पवित्र पर्वत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 01:00 AM2017-08-27T01:00:00+5:302017-08-27T01:00:00+5:30

अरुणाचल म्हटलं की सर्वसामान्य भारतीयांना आठवतं १९६२चं भारत-चीन युद्ध आणि चीनने अरुणाचलवर केलेला दावा. येथील काही नागरिकांना चीनविषयी आस्था असेलही;

Holy mountain! | पवित्र पर्वत !

पवित्र पर्वत !

Next

- समीर देशमुख

अरुणाचल म्हटलं की सर्वसामान्य
भारतीयांना आठवतं १९६२चं भारत-चीन युद्ध
आणि चीनने अरुणाचलवर केलेला दावा.
येथील काही नागरिकांना चीनविषयी आस्था असेलही;
पण वास्तवापासून तर संस्कृतीपर्यंत
अनेक विलक्षण गोष्टी येथे पाहायला,
अनुभवायला मिळतात.

अरुणाचल! म्हणजेच पवित्र लाल पर्वत!’’ हे नाव ‘अरुण’ आणि अचल या दोन शब्दांपासून बनलं आहे. येथील पर्वताचा केवळ पवित्र भूमी म्हणून आदर केला जात नाही तर हे स्थान विश्वातील एक आध्यात्मिक केंद्र बनावं म्हणून या पर्वतांची प्रत्यक्ष देवांनीच स्थापना केली आहे, असा दावा येथील स्थानिक परंपरा करते तसेच पौराणिक कथेनुसार या लाल पर्वताच्या शिखरावर शिवाने एकदा अग्निज्वालेच्या रूपात दर्शन दिलंय.
माणसाच्या वहिवाटीपासून दूर, दुर्गम जंगलात किंवा उत्तुंग हिमालयात नेहमीच भारतातील परम पवित्र लोक वास्तव्य करतात. भारतात त्याला अत्यंत पवित्र मानले जाते, असा हिमालयाचा पूर्वेकडील भाग अरुणाचल प्रदेश.
सर्वसामान्य भारतीयांना या प्रदेशाबद्दल असलेली माहिती म्हणजे १९६२ साली भारत-चीन युद्ध आणि चीनने अरुणाचल प्रदेशावर केलेला दावा आणि तेथील स्थानिक जनता किंवा काही भागातील नागरिकांची चीनविषयी असलेली आस्था. खरे तर हा तमाम भारतीयांचा सर्वात मोठा गैरसमज आहे.
असेही देशभक्ती मोजण्याचे काही परिमाण नसते; परंतु या परिसरातील अगदी शेवटच्या गावातील प्रत्येक नागरिक अस्सल भारतीय आणि देशाची संस्कृती जपणारा आहे. त्यातील लोहित जिल्हा आणि अन्जाव जिल्हा हे खºया अर्थाने भारतातील अति पूर्वेकडील भाग. या ठिकाणी अनुक्रमे मिसमी आणि मेयोर जमाती आढळून येतात. १९०६-०७ या कालखंडातील उपलब्ध माहितीनुसार मेयोर जमातीचे लोक इंडो-तिबेट बॉर्डरवरून या परिसरात आले. मिसमी या जमातीचा उल्लेख लेफ्ट ब्रुलटॉन यांनी १८२५ साली बंगाल रेकॉर्ड्समध्ये केलेला आढळतो. १९६२च्या चीन युद्धानंतर १९६७ साली मोटार जाऊ शकेल असा रस्ता अस्तित्वात आला. त्यानंतर लगेच पुढील वर्षी १९६८ साली या ठिकाणी पंचायत राज्य पद्धत अस्तित्वात आली. १९७० नंतर तेजूपासून हाइलियांगपर्यंत रस्ता पूर्ण करण्यात आला.
या प्रदेशात पोहचण्यासाठी मोहनबाडी विमानतळ किंवा तीनसुखिया रेल्वे स्टेशनपासून आपणास पुढे मार्गक्रमण करता येते. परशुराम कुंड किंवा आलुबारी घाट अशा दोन मार्गाने जाता येते. तेजू येथे पोहचल्यानंतर आपण लोहित जिल्ह्यात पोहोचतो. या भागातील महत्त्वाची नदी म्हणजे लोहित नदी. या नदीचे पाणी अतिशय स्वच्छ आणि निर्मळ असून, वर्षभर वाहती असते. प्लॅस्टिक व प्रदूषण कमी असल्यामुळे नदीचे खरे स्वरूप पहावयास मिळते. पुढे ही नदी ब्रह्मपुत्रेस जाऊन मिळते.
लोहित जिल्ह्यातील मिसमी जमातीत दोन प्रकार असून, एक दिगारन आणि दुसरे मिजू मिसमी आढळतात. त्यांची संस्कृती जरी एक असली तरी भाषेत अंतर आढळते. असेही संपूर्ण प्रदेशात हिंदी भाषा बोलणारे आणि समजणारे बहुतांश लोक आहेत. मूळ मंगोलियन वंशाचे असल्यामुळे फक्त चेहºयाची ठेवण चिनी लोकांशी काही प्रमाणात मिळती-जुळती असते. आम्हा भारतीयांची इथेच मोठी गल्लत होते. येथील पूर्वापार प्रथेनुसार ज्या व्यक्तींच्या घरात मिथुन, हरीण, म्हैस या प्राण्याचे शिर जास्तीत जास्त असतात, तो समाजात सर्वार्थाने श्रीमंत समजला जातो. ही प्रथा ५० वर्षांपूर्वी बºयाच प्रमाणात होती. आज काळानुरूप बराच बदल होतोय.
येथील महत्त्वाचा सण म्हणजे ‘तमलादू’. १५ फेब्रुवारीला तो साजरा केला जातो. या सणामध्ये गावाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. २० फेब्रुवारी हा ‘अरुणाचल प्रदेश दिवस’ म्हणूनही साजरा होतो. येथील समाजव्यवस्थेत काळानुरूप प्रेमविवाहदेखील होत असतात. पारंपरिक पद्धतीत विवाहादरम्यान लग्नाच्या आधी एक दिवस खास सोहळा असतो. त्यात मुलगा-मुलीच्या नातलगांना मिथुन हा प्राणी त्याच्या कुवतीनुसार भेट स्वरूपात देतो. सरासरी ६ ते ८ मिथुन या प्राण्याची देवघेव होते. श्रीमंत व्यक्ती जास्त मिथुनची देवघेव करतात. येथील संस्कृतीत पितळ-तांब्याच्या वस्तूला महत्त्व असून, चांदीचे अलंकार परिधान करण्याकडे जास्त कल असतो.
विशेष म्हणजे मुुलांना आणि मुलींना येथे समान वागणूक दिली जाते. शाकाहार तसेच मांसाहारालाही खाद्य संस्कृतीत प्राधान्य आहे. उकडलेल्या भाज्यांची डिश हा येथील खास आवडता शाकाहारी पदार्थ. तसेच ‘डी.बी.दास’ म्हणजेच डाळ-भात-सब्जी यांचादेखील शाकाहारी भोजनात अंतर्भाव असतो. ‘बटर चहा’ हे येथील आवडते पेय. मीठ-लोणी-दूध यांचे मिश्रण करून बटर चायद्वारे पाहुण्यांचे स्वागत करण्याची प्रथा आहे. विशेष सोहळा असल्यास राइस बिअरलादेखील बरेच प्राधान्य देण्यात येते.
पाणी मुबलक असल्यामुळे स्थानिक रहिवासी शेतीला प्राधान्य देतात; पण शेतीची पद्धत निराळी असते. एका जागेवर सलग दोन वर्षे शेती केल्यानंतर त्याच जागेवर अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून झाडे वाढवण्यावर भर दिला जातो, जेणेकरून निसर्गाचा समतोल राहावा ही यामागची भूमिका. निसर्गाला तुम्ही जेवढं द्याल, त्याच्या दुप्पट तो तुम्हाला देतो अन्यथा केवळ ओरबडण्याचा प्रयत्न केल्यास उत्तरांचल, माळीण, काश्मीरसारखी परिस्थिती उद्भवते हे सर्वश्रुत आहे. अशा पद्धतीने दर दोन वर्षांनी नवीन जागेत येथील लोक शेती करत असतात. मुख्य म्हणजे लोकसंख्येच्या मानाने जमीन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मार्च ते सप्टेंबर हा पावसाळा असतो व आॅक्टोबर ते फे ब्रुवारी हिवाळा.
लोहित जिल्ह्यातून पुढे तेजूमार्गे टी. पी. रोड जंक्शन - ट्रायजॅक्शन -सनंगम - टीडिंग - इथपर्यंत लोहित जिल्हा असून, पुढे अन्जाव जिल्हा सुरू होतो. हा भारताचा अतिपूर्वेचा भाग आहे. दिग्लीयांग - अमलीयांग - खापागेट - स्वामी कॅम्प - हायलियांग सुपलियांग - याढोंग - खुबियांग - लावतुल - चँगविन्टी - हवाई - वॉलाँग - हेलमेट टॉप - किबिथु - डाँग - काहो या अशा छोट्या आणि विरळ लोकवस्तीच्या गावातून पुढील प्रवास करता येतो.
वॉलाँगची १९६२ सालची लढाई अतिशय प्रसिद्ध आहे. वॉलाँग ते तेजू हे २०३ किमीचे अंतर कापून चीनचे सैनिक तेजूपर्यंत आले होते आणि हेलमेट टॉप येथील यलो पिंपल व रेड पिंपल येथे तुंबळ युद्ध घडले होते. कालांतराने आपण वॉलाँग आणि त्याच्या पुढील काही भाग परत मिळविण्यात यशस्वी झालो. वॉलाँग येथे शहिदांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या परिसरात मेयोर जमातीचे वास्तव्य आढळते.
अरुणाचल प्रदेशात दोन डोंगराच्यामध्ये दळणवळणासाठी विशिष्ट प्रकारचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले लाकडी पूल आहेत. इतक्या वर्षांपूर्वीचे हे पूल आजही टिकाऊ आहेत. प्रथमदर्शनी ते कमकुवत भासत असले तरी ज्यावेळी अतिवृष्टी किंवा डोंगर खचल्यानंतर वाहतुकीस अडथळा येतो त्यावेळी हेच पूल ‘लाइफलाइन किंवा संकटकाळी संजीवनी ठरतात.
अरुणाचल प्रदेशच्या प्रत्येक भागातील घरांची रचना अतिशय आकर्षक आहे. प्रत्येक जमातीनुसार त्याच्या घराची ठेवण वेगळी आहे. अब्जाव जिल्ह्यात कोणताही खिळा अथवा दुसरे साहित्य न वापरता घराची बांधणी केली जाते. घराच्या उभारणीत कुठेही साधा छोटा खिळादेखील आढळत नाही. अशा प्रकारास ‘नम’ असे म्हटले जाते.
संपूर्ण अरुणाचल प्रदेशात विशेषत: अति पूर्वेकडील भागात दिवस आणि रात्र वेगळ्या तºहेने होताना दिसते. आपल्या पश्चिमेकडील भागात रेंगाळणारी संध्याकाळ इथे जवळजवळ अपरिचित आहे. इथे सूर्यास्ताला सूर्याचा तेजस्वी अग्निगोळा पश्चिमेकडे जाताना जंगलात उतरत असल्याचं स्पष्ट दिसतं.
गगनाच्या घुमटातून त्याच्या वेगवान प्रयाणाची प्रस्तावना म्हणून तो ढसढशीत केशरी रंग धारण करतो. त्याच्या सभोवलताचं सगळं आकाश इंद्रधनूच्या विविध छटांमध्ये न्हाऊन निघतं. कोणताही कुशल चित्रकार आपल्या कुंचल्याने रंगवू शकणार नाही, अशा रंगाची उधळण तो करतो. ही उधळण म्हणजे आपल्या नेत्रांसाठी सौंदर्याची अनुपम मेजवानीच.
आयुष्याचा आनंद जितका अधिक लुटाल, तितक्या आयुष्यातील संधी वाढतील याचा प्रत्यय इथे येतो..

