‘विचार’ करायचा! पण कसा, ते माहीत आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2021 06:00 AM2021-11-07T06:00:00+5:302021-11-07T06:00:02+5:30

विचार सारेच करतात, पण ते सकारात्मक, कार्यप्रवण करणारे आहेत का हे महत्त्वाचे. त्यासाठी काय कराल?

Do you know how to think? | ‘विचार’ करायचा! पण कसा, ते माहीत आहे?

‘विचार’ करायचा! पण कसा, ते माहीत आहे?

googlenewsNext
ठळक मुद्देविचार नकारात्मक किंवा होकारात्मक नसतात. विचार दिशादर्शक असतात. कोणत्याही कृतीचा पाया विचारांवर अवलंबून असतो.

डॉ. राजेंद्र बर्वे

‘मला आता ना कंटाळा आलाय. काय आहे, की कोविडच्या काळात आम्हाला मानसिक धक्के बसले. माझ्या भावाची बायको वारली. मला स्वत:ला, बायकोला आणि विराजला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. खूप त्रास झाला. आता आम्ही ठीक आहोत, पण विराज आता २४-२५ वर्षांचा आहे. मला रिटायर व्हायला अजून काही वर्षे आहेत. विराजच्या आईनं आधीच निवृत्ती स्वीकारली. आम्ही तसे खाऊन पिऊन सुखी आहोत.’ - विराजचे बाबा म्हणाले.

विराजची चुळबूळ होत होती आणि त्याच्या आईच्या चेहऱ्यावर ‘या दोघांची भांडणं काही मिटायची नाहीत’, असे अविर्भाव होते.

‘बाबा म्हणतात, ते सर्वस्वी खरं नाही. बाबांचा स्वभाव मुळातला तसा नकारात्मक आहे. कोणत्याही गोष्टीचा विषय काढा, यांचा अडचणींचा पाढा सुरू. मीही वैतागलो आहे.

‘खरं सांगू, बाबांच्या स्वभावात सरकारी खाक्या आहे. कोणत्याही गोष्टीत काय अडथळे येतील, इथून सुरुवात करतात. बरं, त्यातून मार्ग कसा काढावा असं विचारलं तर गप्प बसतात. त्यांना काय, शेरे मारून फायली वर सरकवायची सवय.’ विराज चिडून बोलत होता. विराजच्या आईनं त्याच्या पाठीवर हात ठेवला, ‘अरे किती केलं तरी वडील आहेत तुझे !’ विराजनं काही उत्तर दिलं नाही, ‘पण काय मोठी मुलुखगिरी केली त्यांनी?’ असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते.

‘परंतु प्रश्न काय आहे?’ मी विचारलं. प्रश्न खरं मुळीच नाहीये. मी विराजला म्हणतो, तू स्पर्धा परीक्षा दे. सरकारी नोकरी मिळून जाईल. हुशार इंजिनिअर आहे तो !

‘मला सरकारी नोकरी नको, मला नाकरीच नाही करायची. मी स्वत:चा उद्योग सुरू करू इच्छितो. दोन मित्र आहेत बरोबर. आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतोय. लोन पण मिळू शकेल असं दिसतंय, पण यांचा खोडा आहे ना!! धंदा बुडाला तर काय? धंद्यात पडतो आहेस, कशावरून बुडणार नाहीस?...’

यानंतर विराजनं त्याच्या नव्या प्रोजेक्टविषयी उत्साहानं माहिती दिली. त्याच्या बोलण्यात तडफदारपणा होता. निश्चित व्हिजन आणि दिशा होती. आपण यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास दिसत होता.

विराजच्या बाबांच्या चेहऱ्यावर मात्र आठ्यांचं जाळं पसरत होतं. ते मान डोलावून ‘नाही, नाही’ असं सुचवत होते.

त्या प्रोजेक्टमधला विषय बराच गहन होता. म्हणजे त्याच्या वडिलांना ते नक्कीच कळत नसावं आणि ‘मुक्त श्वासासाठी’, त्या प्रोजेक्टचे तपशिल महत्त्वाचे नव्हते.

प्रश्न खरं म्हणजे प्रोजेक्टच्या कार्यवाहीच्या आश्वासकतेचा (फिजिबिलिटी रिपोर्ट) नव्हता किंवा तांत्रिक बाबींचा नव्हता.

खरी समस्या होती, विराजच्या बाबांच्या दृष्टीकोनाची, विराज आणि त्याचे बाबा दोन टोकाच्या भूमिका घेत होते. ‘यातून मध्यम मार्ग काढायला हवा’ विराजची आई म्हणाली.

