ट्रम्प अंकलचं पत्र

By admin | Published: January 7, 2017 12:58 PM2017-01-07T12:58:12+5:302017-01-07T12:58:12+5:30

ट्रम्प याचा संगणक व ईमेल विरोध हा नैतिकतेच्या भूमिकेतून आलेला नाही. तो भीती, सुरक्षा आणि लपवाछपवीच्या मानवी भावनेतून आलेला आहे. आधी एक बडं उद्योगसाम्राज्य उभारणाऱ्या आणि त्यानंतर आता अख्खी अमेरिका नव्याने उभारण्याची घोषणा करणाऱ्या एका सामर्थ्यवान पुरुषाचं हे ‘लडाइटपण’ अस्सल मानवी स्खलनशीलता तर दाखवतंच, पण तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला वाटणाऱ्या एका खोलवरच्या गूढ भीतीचाही प्रत्यय देतं.

Letter of Trump | ट्रम्प अंकलचं पत्र

ट्रम्प अंकलचं पत्र

Next
>विश्राम ढोले
 
हाताने लिहून पोस्टात टाकलेलं तुमचं शेवटचं पत्र केव्हाचं होतं? किंवा बिलं, पत्रिका आणि नोटिसींव्यतिरिक्त तुम्हाला आलेलं ख्यालीखुशालीचं शेवटचं पत्र केव्हाचं होतं? आपण शेवटचं हस्तलिखित पत्र कधी लिहिलं होतं किंवा आपल्याला शेवटचं हस्तलिखित पत्र कधी मिळालं होतं हे बहुतेकांना आता कदाचित आठवणारही नाही. कारण मोबाइल, व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेल, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइन वगैरेच्या या काळात आता पत्र लिहिण्यासाठी कोण कागदाला पेन टेकवतोय? पण अमेरिकेचे होऊ घातलेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचाराल तर ते सांगतील की ते नेहमीच हाताने पत्र लिहितात आणि कुरिअरने पाठवितात. उलट त्यांना शेवटचा ईमेल कधी लिहिला होता हे आठवावे लागेल. इतकंच नाही, तर त्यांनी अलीकडेच सगळ्यांना जाहीर सल्ला दिलाय- ‘काही महत्त्वाचे पत्र असेल तर सरळ हाताने लिहा आणि कुरिअरने पाठवा. जुनी पद्धत आहे ती. पण मी सांगतो, कोणताच कम्प्युटर सुरक्षित नाही.’
आता ट्रम्प महाशयांचं सगळंच उफराटं असतं हे एव्हाना सगळ्या जगाला माहीत झालंय. त्यांचे विचार आणि वागणं गोऱ्या-पुरुषी-संकुचित दृष्टिकोनाचा एक तिरस्करणीय आविष्कार असतो, हेही बऱ्याचदा दिसून आलंय. पण एकविसाव्या शतकातल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी ईमेलला नकार देऊन हाताने पत्रं लिहावी, कुरिअरचा पुरस्कार करावा हे फार विचित्रच वाटतं. विशेषत: मावळते अध्यक्ष ओबामा यांनी तर व्हाइट हाउसचा कारभार अधिकाधिक डिजिटल होण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते, या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे हे विधान म्हणजे डिजिटल घड्याळातील आकडे पुन्हा रिसेट करण्यासारखे आहे. पण ट्रम्प यांना जवळून ओळखणाऱ्यांच्या दृष्टीने हे काही अगदीच नवं किंवा आश्चर्यकारक नव्हतं. ट्रम्प हे जरा ‘लडाइट’ टाइपचे गृहस्थ आहेत हे त्यांच्या जवळच्यांना पूर्वीपासूनच माहीत आहे. आता ही ‘लडाइट’ भानगड काय आहे हे समजून घ्यायचं तर थोडे १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात डोकवावं लागेल. त्या काळात इंग्लंडमध्ये काही मिल कामगारांची आणि कुशल विणकरांची एक आक्रमक चळवळ जोरात चालली होती. औद्योगिक क्रांतीतून निर्माण झालेल्या रोजगाराच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीमुळे आपली पिळवणूक होतेय किंवा रोजगार बुडतोय, असे या चळवळीचे म्हणणे होते. त्याचा निषेध म्हणून ही मंडळी कोणतीही नवी यंत्रं दिसली की त्याची तोडफोड करायचे. नेड लड नावाच्या एका कामगाराने पहिल्यांदा अशी यंत्रं फोडली. म्हणून चळवळीचं नाव लडाइट पडलं. नंतर ती चळवळ तितक्याच हिंसक पद्धतीने दडपून टाकण्यात आली. पण यंत्रांना किंवा नवीन तंत्रज्ञानाला विरोध करणाऱ्यांना ‘लडाइट’ हे नाव पडलं ते कायमचंच. ट्रम्प हे ‘लडाइट’ आहेत ते या अर्थाने. 
ते ईमेल फार क्वचित वापरतात. अनेक वर्षे तर त्यांच्या बड्या कंपनीचा अधिकृत असा ईमेलही नव्हता. ट्रम्प संगणक, लॅपटॉप, टॅब वगैरेही फार वापरत नाहीत. इंटरनेटवर भटकंती करत नाहीत. आज अमेरिकेत जेव्हा तरुण पिढी वृत्तपत्रंच नव्हे तर टीव्हीदेखील मोठ्या प्रमाणावर संगणकावर किंवा मोबाइलवर पाहू लागली आहे, तिथे हे ठिय्या देऊन कागदावर छापलेले पेपर आणि मासिकं वाचतात. नेहमीचा टीव्ही पाहतात. त्यांना ईमेलवर उत्तर देण्याचा प्रसंग आलाच तर आधी मूळ ईमेलची प्रिंटआउट काढतात. त्याच्यावर पेनाने उत्तर किंवा टिपण लिहितात आणि सहायकाला त्याची स्कॅन कॉपी पीडीएफ करून ईमेलवरून पाठवायला सांगतात. हाताने लिहिणं आणि तोंडाने (कसंही) बोलणं यावर त्यांचा जास्त भर. अगदी अलीकडेपर्यंत ते त्यांची पत्रं न्यू यॉर्कमध्ये ८० च्या दशकात लोकप्रिय झालेल्या सायकलस्वारांकडून पाठवत. ‘या संगणकांनी आपलं जगणं खूपच गुंतागुंतीचं करून टाकलंय. तिथं नेमकं काय चाललंय हे कोणालाही सांगता येणार नाही’ असं या एकविसाव्या शतकातील उद्योजक-राष्ट्राध्यक्षाचं म्हणणं.
हे असं असलं तरी ट्रम्प यांचं लडाइटपण जरा वेगळं आहे. ते इतर सर्व बाबतीत संगणक, इंटरनेट वगैरेंबद्दल प्रचंड साशंक असले, तरी लोकांपर्यंत पोहचायचं असेल तर सोशल मीडियाच्या वापराला त्यांची ना नाही. म्हणूनच ते ट्विटरचा प्रचंड वापर करतात. अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यापासून तर त्यांनी ट्विटरचा अतिशय खुबीने वापर करून घेतला. फेसबुक लाइव्ह व्हिडीओचाही ते अधूनमधून वापर करतात. इन्स्टाग्रामवरही असतात. याचा अर्थ सरळ आहे. सार्वजनिक वर्तुळात लोकांपर्यंत पोहचण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास त्यांची ना नाही. पण त्याव्यतिरिक्तच्या व्यवहारांसाठी किंवा खासगी संवादासाठी त्यांचा वापर करायला त्यांचा नकार आहे. एका अर्थाने, नवीन माध्यमांचा वापर ते जुन्या प्रसारमाध्यमांसारखाच करू इच्छितात. 
नव्या संवादमाध्यमांना, तंत्रज्ञानाला बड्या व्यक्तींनी विरोध करण्याची ही काही पहिली वेळ नाही. महात्मा गांधींचाही सिनेमाला विरोध होताच. त्यांना सिनेमा हा पापाचा आविष्कार वाटे. अर्थात त्यांचा सिनेमाविरोध आध्यात्मिकतेवर आधारित नैतिक भूमिकेतून होता. अमेरिकी कवी, लेखक व तत्त्वज्ञ हेन्री डेव्हिड थोरो यांनाही तंत्रज्ञानाबद्दल अढी होती. पण ती निसर्गवादावर आधारित नैतिक भूमिकेतून आली होती. पण ट्रम्प याचा संगणक व ईमेल विरोध हा असा नैतिकतेच्या भूमिकेतून आलेला नाही. तो भीती, सुरक्षा आणि लपवाछपवीच्या मानवी भावनेतून आलेला आहे. आधी एक बडे उद्योगसाम्राज्य उभारणाऱ्या आणि त्यानंतर आता अख्खी अमेरिका नव्याने उभारण्याची घोषणा करणाऱ्या एका सामर्थ्यवान पुरुषाचे हे लडाइटपण एक अस्सल मानवी स्खलनशीलता तर दाखवितेच, पण तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला वाटणाऱ्या एका खोलवरच्या गूढ भीतीचाही प्रत्यय देते.
‘माझ्या मामाचं पत्र हरवलं.. तेच आम्हाला सापडलं’ नावाचा लहान मुलांचा एक गमतीदार खेळ आपल्याकडे पूर्वी खेळला जाई. अमेरिकेत सध्या मोठी मंडळी तो खेळताहेत. आधी हिलरी आण्टींचं ईमेल हरवलं होतं. ते ट्रम्प अंकलना सापडलं. पण आता आपलं पत्र हरवू नये म्हणून ट्रम्प अंकल अख्खं ईमेलचं माध्यमच हरवून टाकण्याचा विचार करीत आहेत. प्रत्यक्षात ते तसं हरवतील ना हरवतील, पण या साऱ्या प्रकारातून निर्माण होणाऱ्या मानवी स्खलनशीलतेच्या, तंत्रज्ञानाबद्दलच्या भीतीच्या प्रश्नाचं उत्तर सापडेल का, हा खरा प्रश्न आहे. 
 