आगळीवेगळी जमात
लोहित आणि अन्जाव जिल्ह्यात खाम्पतीस या जमातीचे बहुतांश लोक राहतात. अरुणाचलमधील ही महत्त्वाची जमात. १८व्या शतकात म्यानमार येथील इरावडी नदीच्या किनाºयाहून ते येथे स्थायिक झाले. अन्जाव हा भारताचा अतिपूर्वेकडील शेवटचा जिल्हा. खाम्पतीस ही त्यांची स्वत:ची भाषा आहे. आसामी भाषाही त्यांना समजते. शेती हा मुख्य व्यवसाय. चहाचे उत्पादनही ते आता घ्यायला लागलेत. या जमातीचे मुख्य अन्न भात. त्यासोबत उकडलेल्या भाज्या किंवा मांसाहारी पदार्थाचे सेवन करतात. ‘सांकेन’ हा महत्त्वाचा सण १४ एप्रिल रोजी साजरा करतात. या जमातीत बहुतांश लोक बुद्धिस्ट आहेत. भारतातील उत्कृष्ट दर्जाचे संत्री व वेलदोडा यांचेदेखील या भागात उत्पादन होते. इथले लोक राइस बिअरचे शौकिन आहेत. स्थानिक भाषेत त्याला अपाँग म्हणतात. पुरुष जो वेश धारण करतात त्याला सिऊपचाई असे आणि स्त्रिया जो वेश परिधान करतात त्याला सिऊपसाओ किंवा फमाई असे म्हणतात.

Web Title: Holy mountain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन