मुलांचा संवाद साधला जातो. krutishilshikshak.blogspot असा ब्लॉग तयार करून त्यावर विविध शैक्षणिक विषयावर त्यांनी लेखन केले आहे. विशेष म्हणजे तंत्रज्ञानाला शिक्षणात गती देण्यासाठी ‘अ‍ॅक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र’ असा तंत्रस्नेही शिक्षकांचा समूह त्यांनी तयार केलेला आहे. यात १०,००० शिक्षक आहेत.
राज्याच्या अभ्यासक्रम समितीचा सदस्य म्हणून काम करताना सहावी व सातवीच्या पाठ्यपुस्तकात क्यूआर कोडचा वापर करण्यासाठी तसेच इ-कण्टेण्ट निवडण्यासाठी अडसूळ यांनी काम केले. पहिली दुसरीच्या मुलांसाठी ‘कोरी पाटी एटीएम प्रश्नपेढी’सारखे अ‍ॅप तयार केले आहेत. विद्यार्थी मूल्यमापनासाठी आॅनलाइन व आॅफलाइन टेस्ट व प्लीकर्सचा वापर केला जातो. तंत्रज्ञानाच्या वापराने मुलांची गळती व गैरहजरी कमी झाली आहे. पालकांना शाळेतील विविध उपक्रम, कार्यक्र म तसेच पाल्याविषयीची माहिती देण्यासाठी वे टू एसएमएसचा वापर केला जातो.
 

सोमनाथ वाळके : शाळेत संगणक, लॅपटॉप, प्रोजेक्टर, टॅबलेट, स्मार्टबोर्ड, सोलर सिस्टीम, इन्व्हर्टर, अ‍ॅण्ड्रॉइड टीव्ही, वीआर बॉक्स, थ्रीडी क्लासरूम.. इत्यादी गोष्टी सोमनाथ वाळके यांनी लोकसहभागातून उभ्या केल्या आहेत. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. शाळेतील विद्यार्थी टॅबच्या मदतीने शिकतात. याचबरोबर विविध शैक्षणिक व्हिडीओ, पीपीटी, शैक्षणिक सॉफ्टवेअर, प्रोजेक्टर, इंटरअ‍ॅक्टिव्ह स्मार्टबोर्ड.. ही सारीच आधुनिक साधने वापरून विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेत आहेत. पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषदेची शाळा त्यांनी स्काइपच्या साहाय्याने जगभराशी जोडलेली आहे. जगातील विविध शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या साहाय्याने चर्चा करत मुलं नवनवीन बाबी शिकतात. जगभरातील विविध प्रेक्षणीय स्थळे, प्राणिसंग्रहालये आदींची सफर विद्यार्थी शाळेत बसून करतात. शाळेत रेकॉर्डिंग स्टुडिओ उभारला असून, त्या ठिकाणी पाठ्यपुस्तकातील विविध कविता, प्रार्थना, समूहगीते यांना चाली लावून ते रेकॉर्ड केले जाते. या नवोपक्रमास राज्यातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. शाळेतील वीज समस्येवर उपाय म्हणून सोलापूरच्या प्रिसिजन फाउण्डेशनच्या सहकार्याने त्यांनी शाळेत सोलर सिस्टीम बसविलेली आहे त्यामुळे शाळा वीजबिलमुक्त झाली आहे.
शासनाच्या ‘दीक्षा’ व ‘मित्रा’ या अ‍ॅपसाठी त्यांनी डिजिटल शैक्षणिक साहित्य तयार केले आहे. ‘शिक्षककट्टा’ शैक्षणिक ब्लॉग तयार केला असून, स्वत:चे यू-ट्यूब चॅनेल तयार केले आहे. यापूर्वी ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट’ हा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. वर्गात तंत्रज्ञान कसे वापरावे, या विषयावर त्यांनी राज्यभर शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या असून, हजारो शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. लोकसहभागातून उभारलेला राज्यातील पहिला म्युझिक स्टुडिओ हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य. कलेसारख्या दुर्लक्षित विषयाचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी कसा फायदा करून घेता येतो हे या शाळेतील हायटेक रेकॉर्डिंग स्टुडिओ पाहिल्यानंतर लक्षात येते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात महत्त्वपूर्ण योगदान देणारा हा स्टुडिओ चोरीलाही गेला होता. पण तरीही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सहकार्याने सोमनाथ वाळके यांनी हा स्टुडिओ जिद्दीने पुन्हा उभा केला.