मान डोलावून मी म्हटलं, ते ठीक आहे, पण खरा प्रश्न परस्पर समजुतीचा नाहीये. परस्पर विरोधी भूमिका असल्या तरी परस्परपूरकता शोधणं महत्त्वाचं आणि एकमेकांच्या टोकाच्या विचारांमधून काय शिकता येईल, कसं शिकता येईल, याचा आहे.

मुळात ‘प्रश्न विचारांचा नाहीच. विराज आणि त्याचे बाबा या दोघांचे विचार आपापल्या परीने योग्य आहेत. प्रश्न विचारांचा नसून विचार कसा करायचा? वैचारिक पातळीवर निष्कर्ष न काढता युक्तिवाद कोणते आहेत? त्या युक्तिवादाच्या त्रुटी कोणत्या? तर्कनिष्ठ वाटणारे विचार वास्तविक असतातच असं नाही.

विचारांना प्रेरणा देणाऱ्या, विचारांना पुढे नेणाऱ्या प्रवृत्ती आणि भावना कोणत्या आहेत? त्या नकारात्मक आहेत की, ‘होकारात्मक’ हा प्रश्न गौण असून, त्या सकारात्मक आहेत का? त्या कार्यप्रवणता निर्माण करत आहेत का? हे महत्त्वाचं असतं आणि होकारात्मक विचार की नकारात्मक विचार यांच्यातला संघर्ष सोडून सकारात्मक विचार कसे करायचे, हे शिकायला हवं!

विराजचे बाबा एकदम ताठ बसले. ‘परत सांगा...’ आपल्याला थोर व्यक्तींचे, देशभक्तांचे विचार अंगिकारा, असं सांगतात, पण विचार कसा करायचा, त्याची पद्धती, शिस्त आणि प्रणाली कोणीही शिकवत नाहीत. ‘आम्ही सांगतो तसं कर’, असं आई-वडील, शिक्षक आणि ऑफिसातले वरिष्ठ म्हणतात!! आपल्याला सकारात्मक विचार करायला आणि सकारात्मक भावना जोपासायला पाहिजेत आणि हे सगळं शिकावं लागतं!!

‘म्हणजे विचार कसा करायचा, हे शिकता येतं!’ विराज आणि त्याचे बाबा एकदम म्हणाले. ‘या बाबतीत तुमची एकवाक्यता आहे! मी म्हटलं.

वातावरण एकदम बदललं. विराज, त्याचे आई-बाबा खुदकन हसले. ‘होय, सकारात्मक विचार कसा करायचा, ही बाब शिकता येते आणि शिकवताही येते. म्हणजे ती लर्नेबल आहे आणि टीचेबल आहे.

‘हा विचारच नव्यानं ऐकायला मिळाला! बाबा म्हणाले.

विराज मात्र विचारात पडला. ‘सर, हे फिजिक्ससारखं झालं हो. आम्हाला थर्मोडायनॅमिक्स म्हणजे उष्ण ऊर्जेचे नियम शिकवले. त्यानुसार यंत्रांची आखणी करून वाफेचं इंजिन तयार केलं. नियम शिकलो आणि त्याचं उपयोजनदेखील.

सकारात्मक विचार करण्यासाठी प्रशिक्षण देता येतं आणि प्रशिक्षित होता येतं.

‘या वयात जमेल का विराजच्या बाबांना?’ विराजच्या आईनं विचारलं.

‘आता, तुला पण हे सगळं शिकावं लागेल, बाबा विराजच्या आईकडे पाहात हसत म्हणाले.

आम्ही उत्सुक आहोत. तिघेही म्हणाले...

 

विचारांना दिशा कशी द्याल?

१) विचार नकारात्मक किंवा होकारात्मक नसतात. विचार दिशादर्शक असतात. कोणत्याही कृतीचा पाया विचारांवर अवलंबून असतो. म्हणून विचारांचा निकष, शक्यता आणि सकारात्मकता आहे.

२) नकारात्मक विचार निराश करत असले तरी ते संभाव्य धोक्यांची सूचना देतात. त्या सूचना शक्यतेच्या निकषावर तपासून पाहा आणि त्यातून सकारात्मक म्हणजे कार्यप्रवण व्हा.

३) होकारात्मक विचारांनी उत्साहीत वाटतं. या विचारांमुळे नव्या शक्यता दिसू लागतात. त्या वास्तविक की अवास्तविक याच्या निकषावर तपासल्या की सकारात्मक विचारांना चालना मिळते. आपण वास्तवदर्शीपणे वागू लागतो.

४) विचार करताना आपण आपापल्या आत्मबलाच्या आधाराने पुढे जायचं. बलस्थानं आजमावून पाहायची. त्यातूनच आत्मविश्वास जोपासला जातो.

(ख्यातनाम मनोविकारतज्ज्ञ)

drrajendrabarve@gmail.com

Web Title: Do you know how to think?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.