सर्जनशीलता आणि सण-उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:31 PM2018-10-12T12:31:43+5:302018-10-12T12:32:34+5:30

आनंद शोधण्याच्या या आपल्या त-हा आहेत असं मानलं तरी पण मन कुठेतरी स्री सर्जनशीलता आणि सणांचा संबंध शोधत असतं.

Creativity and indian Festivals | सर्जनशीलता आणि सण-उत्सव

सर्जनशीलता आणि सण-उत्सव

Next

सृजन (उत्पत्ती),सर्जन (निर्मिती), सर्जनशक्ती (नवनिर्माण सामर्थ्य), सर्जनशीलता (नवनिर्माण वृत्ती)...हे सगळे शब्द ज्या सणासाठी आपण सहजतेने वापरतो, तो नवरात्र उत्सव धूमधडाक्यात साजरा होतोय. टिपरीवर टिपरी आपटत, टाळीवर टाळी देत एकलयीचा फेर धरल्या जातोय. अगदी कालपरवा पर्यंत रूक्ष भासणारं वातावरण कसं जादूची कांडी फिरावी तसं बदललं आहे. हवेतच सणाचे आनंदकण जाणवतात नि आपलंही मन प्रफुल्लित होतं. नवा आनंद, नव्या प्रेरणा पेरणारा हा उत्सव साजरा करताना  नजरेसमोर असतो, घट! पृथ्वीच्या गर्भाशयाचे प्रतिक! घटाची पूजा म्हणजे पृथ्वीच्या सर्जनेंद्रियाची पूजा मानली गेली आहे. तशी आमच्या एकंदर सगळ्याच सणउत्सवात निसर्गाची पूजा अंतर्भूत आहे. आम्ही ते कधी समजून घेतलं आहे? केवळ परंपरा आहे, म्हणून आम्ही अमुक करतो किंवा तमुक करतो, असं किती काळ चालणार आहे? 
नवरात्र हा शक्तीचा उत्सव, असे आपण मानतो आणि खच्चीकरण करणारे व्रतं करत बसतो. याकाळात अनेक मुली कडक उपवास करतात. पायात चप्पल घालत नाहीत. अनेक स्रिया गादीवर झोपत नाहीत. पलंग वापरत नाहीत. असे अनेक प्रकार आजूबाजूला आपण बघत असतो. याला काही शास्राधार आहे का? गेल्या काही वर्षात विशिष्ट दिवशी ठराविक रंग घालण्याचा नवाच प्रघात सुरू झालाय. आनंद शोधण्याच्या या आपल्या त-हा आहेत असं मानलं तरी पण मन कुठेतरी स्री सर्जनशीलता आणि सणांचा संबंध शोधत असतं.
भूमीतून उगवणा-या धान्य, फळं, कंदमुळांवर आपलं जगणं अवलंबून आहे, हे ज्यावेळी आदिमानवानं जाणलं त्यावेळेपासून भूमी पूजनाचे विविध विधी निर्माण होऊ लागले.  निसर्गातील विविध घटकांचे परस्पर नाते आणि साहचर्य जाणून हे सुफलनाशी संबंधित व्रत - विधी सुरू झालेत. अश्विन महिन्यातला नवरात्र उत्सव असाच पिकांच्या, धनधान्याच्या समृद्धीशी निगडीत आहे. याकाळात घट बसविले जातात. त्याचा विधी बघितला तरी त्यातील सर्जन आपल्या लक्षात येतं. पूर्वी घट बसविण्यासाठी, शेतातली-गोठा-वारूळ आणि चौरस्ता याठिकाणांची माती एकत्र  करून ती पत्रवाळीवर पसरवायचे. त्यानंतर त्यात सात किंवा नऊ प्रकारचे धान्य टाकत असत. पाणी सुद्धा सात विहिरींचे घालण्याची प्रथा होती. काय अर्थ होता याचा? शास्त्रज्ञांना विचारले तर ते सांगतात की दोन किंवा अधिक वेगळे पदार्थ एकत्र आले की सुफलनक्षमता वाढते अशी त्यामागे भावना होती. आज आम्ही हे करतो?
