सर्पराज्ञीत कोल्ह्याच्या सोनेरी स्मृती अद्यापही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 06:13 PM2018-12-24T18:13:25+5:302018-12-24T18:13:57+5:30

निसर्गाच्या कुशीत : बालपणीच्या गोष्टीतल्या चतुर, धूर्त, कपटी, लबाडीच्या कथा आपण ज्या प्राण्याबद्दल वाचत व ऐकत आलो आहोत, असा कोल्हा हा प्राणी. अशाच एका सोनेरी कोल्ह्याच्या सर्पराज्ञीतील सोनेरी स्मृती माझ्या मनात कायम आहेत. प्रत्यक्षात सहवास देऊन चटका लावून गेलेल्या या मुक्या जिवाविषयी...

The golden memories of the fox still retains sarprandny | सर्पराज्ञीत कोल्ह्याच्या सोनेरी स्मृती अद्यापही कायम

सर्पराज्ञीत कोल्ह्याच्या सोनेरी स्मृती अद्यापही कायम

Next

- सिद्धार्थ सोनवणे

गोमळवाडा (ता. शिरूर, जि. बीड) येथील शेतकरी भागवत काकडे यांच्या विहिरीत कोल्हा पडला असल्याची माहिती मिळताच मी व माझे मित्र इतेश चव्हाण, चंद्रकांत औसरमल, समीर पठाण व वनकर्मचारी शिवाजी आघाव घटनास्थळी गेलो. हा कोल्हा ५० फूट खोल विहिरीतून वर येण्यासाठी धडपडत होता. विहिरीत उतरून त्याला पकडणे धोक्याचे असल्याने वाघुरीने (जाळ्याने) पकडण्याचे ठरवले. त्यानंतर मी मित्रांच्या मदतीने हळूहळू विहिरीत वाघूर सोडत होतो. वाघूर कोल्ह्याच्या जवळ जात होती तसा हा कोल्हा वाघुरीवर धावून येत होता. 

कोल्हा वाघुरीच्या जवळ येताच मी वाघूर त्याच्या बरोबर अंगावर सोडली. तसा तो चवताळून स्वत:ला सोडवून घेण्याच्या धडपडीत वाघुरीत जास्तच अडकून गेला. त्यानंतर त्याला वर काढले. बाहेर आल्यानंतर तो आमच्याही अंगावर धावून येत होता. त्यामुळे मित्रांनी त्याच्या तोंडावर पोते टाकून वाघुरीतून त्याला बाहेर काढले. तो चांगलाच जखमी झालेला होता. नाका-तोंडातून, डाव्या पायातून रक्त वाहत होते. त्याच्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे असल्याने त्याला पोत्यात टाकून मी आणि वनकर्मचारी शिवाजी आघाव मोटारसायकलवर घेऊन शिरुर कासार येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आलो. 

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. वाघमारे व डॉ. आंधळे यांनी त्याच्यावर उपचार केले. त्यानंतर आम्ही त्याला सर्पराज्ञीत आणून पिंजऱ्यात मोकळे सोडले. तो एका कोपऱ्यात जाऊन आमच्याकडे पाहत बसला. त्याला सृष्टीने प्यायला पाणी आणि खायला मटण, बोरे टाकली. कोल्हा हा निव्वळ मांसाहारी प्राणी नाहीत. तो फलाहारही करतो. त्यामुळे कोल्ह्याकडून निसर्गातील सफाईचे काम तर होतेच. शिवाय जंगल निर्मितीचे कार्यही अविरत चालू राहते. 

दुसऱ्या दिवशी त्याने त्याला टाकलेले खाद्य संपवले होते आणि पहिल्यासारखा तो घाबरत नव्हता. तो आमच्याकडे प्रेमाने पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर क्रू रता दिसून येत नव्हती. आम्ही आमच्याकडे उपचारासाठी आणलेल्या प्रत्येक प्राण्याला नाव ठेवतो आणि त्याला त्याच नावाने बोलत राहतो. ‘जॉकी’ असे नाव या कोल्ह्याला आम्ही देऊन टाकले. ५-६ दिवसांतच जॉकी आमचा चांगलाच सोबती झाला. आता त्याला उपचारासाठी पकडण्याची गरज नव्हती. बोलत बोलत मी त्याच्या जवळ जायचो. त्याला मानेजवळ हळूहळू कुरवाळत मांडीवर घ्यायचो. सृष्टी मग खुशाल त्याची मलमपट्टी करायची.

१५ दिवसांनंतर त्याची जखम पूर्ण बरी झाली होती. त्याला आता निसर्गात मुक्त करणे गरजेचे होते. त्यामुळे मी व वनकर्मचारी शिवाजी आघाव त्याला मोटारसायकलवर घेऊन जंगलात गेलो. जंगलात सोडताच तो थांबून एकटक माझ्याकडे पाहत राहिला. नंतर हळूहळू जंगलाच्या दिशेने चालू लागला. पुढे काही अंतरावर गेल्यावर आणखी एकदा पाहून त्याने आमचा निरोप घेतला. 

Web Title: The golden memories of the fox still retains sarprandny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.