Happy fun | आनंदी आनंद
आनंदी आनंद

डॉ. यश वेलणकर
प्रत्येकानं आपापलं ध्येय ठरवलेलं असतं. ते ध्येय, तो टप्पा गाठला की आपल्याला आनंद होतो. त्या टप्प्यावर आपण पोहोचू शकलो नाही तर आपल्याला दु:ख होतं. पण या दोन्ही टप्प्यातल्या प्रवासाचा आनंद आपण घेतच नाही. आपलं मन क्षणस्थ ठेवायला आपण शिकतो, ते सजगतेच्या अभ्यासातून.
मग सारा प्रवासच आनंददायी होऊन जातो !

सध्या आनंद या भावनेचे संशोधन केले जात आहे, कारण भौतिक प्रगती झाली तरी माणसे अधिक आनंदी होताना दिसत नाहीत. जगभरात औदासीन्य हा आजार वाढतो आहे, आत्महत्या अधिक होत आहेत, व्यसनाधिनता वाढत आहे. उपभोगाची हाव माणसाला आनंदी करीत नाही. खरा आनंद कसा मिळू शकेल याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी युनोच्या पुढाकाराने जागतिक आनंद दिन साजरा केला जाऊ लागला आहे.
माइंडफुलनेसच्या सरावाने माणूस अधिक आनंदी राहू शकतो असे दिसत आहे. माइंडफुलनेस म्हणजे पाली भाषेत सती किंवा संस्कृतमध्ये स्मृती होय. या तंत्राचा शोध सिद्धार्थ गौतमाने दु:खमुक्तीच्या प्रयत्नातून लावला. त्यामुळे त्याच्या अभ्यासाने दु:ख कमी होऊन आनंद वाढू शकतो हे स्वाभाविक आहे. अमेरिकन टीव्हीवरील लोकप्रिय अ‍ॅँकर- जर्नालिस्ट डेन हॅरीस यांनी माइंडफुलनेसचा अभ्यास केला आणि त्यांच्या अनुभवावर आधारित पुस्तक लिहिले त्याचे नाव त्यांनी ‘टेन पर्सेंट हॅपियर’ असेच ठेवले आहे. सध्या पॉझिटिव्ह सायाकोलॉजीमध्ये ‘निरोगी आनंद’ यावर खूप संशोधन होत आहे. त्यासाठी अनेक माणसांचा, त्यांच्या भावनांचा अभ्यास केला जात आहे. त्यांच्या सवयी, त्यांचा दृष्टिकोन तपासला जात आहे.
सर्वजण हा सच्चा आनंद अनुभवू शकतो, पण त्यासाठी आपल्याला खालील सवयी आत्मसात कराव्या लागतील. कारण जे सच्चा आनंद अनुभवतात त्यांना या सवयी असतात असे
आजचे संशोधन सांगते. आनंद ही प्रतिक्रि या म्हणून निर्माण होणारी भावना नसून आनंदी राहता येणे हे कौशल्य आहे. खालील सवयी आत्मसात केल्या तर कुणीही या आनंदाचा अनुभव घेऊ शकते. या सवयी आत्मसात करण्यासाठी सजगता उपयोगी ठरते.
१ आनंदी व्यक्ती गंतव्य स्थानापेक्षा प्रवासाचाही आनंद घेऊ शकतात. आपण एखादे ध्येय ठरवतो आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. ते ध्येय प्राप्त झाले तर आनंदी होतो नाहीतर दु:खी होतो. एक ध्येय प्राप्त झाले की पुढील ध्येय दिसू लागते. पण त्यामुळे आपण त्यावेळच्या आनंदाला पारखे होतो. आनंदी माणसे मात्र त्या ध्येयप्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद घेऊ शकतात. सजगतेने आपण आपले मन क्षणस्थ ठेवायला शिकत असतो, त्यामुळे प्रवासातील प्रत्येक क्षण आनंद देणारा होतो.
२ आनंदी माणसांना स्वत:च्या सिग्नेचर स्टेÑंथ कळलेल्या असतात. आपली सिग्नेचर, सही जशी आद्वितीय असते तशाच आपल्यातील कौशल्यांचे आणि गुणांचे कॉम्बिनेशन अद्वितीय असते. जगातील दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीत तसे कॉम्बिनेशन नसते. प्रत्येक व्यक्ती अद्वितीय, तिच्यासारखी तीच असते. आनंदी व्यक्तींना त्यांचे अद्वितीयत्व समजलेले असते. त्यामुळे ते दुसºया व्यक्तीशी स्वत:ची तुलना करून दु:खी होत नाहीत. सजगतेच्या अभ्यासाने माणसाचे आत्मभान वाढते. त्यामुळे त्याच्या क्षमता आणि मर्यादा समजू लागतात, सिग्नेचर स्ट्रेंथ समजते.
३ या सिग्नेचर स्ट्रेंथचा उपयोग करून आपल्या आयुष्यात काय काय करता येऊ शकते, म्हणजेच हे आयुष्य कशासाठी आहे, या आयुष्याचे प्रयोजन काय आहे याचे आकलन आनंदी माणसांना झालेले असते. असे आकलन झाले की अडचणी दु:ख निर्माण करू शकत नाही. त्यांच्याकडे आव्हान, चॅलेंज म्हणून पाहिले जाते.
४ त्यांना स्वत:च्या शक्ती आणि मर्यादा यांची जाण असल्याने इतरांच्या नकारात्मक कॉमेंट्सनी, निंदेने ते दु:खी होत नाहीत आणि स्तुतीने शेफारून जात नाहीत.
५ ते सजगतेने वर्तमानाचा आनंद घेतात. एखाद्या कृतीत माणूस एकतान होतो त्यावेळी तो आनंद अनुभवत असतो. याला ‘फ्लो स्टेट’ म्हणतात. त्यावेळी मनात अन्य कोणतेही विचार असत नाहीत. मन विचारात भरकटलेले असते, त्यावेळी ते आनंदी नसते.
६ ते एकटे राहण्याचा आनंद घेऊ शकतात, पण ते एकलकोंडे नसतात. अनेक सहकारी आणि मित्र ते मिळवतात. असहाय्यतेची भावना त्यांना नसते.. होपलेसनेस आणि हेल्पलेसनेस हे आनंदाचे शत्रू आहेत हे त्यांनी ओळखलेले असते.
७ अशा लोकांनादेखील अपयश येते, आजार होतात, फसवणूक होते, या व्यक्तीही चुका करतात, त्यांचे अंदाज चुकीचे ठरतात. पण त्यामुळे ते खचून जात नाहीत. आयुष्याचा अर्थ गवसलेला असल्याने त्या दिशेने ते पुन्हा सक्रि य होतात.
८ आनंद बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसतो, ती मनाची स्थिती आहे. कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहण्याची निवड करता येते हे त्यांना पटलेले असते आणि तशी निवड ते करीत असतात. त्यासाठी आवश्यक साक्षीभाव त्यांनी वाढवलेला असतो. असा साक्षीभाव वाढवणे हाच माइंडफुलनेसचा उद्देश आहे.
९ या व्यक्ती केवळ स्वत:च्या आनंदाचा विचार करीत नाहीत. प्रेम आणि करु णा यांनी प्रेरित होऊन त्या इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतात. हे प्रयत्नच त्यांच्या आयुष्याला अर्थ देतात. आपल्या सिग्नेचर स्ट्रेंथ वापरून हे जग अधिक चांगले करण्याचे त्यांचे प्रयत्न त्यांना खºया आनंदाचा अनुभव देत असतात. सजगतेच्या नियमित अभ्यासाने अहंकार, द्वेष, मत्सर कमी होतो असे रिची डॅनियल यांनी केलेल्या मेंदूच्या संशोधनात दिसते.
१० कोणत्याही परिस्थितीत स्वत: आनंदी राहणे सजगतेने शक्य आहे. पण दुसºयाच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची क्षमता आणि कौशल्य हे अद्भुत परमानंदाला जन्म देते. माइंडफुलनेसच्या अभ्यासात करुणाध्यान करायचे असते. असे ध्यान दुसºयाचे दु:ख दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देते. आधुनिक संशोधनात दिसून येणारे हे सत्य बालकवींनी ‘आनंदी आनंद गडे’ या कवितेत सांगितले होते.
स्वार्थाच्या बाजारात
किती पामरे रडतात,
त्यांना मोद कसा मिळतो,
सोडून स्वार्थ तो जातो.
द्वेष संपला, मत्सर गेला,
आता उरला जिकडे तिकडे चोहीकडे
आनंदी आनंद गडे
माइंडफुलनेसचा नियमित सराव केला तर आपण सर्वजण या आनंदाचा अनुभव घेऊ शकतो.


Web Title: Happy fun
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.