ट्रम्प यांचा बेरकी ‘माध्यमविचार’!
ट्रम्प यांच्या इतर अनेक भूमिका वादग्रस्त आणि बेताल वाटल्या तरी ईमेलसंदर्भातील त्यांचा हा ‘माध्यमविचार’ अगदीच बेताल आहे, असं म्हणता येत नाही. तो अव्यवहार्य असेलही, पण बेरकी आहे. कारण, ईमेल हे वरकरणी आपल्याला खासगीपणाचे, सुरक्षित असल्याचे कितीही आश्वासन देत असले, तरी ते संपूर्णपणे तसं कधीच नसतं. ठरवलं तर ईमेल हॅक करणं फार अवघड नसतं. ईमेलच काय, संगणकावरील कोणताही संवादव्यवहार तसा हॅक करता येऊ शकतो. विकिलिक्स, स्नोडेन प्रकरण आणि अलीकडचं हिलरी क्लिंटन यांच्या खासगी ईमेलचं प्रकरण यातून ते अमेरिकी जनतेला लख्ख दिसून आलंय. हिलरी क्लिंटन यांच्या ईमेल हॅकिंग प्रकरणाला तर खुद्द ट्रम्प यांनीच प्रचाराचा मुद्दा बनवून टाकलं होतं. मंत्री असतानाच्या काळात हिलरी यांनी खासगी ईमेलवरून सरकारी गोपनीय पत्रव्यवहार केला आणि तो बाहेरच्या देशातील (रशिया आणि चीन) गुप्तहेरांनी हॅक केला, असं सांगत ट्रम्प यांनी हिलरींच्या अध्यक्षपदाच्या पात्रतेवर शंका उपस्थित केली होती. काही जणांचं तर असं म्हणणं आहे की, ट्रम्प यांना प्रचारात मुद्दा मिळावा म्हणून ट्रम्पमित्र पुतीन यांनीच क्लिंटन यांच्या ईमेलचं हॅकिंग घडवून आणलं होतं. आता ईमेलच्या सुरक्षेतील ठिसूळपणा इतका जवळून माहीत असताना आधीच ‘लडाइट’ असलेले ट्रम्प कशाला ईमेलचं समर्थन करतील? त्यांच्या ईमेलविरोधाला दुसरंही कारण आहे. न्यायालयीन खटल्याच्या वेळी अशा नाजूक क्षणी किंवा बेपर्वाईने केलेला खासगी ईमेल व्यवहार सज्जड पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. न्यायालयाच्या आदेशानुसार तो सादर करावा लागतो. ट्रम्प यांनी इतर अनेकांच्या प्रकरणात ते पाहिलं आहे. आणि त्यांच्या कंपनीविरोधातील प्रकरणात ते अनुभवलेही आहे. एका प्रकरणात त्यांनाही न्यायालयाने ईमेल उघड करण्यास सांगितले होते. पण कंपनीचा ईमेलच नसल्याने त्यांचे निभावून गेले. त्यामुळे आपल्या खासगी संवादव्यवहाराचे खासगीपण अबाधित ठेवायचे असेल किंवा त्या संवादाचा मागच राहू नये असे वाटत असेल, तर ईमेल हा अधिक मोठ्या जोखमीचा मार्ग आहे, हे डिजिटल युगातील खोलवरचे सत्य ट्रम्प यांच्या बेरकी नजरेने बरोब्बर टिपलं आहे. ईमेलविरोधातील त्यांच्या विधानाला इतरही राजकीय व्यूहरचनेचे अस्तर असलं, तरी त्यातील हा सत्यांश नाकारणं अवघड आहे. 
 
(लेखक समाजसंस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Letter of Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.