आमचे हे उत्सव निसर्गाच्या जवळ नेणारे आहेत. यात आहे, कृषिसंस्कृतीशी जवळीकता साधणारी धानाची खोपडी आणि सजावटीची हौस पूर्ण करणारी फुलांची माळ! हे निसर्गाशी असलेलं आपलं नातं घट्ट करत नाहीत का? आज आम्ही करतो हे सगळं पण एक ओझं म्हणून करतो. खरंतर हे करताना त्यात आनंद असावा. ताण घेऊन किंवा केले नाही तर अनिष्ट होईल, या भ्रामक समजूतीने जीवाची ओढाताण करत करू नये. आमचे सण-उत्सव परंपरा जेंव्हा निर्माण झाल्यात तो काळ आणि आजचा काळ यात खूप फरक आहे. तो आम्ही लक्षात घ्यायला हवा.
आम्ही विज्ञान मानतो. पण त्याच बरोबर नको त्या परंपराही पाळतो. परिणामी निसर्ग सान्निध्यात नेणारे आमचे सण-उत्सव हरवताहेत. त्यातील निखळ आनंद आम्ही गमावतोय.
 भारतीय परंपरेमध्ये निसर्ग आणि माणूस एकरूपतेची कल्पना आहे. ती कधी जाणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे? आमचे प्रत्येक सण आम्हाला निसर्गाचे आभार मानायला शिकवितात. स्री आणि सृष्टी याभोवती ते गुंफलेले आहेत. भूमीतून उगवणा-या धनधान्यावर आपले जीवन अवलंबून आहे. तसेच स्रीच्या फलनशक्तीमुळे आपला वंशविस्तार होतो. हे कळल्यावर मानवानं स्त्री आणि भूमीशी निगडीत पूजाविधी बांधायाला सुरूवात केली, असे अभ्यासक मानतात. नवरात्र उत्सव हा असाच सुफलनाशी संबंधित उत्सव आहे. पूर्ण सृष्टीला जन्म देणा-या आदिमातेच्या पूजनाचा उत्सव! देवीची जशी तीन रूपं आज मानण्यात येतात. तशीच भूमीचीही तीन रूपं मानतात. एक निर्मीतीचं, दुसरं पोषणाचं आणि तिसरं संहाराचं! म्हणूनच जन्म देणारी आदिमाता, पोषण करणारी गौरी आणि अनिष्टाचा संहार करणारी काली, या रूपांची पुजा बांधली जाते. स्रीच्या सुद्धा वाढीच्या तीन अवस्था असतात की नाही? गौरी, कन्यका, आणि रजस्वला! त्याच रूपांचं पूजन या नवरात्रात केल्या जातं. (हे वाचलं नि सहज मनात आलं की, जिची रजस्वलावस्था थांबतेय, त्या स्रीचा विचार यात नाही. आता नव्या काळात आम्ही तो करायला हवा, नाही का?) खरंच आहे. संस्कृती आणि नव्याची सांगड घालत पुढे वाटचाल केली तर ती परंपरा प्रवाही नि प्रभावी ठरत असते. अन्यथा साचलेपण यायला वेळ लागत नाही. म्हणूनच अलिकडे मनात विचार येतो,
आवाज कोणाचा? म्हणत धांडगधांडग दणदणाट करण्यापेक्षा निसर्ग स्नेही सण आम्हाला साजरे करता येणार नाही का? मोहमायेचं सीमोल्ल॔घन करणारी आदिमाया स्त्री शक्तीचं रूप आहे. तेव्हा आता घराघरातील दुर्गेनं प्रदूषणरूपी महिषाचा नित्पात करून  निसर्ग रक्षणासाठी सज्ज व्हायचं आहे. त्यासाठी प्रामाणिकपणे असं वाटतं की आपल्या मुलांना निसर्गप्रेम शिकवायला हवं. पर्यावरणाशी असलेलं जवळिकीचं भान जागवायला हवं. स्वार्थापलीकडे जाऊन निसर्गाचे संरक्षण करणे ही प्रत्येक व्यक्तींची जबाबदारी आहे किंबहुना तोच आपला मानवधर्म आहे. आपल्या लोकसंस्कृतीनं तो पाळला आहे. मग आम्ही का नाही? 
सर्जनक्षमता हाच जीवनाचा मूलाधार आहे. स्री मध्ये ती आहे. फक्त आपल्या सर्जक सामर्थ्याची जाणिव तिला नाही. ती यावी आणि मानवी जीवनाला समृद्धीची जरीकिनार लावत निसर्गसंवाद साधल्या जावा, हीच या नवोन्मेषी नवरात्रात घराघरातील शारदेकडून अपेक्षा!


- सीमा शेटे (रोठे ), अकोला

Web Title: Creativity and indian Festivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.