रवि भापकर : ‘आॅनलाइन टेस्ट’ हे रवि भापकर यांचे वैशिष्ट्य. पाच वर्षांपूर्वी भापकर यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना खासगी संस्थेच्या स्पर्धा परीक्षेला बसवले होते. त्यावेळी संस्थेने पॅकेजमध्ये एक आॅनलाइन टेस्ट मोफत दिली होती. ही टेस्ट मुलांनी उत्साहाने सोडवली. त्यानंतर दुसºया टेस्टसाठी मात्र संस्थेने १०० रुपये फी ठेवली होती. परंतु ही फी भरणे मुलांना शक्य नव्हते. मुलांची अडचण भापकर यांनी ओळखली. मुलांची ज्ञानाची कक्षा उंचवावी म्हणून गूगल, यू-ट्यूबच्या मदतीने ते स्वत:च आॅनलाइन टेस्ट बनवयला शिकले. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर टेस्ट त्यांनी बनवल्या. विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा म्हणून ब्लॉगची निर्मिती केली आणि त्याद्वारे या टेस्ट राज्यात सर्वांपर्यंत पोहचवल्या. अल्पावधीतच भापकर यांचे हे संकेतस्थळ राज्यातील विद्यार्थ्यांत लोकप्रिय झाले. या संकेतस्थळावर २७ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी व शिक्षकांनी भेटी देऊन लाभ घेतला आहे. विद्यार्थी व शिक्षक यांना सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी. म्हणून त्यांनी www.ravibhapkar.in या संकेतस्थळाची निर्मिती केली. विद्यार्थ्यांसाठी विविध अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप्सची निर्मिती केली. ‘शिक्षणाची वारी’ या शासनाच्या उपक्र मांतर्गत सलग दोन वर्षे राज्यातील विविध ठिकाणी जाऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले. पहिली ते दहावीच्या पाठ्यपुस्तकातील क्यूआर कोडसाठी लागणााºया ‘इ-कण्टेण्ट’ची निर्मिती त्यांनी केली. त्यांनी बनवलेल्या डिजिटल कण्टेण्टचा बालभारतीच्या पुस्तकात वापर होत आहे. शासनाच्या ‘मित्रा’ तसेच ‘दीक्षा’ अ‍ॅप विकसनात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. ग्लोबल नगरी उपक्र मातर्गंत विदेशी भारतीयांशी आपल्या शाळेतील मुलांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचेही आयोजन ते करतात. ‘इनोव्हेटिव्ह एज्युकेटर’ म्हणून मायक्रोसॉफ्टनेही त्यांना गौरवले आहे.
महत्त्वपूर्ण बाब म्हणजे मागील वर्षीचे व या वर्षीचे हे सहाही शिक्षक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत. सर्वजण ग्रामीण भागात काम करतात. कोणतेच प्रोत्साहन, कोणाचेच मार्गदर्शन नसताना स्वयंस्फूर्तीनं आणि स्वयंप्रेरणेने ते शिक्षणात तंत्रज्ञानाचा उपयोग करताहेत. विद्यार्थ्यांना जागतिक प्रवाहात नेताहेत.
ग्रामीण भागातील शिक्षकांच्या जिज्ञासेचा आणि प्रयोगशीलतेचा हा सन्मान आहे. यातून महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा प्रवाह अधिक बळकट होईल यात शंका नाही.
(लेखक आदर्श शिक्षक आणि शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)

manthan@lokmat.com

Web Title: National ICT awad decalred for Maharashtra's three ZP teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.