नदीच्या अस्तित्वाचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 02:00 AM2017-08-27T02:00:00+5:302017-08-27T02:00:00+5:30

कोणीच हीरो नाही, कोणी हिरोइन नाही. नदी हीच मुख्य व्यक्तिरेखा आणि तिच्या अस्तित्वाभोवती फिरणारं कथानक. आपलं गाव आणि गावपण जिवंत राहण्यासाठी

The fight of the existence of the river | नदीच्या अस्तित्वाचा लढा

नदीच्या अस्तित्वाचा लढा

Next

- मनस्विनी प्रभुणे-नायक

कोणीच हीरो नाही,
कोणी हिरोइन नाही.
नदी हीच मुख्य व्यक्तिरेखा
आणि तिच्या अस्तित्वाभोवती
फिरणारं कथानक.
आपलं गाव आणि गावपण
जिवंत राहण्यासाठी
गावातून वाहणारी ही नदी.
या नदीचं काय होणार
या उत्सुकतेनं आपणही
तिच्याबरोबर प्रवास करतो..



नशीबवान असतात ती माणसं ज्यांच्या गावातून खळाळणारी नदी वाहते. गावाचं गावपण टिकवून ठेवणारी नदी ज्यांच्या गावातून वाहत नाही त्यांना नदीबद्दल काय वाटत असेल? त्यांना नदीची उणीव कधी भासली असेल का? नदीवर अवलंबून असणारं लोकजीवन त्या गावात कशावर अवलंबून असेल? नदीचा विचार करत असताना असे प्रश्न अनेकदा पडतात.
सगळ्यांना आपलंसं करणारी, सर्वांना सामावून घेणारी नदी म्हणूनच सामदायिनी ठरते. ओसंडून वाहणाºया नदीकाठी बालपण गेलेलं असल्यामुळे नदीबद्दल एक अनामिक आकर्षण, ओढ वाटत राहिलंय.
गोनिदांनी (गो.नि. दांडेकर) आमच्या नदीला ‘पवनाकाठचा धोंडी’मधून अजरामर करून टाकलंय. हीच ती पवना नदी आमच्या गावातून अगदी बाराही महिने वाहते. तिची अनेक रूपं डोळ्यात साठवत मोठी झाले. बालपणात तिच्याविषयी वाटणारी भीती वयपरत्वे कमी झाली आणि गूढता वाढू लागली. नदीबद्दलचं हेच आकर्षण, गूढता ‘नदी वाहते’ हा चित्रपट बघण्यासाठी पुरेसं ठरलं.
‘नदी वाहते’ या नावातच सारं काही येतं. कधी खळाळत वाहणारी तर कधी स्थितप्रज्ञासारखी वाटणारी, अनेकांना जीवन देणारी ही जीवनदायिनी अशी आपली अनेक रूपं घेऊन ती ‘नदी वाहते’ या चित्रपटात दिसते. हा चित्रपट कोणत्याही मोठ्या नदीवर नाहीतर आपल्या गावातून वाहणाºया छोट्याशा; पण तितक्याच महत्त्वाच्या नदीवर भाष्य करतो. तिच्या अनेक प्रतिमा जाग्या करतो. नदीच्या अस्तित्वाबद्दल काळजीची जाणीव निर्माण करतो.
संदीप सावंत दिग्दर्शित या चित्रपटात नदीची नुसतीच अनुभूती राहात नाही तर ती आपल्या मनाचा, विचारांचा हळूहळू ताबा घेते. नदीचं अस्तित्व या दोन्ही पातळींवर भरून राहतं. काहीसं आपल्याला अस्वस्थ करून सोडतं. ‘नदी वाहते’ हा चित्रपट नुकताच बघायला मिळाला. ‘श्वास’ या चित्रपटानंतरचा संदीप सावंतचा हा दुसरा चित्रपट असल्याने त्यामुळेही उत्सुकता होती. एका दीर्घ विश्रांतीनंतर साकारलेल्या त्याच्या या कलाकृतीची अनेकजण वाट बघत होते. संदीप या चित्रपटाचा दिग्दर्शकही आहे शिवाय तो आणि नीरजा पटवर्धन हे दोघे या चित्रपटाचे निर्मातेही आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयीचा या दोघांचा अनुभव खूप बोलका होता, जो पडद्यावरही तसाच बघायला मिळाला. आजच्या घडीला बहुतेक सर्व नद्यांची झालेली, होऊ घातलेली अवस्था यात चितारली गेली आहे. गोवा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातून वाहणाºया म्हदई नदीचा वाद सध्या गाजत असताना त्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बघायला मिळाला. थेट म्हदई नदीवर हा चित्रपट नसला तरी गोमंतकीय प्रेक्षक आपोआप या विषयाशी जोडले गेले. ‘म्हदई बचाव’ किंवा ‘नर्मदा बचाव’ आंदोलनाची तीव्रता हा चित्रपट बघत असताना जाणवत जाते आणि पडद्यावर सरकणारी चित्रकथा आपलीच वाटू लागते.
आपलं गाव, त्याचं गावपण जिवंत राहण्यासाठी गावातून वाहणारी नदी जिवंत राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. गावात मोठे प्रकल्प आले तर गावाचा विकास होणार. गावातल्या युवकांना रोजगार मिळणार अशा पद्धतीच्या होणाºया प्रचाराला, भूलथापांना भाळून न जाता नदीला वाहतं ठेवण्यासाठी शांतपणे प्रयत्न करणारे अनेक कार्यकर्ते यानिमित्ताने डोळ्यासमोर उभे राहिले. नदी हीच चित्रपटाची मुख्य व्यक्तिरेखा आणि तिच्या अस्तित्वाभोवती फिरणारे कथानक शेवटपर्यंत नदीचं काय होणार याची उत्सुकता ताणून धरतं. मोठ्या धरणांऐवजी छोटी धरणं बांधणं कसं जास्त योग्य आहे हेही यातून उमजत गेलं. हा चित्रपट बनवणं तसं सोप्पं नव्हतं. कोणतीही नाट्यमयता नसताना विषयाला न्याय देऊन प्रेक्षकांना गुंतवून ठेवणं तसं अवघड काम आहे. संदीप सावंत यांनी कथा-पटकथा तयार करण्यापूर्वी या विषयावर भरपूर संशोधन केलंय हे अनेकदा जाणवत राहतं. पाणी-नदी विषयातले तज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या बरोबर झालेल्या चर्चादेखील संशोधन टप्प्यावर खूप उपयोगी पडलं असणार. संदीप सावंत यांनी श्वास चित्रपट लोकसहभागातून बनवला. हा चित्रपटदेखील त्याच पद्धतीने बनवला आहे. चित्रपटाचा विषयदेखील तसाच आहे. छोट्यातल्या छोट्या गावातल्या लोकांपर्यंत चित्रपट पोहचावा यासाठी संदीप सावंत आणि नीरजा पटवर्धन विशेष प्रयत्नशील आहेत.
जिथे नदी तिथे मनुष्य वसाहत हे सूत्र अगदी आदिम काळापासून राहिलंय तर मग आताच का यात बदल होऊ लागलाय असा प्रश्न हा सिनेमा बघताना पडतो. पूर्वी सगळं गाव नदीशी जोडलेलं असायचं. सकाळी-संध्याकाळी गावातला कोळी समाज मासे पकडायला नदीवर जायचा. सकाळी बायका कपडे धुवायला जायच्या. अनेकजण अंघोळीसाठी नदीवर जायचे. संध्याकाळी थोडं ऊन कललं की नदीकाठी गप्पांचे फड जमू लागायचे. बहुतेक गावात स्मशानभूमीदेखील नदीकाठीच आहे.
..म्हणजे काय तर गावाचे अनेक व्यवहार नदीशी जुळलेले असायचे. हळूहळू हे चित्र बदलू लागलंय. गावातून नदीच नाहीशी होऊ लागलीय. गंगेसारख्या मोठ्या नदीची फार चांगली अवस्था नाही तिथे बाकीच्या छोट्या नद्यांची अवस्था कशी असणार? सरस्वती नदी लुप्त झाली, पुण्यात राम नदी नावाची नदी होती हेदेखील अनेकांना माहीत नाही. मुंबईतील मिठी आणि गोव्यातील साळनदी या नदी न राहता त्यांचे नाले झाले आहेत. ही फक्त माहीत असलेली उदाहरणं आहेत. माहीत नसलेल्या अनेक नद्या आज याच वळणावर येऊन पोहचल्या असतील.
हे मात्र अगदी पक्कं आहे की ‘नदी वाहते’ बघताना आपल्याला आपल्या गावाची, गावातल्या नदीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. चित्रपटात कोणताही ग्लॅमरस चेहरा नाहीये. कोणी हीरो नाही. कोणी हिरोईन नाही. गाणं नाही; पण जयराज जोशी आणि तुषार कामत या युवा संगीतकारांनी चित्रपटातील वातावरणाला साजेसं संगीत दिलंय. खºयाखुºया पक्ष्यांचे, नदीच्या खळाळणाºया प्रवाहाचे आवाज कितीतरी वेळ कानात साठवून ठेवावसे वाटतात. प्रत्येक गावात असतात तशी काही नतद्रष्ट मंडळी यातही आहेत; पण कट-कारस्थान करणारे खलनायक नाहीत तर विषय आणि त्यातील व्यक्तिरेखांना न्याय देतील अशा कलाकारांनी आणि त्याहीपेक्षा कलाकार कार्यकर्त्यांनी ‘नदी वाहते’ हा चित्रपट साकारलाय. त्यामुळेही हा विषय आपल्या मनाशी भिडतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात कुठेही कृत्रिम नाट्यमयता नाही. कथानकाला कुठेही उगाचंच विषय सोडून भरकटू दिलं नाही. यातले कलाकार आणि निवडलेलं गाव, त्या गावातील माणसं यांची सुंदर सांगड घातली गेलीय.
कलाकार कोणी उपरे न वाटता त्याच गावातले, त्याच माणसांमधले वाटतात. कलाकारांची वेशभूषा कथानकाला साजेशी. मेकअपचा लवलेशही नाही. याचं सगळं श्रेय कलादिग्दर्शन आणि वेशभूषा या दोन्ही बाजू सांभाळणाºया नीरजा पटवर्धनला जातं. काही पात्रं साकारणाºया व्यक्ती त्या गावातल्याच होत्या त्यामुळे चित्रपट वास्तवाच्या अधिक जवळ जातो. पूनम शेटगावकर, वसंत जोसाळकर, आशा शेलार, हृदयनाथ जाधव, जयंत गडेकर, गजानन झारमेकर, विष्णुपद बर्वे ही सारी मंडळी कलाकार वाटतच नाहीत ती त्या गावातलीच वाटतात. विशेषत: पूनम शेटगावकरने निसर्गाच्या, नदीच्या रक्षणासाठी झपाटून काम करणारी व्यक्तिरेखा छान साकारलीय. तिच्याच वयाच्या लग्न करून सासरी जाणाºया मुली आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी भान विसरून काम करणारी ती, अशा व्यक्तिरेखेला तिने न्याय दिलाय.
चित्रपट बघत असताना गोव्याच्या सीमेवर महाराष्ट्राच्या हद्दीत असलेल्या झराप गावातील डॉ. प्रसाद देवधर, म्हदई नदीसाठी लढणारे राजेंद्र केरकर, नैसर्गिक तळी, झरे, नद्या यांचे संवर्धन करणारे सवाईवेरे गावचे दत्ताराम देसाई आणि त्यांच्या जलयात्रा या उपक्र मातील अनेक कार्यकर्त्यांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. शाश्वत विकास म्हणजे काय हे या चित्रपटातून समोर येतं. या कार्यकर्त्यांनाच आपण पडद्यावर बघत असतो. सुरुवातीला काहीसे त्रयस्थ राहून चित्रपट बघणारे आपण हळूहळू याच्या कथानकात, विषयात गुंतत जातो आणि खरंच नदी वाहती राहिली पाहिजे असं आपल्यालाही वाटू लागतं हेच या चित्रपटाच्या यशाचं गमक आहे.
हा चित्रपट म्हणजे नदीच्या अस्तित्वासाठी शांतपणे सुरू असलेला लढा वाटतो. असा विषय निवडणं आणि तो तितक्याच ताकदीने पडद्यावर उभं करणं एक मोठं अवघड काम होतं. हे आव्हान समर्थपणे पेललं गेलंय.

Web Title: The fight of the existence of the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी