महात्मा गांधी जयंती विशेष : बापू उत्तर द्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 03:19 PM2017-09-30T15:19:57+5:302017-10-01T06:44:04+5:30

मला खरेच कळत नाही, मी कोणावर विश्वास ठेवू... सगळे जण तुम्हाला नावे ठेवतात. सोशल मीडियात तर तुम्ही पुरते बदनाम आहात. असे असूनही जगातले सारे विद्वान शेवटी तुमच्याच जुनाट विचारांजवळ येऊन का थांबतात? जगाला तुमचाच विचार वाचवेल असे सा-यांना का वाटते? तुमचा विचार मान्य नसलेली माणसेही तुमच्या समोर  कशी झुकतात? ‘भारत म्हणजे गांधींचा देश’ असे आजही का म्हटले जाते?..

Mahatma Gandhi Jayanti Special: Bapu Answer ... | महात्मा गांधी जयंती विशेष : बापू उत्तर द्या...

महात्मा गांधी जयंती विशेष : बापू उत्तर द्या...

googlenewsNext

- जितेंद्र आव्हाड
गांधी, खरे म्हणजे ‘बापू’ म्हणायला हवे होते किंवा ‘महात्मा’; पण तरी मी मुद्दाम ‘गांधी’ म्हणतो आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारतो आहे..
तुमच्याबद्दल इतके बोलले जाते आहे रोज हे तुम्हाला माहीत आहे का? म्हणजे चांगले, वाईट असे दोन्हीही बाजूने बोलले जाते... यातले खरे काय आहे हो गांधी?
सगळ्यात जास्त तुमच्यावर श्रद्धा असणारे खूप आहेत, तुम्ही सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणारेही बहुसंख्य आहेत.
पण मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस कसा वाईट होता, किती नुकसान केले आहे त्याने देशाचे, अगदी देशद्रोही होता हा माणूस, असे बोलणाºयांची संख्या कमी नाही. गंमत म्हणजे यातल्या बहुतेकांनी तुम्ही लिहिलेली एकही ओळ वाचलेली नाही. खरेच तुम्ही देशद्रोही आहात का हो गांधी?
तुमचे चरित्र वाईट होते, असे म्हणणाºयांनी तुमचे एकही चरित्र वाचलेले नाही.
दुसरीकडे तुमच्या काही भक्तांनी तुम्हाला पोथीत बंद केले आहे. तुम्ही परिवर्तन स्वीकारणारे म्हणून प्रसिद्ध. पण, तुमच्याच भक्तांनी तुम्हाला अपरिवर्तनीय करून टाकले आहे. भक्त आणखी काय करतात? तुम्ही नेमके कसे होतात गांधी?
तुमचे नाव अजूनही चलनी नाणे आहे हे तुम्हाला माहीत आहे का गांधी? फक्त राजकारणातच नाही तर व्यवहारातसुद्धा आम्ही चलनाला ‘गांधी’ हा पर्यायी शब्द वापरतो. म्हणून तुम्हाला सतत खिशात ठेवतो आम्ही... हे नेमके काय आहे?
‘मजबूरी का नाम महात्मा गांधी’ हे लहानपणापासून ऐकतो आहे याचा नेमका अर्थ काय आहे हो गांधी? तुम्ही तरी सांगा.
तुमची किती चेष्टा केली जाते हे तुम्हाला माहीत नसेल... किती किती नावाने तुम्हाला संबोधित केले जाते हे तुम्हाला माहीतही नसेल... तुम्ही चेष्टा आणि कुचेष्टेचा विषय आहातच; पण अनेकांच्या द्वेषाचादेखील विषय आहात...
तुम्ही काय काय चुका केल्या ते तुम्हीच लिहून ठेवले आहे; पण, गांधी तुम्हाला माहीत नसलेली अनेक पापे तुमच्या माथ्यावर आम्ही मारून ठेवली आहेत... तुम्हाला ही पापे माहीत आहेत का?
तुम्ही सतत राम नाम जपायचे, अभंग आणि प्रार्थना म्हणायचे म्हणून इथल्या मुस्लिमांनी तुमच्याकडे सतत संशयाने पाहिले. पण, म्हणून हिंदू तुम्हाला आपले मानतात या भ्रमात राहू नका... तुम्ही नेमके कोणाचे होतात हा संशय अजूनही दोघांना आहे... म्हणजे तुम्ही माणूस होतात आणि माणुसकीवर प्रेम करत होतात यावर दोघांचा विश्वास नाही. मग तुम्ही नेमके कोणत्या धर्माचे आहात गांधी?
आइनस्टाईन म्हणाला ते खरे वाटते, की ‘तुम्ही हाडामांसाचे माणूस होतात यावर येणाºया पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत.’ त्याचे हे भाकीत आम्ही खरे ठरवले आहे... तुम्ही नेमके कोण होतात हे सांगा गांधी?
तुम्हाला मारणाºया त्या थोर अमानवाचे पुतळे उभारले तर तुम्हाला नवल वाटायला नको... ही तुम्हाला सूचना आहे. धमकी समजा हवेतर.. तुमच्या सत्याग्रह किंवा उपोषण असल्या फालतू गोष्टींना आता काही किंमत नाही हे तुम्हाला माहीत आहे ना?
मला कळत नाही की गांधी तुमची हत्या केली, तरी तुम्ही संपायला तयार नाही. आम्ही तुम्हाला खूप बदनाम केले तरी तुम्ही त्याला पुरून उरलात.. आम्ही देशातच तुम्हाला खूप बदनाम केले; पण तरी सगळे जग तुमच्या समोर नतमस्तक कसे होते हो?
आम्हाला आमची ओळख सांगण्यासाठी १५ लाखांचा सूट घालावा लागतो आणि तुम्ही फक्त एका वस्त्रानिशी काश्मीर ते कन्याकुमारी कसे फिरत होतात मिस्टर गांधी?
जगात कोणीही असो, ‘भारत म्हणजे गांधींचा देश’ असे कसे म्हणतात हो?
गांधी, तुमचा विचार मान्य नसलेली माणसेदेखील तुमच्या समोर कशी झुकतात हो?
इतके सगळे शोध लागून प्रगती होऊन प्रचंड विकास होऊनदेखील शेवटी सगळे विद्वान तुमच्या जुनाट विचाराजवळ येऊन का थांबतात?
जगाला तुमचाच विचार वाचवेल असे सतत जगाला का वाटते?
तुमच्याशी वैचारिक मतभेद असणारी विचारधारा तुमच्यापुढे नतमस्तक का होते?
डावे म्हणतात की, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही गोंधळलेले होतात..
उजवे म्हणतात की, तुम्हाला इतर धर्माविषयी प्रेम होते.. यातले खरे काय?
तुम्ही नेहमी सत्य बोलायचे असे म्हणतात ते खरे आहे का हो? कारण दिवसभरात आम्ही इतके असत्य बोलतो की कुणी खरे बोलते हेच खोटे वाटते.
मला खरेच कळत नाही गांधी, मी कोणावर विश्वास ठेवू... या सोशल मीडियाच्या जगात तर तुम्ही इतके बदनाम आहात... कितीतरी माणसे तुमच्यावर इतकी तुटून पडतात की, वर्षानुवर्ष तुम्ही त्यांच्यावर केलेल्या अन्यायाविरु द्ध त्यांनी रणशिंग फुंकले आहे असे वाटते... सोशल मीडिया म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का गांधी?
मी खूप सामान्य आहे. नीती, नैतिकता या मार्गावरून मला चालता येत नाही. भ्रष्टमार्ग स्वीकारल्याशिवाय मला उदरनिर्वाह करता येत नाही. पण, मग तरी मी तुम्हाला जाब विचारतो आहे. बोला, उत्तर द्या..
गांधी, असे प्रेमाने आणि करुणेने नका बघू माझ्याकडे, मला नाही सहन होत ते... इतके क्षमाशील असणे बरे नाही गांधी...
द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडणाºयांची आज पूजा केली जातेय. आणि तुम्हांला फाळणीचा गुन्हेगार ठरवले जातेय गांधी... न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा हा देश तुम्हाला देताना तुम्हाला यातना नाही का होत मिस्टर गांधी? इतके सगळे सहन करून तुम्ही सतत इतके हसतमुख, हे सगळं बघून तुम्हाला यातना नाही का होत? की काळाच्या ओघात तुम्हीसुद्धा बदललात?
कसे हसता हो तुम्ही...
तुमची हत्या करणाºया नथुरामाला आदर्श मानणारे आज सकाळीच स्वत:ला साबरमतीचे संत म्हणत तुमच्या पुतळ्याला हार घालून आले, हे तुम्ही पाहिले असेलच.
मिस्टर गांधी, तुम्ही कसे काय इतके सहनशील आहात हो? नथुरामाने तीन वेळा तुमच्यावर हल्ला केला; पण, तीनही वेळेला मोठ्या मनाने तुम्ही त्याला माफ केलेत. त्याच नथुरामाने अखेरीस तुमचा जीव घेतला. तुम्ही अजून इतके सहनशील, सोशीक, क्षमाशील आहात का? कारण आतातर केवळ गोमांस घरी ठेवले या संशयावरून ज्या घरातील एक मुलगा सैन्य दलात देशाची सेवा करतोय त्याच्या बापालाच ठेचून ठार मारले जातेय. तुम्हाला वाटत नाही का, तुमची सोशीकता हा देश विसरला आहे. मिस्टर गांधी, उत्तर द्या.
की६५ वर्षात इथल्या मुर्दाडांच्या प्रमाणे तुमच्याही संवेदना बोथट झाल्यात? बोला मिस्टर गांधी? आज हे प्रश्न तुम्हाला माझ्यासारखे तरुण विचारणार आणि तुम्हाला उत्तर द्यावे लागेल, की तुम्हाला ठाऊक आहे करुणा आणि अहिंसा हेच शाश्वत सत्य आहे? बोला मिस्टर गांधी, उत्तर द्या...
तुम्हांला मारलेल्या बंदुकीतल्या गोळ्या अजूनही संपलेल्या नाहीत. विरोधी विचार ऐकूनच घ्यायचे नाही हे सूत्र आजही भारतात चालू आहे. काल-परवापर्यंत या नामर्दांनी तर हद्दच केली. गौरी लंकेश नावाच्या एका महिला पत्रकाराला सात गोळ्या मारल्या. मिस्टर गांधी, तुम्हाला गोळ्या घालताना जसे त्यांचे हात कापले नाहीत.. तसे या बहिणीला मारतानाही त्यांचे हात कापले नाहीत. रिव्हॉल्व्हरही तेच आणि भेजाही तोच. काही बदललेले नाही.
टीप : एक गोष्ट तितकीच सत्य आहे. हे कोणाला पटो अगर न पटो मिस्टर गांधी... तुमच्या मारेकºयांवरती मनापासून प्रेम करणाºयांना हे कळून चुकले आहे की, हा देश नथुरामाचा नाही, तो गांधींच्याच नावाने ओळखला जातो. त्यामुळे जगभरात फिरताना त्यांना फक्त एकच माल विकायला मिळतो. त्या मालाचे नाव आजही आहे, मोहनदास करमचंद गांधी..
(लेखक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. jsa707@gmail.com)

Web Title: Mahatma Gandhi Jayanti Special: Bapu Answer ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.