दुधाच्या देशातून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 10:45 AM2018-04-01T10:45:30+5:302018-04-01T10:45:30+5:30

न्यूझीलंडमध्ये मुळात गायी नव्हत्याच; प ण या देशात आज माणसांपेक्षा गायी जास्त आहेत. प्रत्येक गाय दिवसाला सरासरी २१ लिटर दूध देते. एकेकाची शेती हजार एकरपर्यंत आणि प्रत्येकाकडे साधारण तेवढ्याच गायी! शिवाय हा सारा व्याप सांभाळतात केवळ पाच ते सहा माणसं !

From the country of milk ... | दुधाच्या देशातून...

दुधाच्या देशातून...

Next


- कल्याणी गाडगीळ
ऑकलंड विद्यापीठात काम करीत असताना मारी टॉपलेस नावाच्या किवी (न्यूझीलंडमधील लोकांना ‘किवी’ म्हणतात) स्त्रीशी ओळख झाली. मारी चांगलीच बडबडी व उत्साही आहे. तिच्या बोलण्यातून समजले की, ऑकलंडजवळच सुमारे तासाभराच्या अंतरावर तिचे फार्म हाउस असून, ती व तिचा नवरा गॉर्डन दोघेही जण गोपालन व दुधाचा व्यवसाय करतात.
न्यूझीलंड हा देश दूध व दुग्धजन्य पदार्थ जगभर पुरविण्यासंबंधी चांगलाच प्रसिद्ध असल्याने हा व्यवसाय नक्की कसा केला जातो याविषयी उत्सुकता होती. मारीशी बोलल्यावर तिने चक्क तिच्या फार्म हाउसवर येऊन दोन दिवस राहाण्याचेच निमंत्रण दिले.
मारीच्या शेतावर (फक्त) दीडशे गायी आहेत! शेत आहे (फक्त) ३०० एकराचे! हेही काही नवल नाही. कारण हा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्याकडे एकावेळी जास्तीत जास्त एक हजार गायी असतात आणि शेते असतात पाचशे ते हजार एकराची! आणि जास्तीत जास्त फक्त ५-६ माणसे मिळून एवढा मोठा व्याप सांभाळून, व्यवसाय यशस्वीरीत्या करतात. हे कसे शक्य आहे?
त्याचे कारण म्हणजे न्यूझीलंड देश हा दोन बेटांचा बनलेला आहे. येथे वर्षभर अधून-मधून पाऊस पडतच असतो. त्यामुळे जमिनी, डोंगर कायम हिरवेगार असतात. येथील गायींना हिरव्या चाºयाचा सहसा कधी तुटवडाच नसतो. आणि त्या चाºयासाठी काही शेती करावी लागत नाही. सगळी निसर्गाची कृपा. नाही म्हणायला कधी तरी (आणि हल्ली ग्लोबल वॉर्मिंगमुळे) दक्षिण बेटावरील काही भागात पाऊस कमी पडतो. पण त्यासाठी राने हिरवी असतानाच मशीनच्या साहाय्याने चारा कापून व मशीनच्या साहाय्यानेच त्याच्या मोठ्या प्लॅस्टिकच्या गुंडाळ्या म्हणजे चांगले मोठाले भारे तयार करून शेतात साठविले जातात. मुख्य म्हणजे त्या गुंडाळ्यातील चारा आंबवला जातो त्यामुळे तो ताजाच राहतो. त्या गुंडाळ्यांना सायलेज म्हणतात. कधी कधी सुकलेल्या गवताच्याही गुंडाळ्या करून साठविल्या जातात. त्यांना बेल्स म्हणतात. थंडीच्या दिवसात जेव्हा चारा कमी पडण्याची शक्यता असते त्यावेळी त्यांचा वापर केला जातो. काहीजण ‘टर्निप’ म्हणजे एक प्रकारच्या मुळ्याचे पीकही लावतात व गायींना ते खायला घालतात.
इतकी मोठाली शेते सपाट नसतातच. त्यात डोंगर, उतार असतात व शेतांना कुंपणे घातलेली असतात. गायींनी कुंपणे तोडून बाहेर जाऊ नये म्हणून कुंपणांतून विजेचा प्रवाह नेलेला असतो. गायींचे कळप मनाला येईल तिथे व जिथे अधिकाधिक चांगले गवत असेल तिथे स्वच्छंदपणे चरत राहतात.
इतक्या मोठ्या गायींच्या कळपात त्यांची संख्या नक्की किती आहे हे कसे समजायचे. यासाठी वासरू जन्माला आले की लगेचच त्याच्या कानांत एक प्रकारचे चिन्ह अडकविले जाते. त्याला इयरमार्किंग म्हणतात. त्यावर एक क्रमांक लिहिलेला असतो. प्रत्येक नवीन जन्मलेल्या वासराच्या क्रमांकाची नोंदणी होते ती सरकारकडेही पाठविली जाते. वासरे मोठी झाली की पुन्हा दुसºया कानातही इयरमार्किंग केले जाते. त्यावरून असे समजले जाते की, या शेतात जन्मलेले वासरू नंतर मोठी गाय म्हणून त्याच शेतात राहिलेली आहे. कालांतराने पहिले इयरमार्किंग गळून पडते.
बार्न म्हणजे जिथे गायींच्या धारा काढल्या जातात व तत्संबंधीची यंत्रणा बसविलेली असते ती जागा. धारा काढण्याचे काम यंत्राच्या साहाय्यानेच होते. प्रत्येक यंत्राला गायीच्या चार सडांना लावला जाईल, असा पंप असतो. त्याने खेचलेले दूध एका नलिकेद्वारे मोठ्या पिंपात साठविले जाते व तिथून ते एका भल्या मोठ्या टॅँकमध्ये टाकले जाते. हा टँक दूध गोठविण्याचे काम करतो. गायींच्या धारा काढल्या जात असताना त्यांच्या तोंडासमोर असलेल्या एका मोठ्या नळीला भोके पाडलेली असतात त्यातून मोलॅसिस चाटायला दिले जाते. गायी ते चवीने चघळत रहातात. धारा काढण्याच्या जागी एका वेळी किती गायी उभ्या राहू शकतील व किती यंत्रे आहेत त्यानुसार गायींना ओळीतून तिथे पाठविले जाते. धारा काढून झाल्या की पुढचा दरवाजा उघडला की गायी बाहेर पडतात व दुसरा गायींचा संच आत येतो. गायी अशा ओळीत उभ्या राहिलेल्या पाहिल्या की जाम मजा वाटते. सगळ्या गायींच्या धारा काढल्या की शेताकडील मुख्य दरवाजा उघडला जातो व गायी पुन्हा हवे तिथे जाऊन चरायला मोकळ्या.
गायी चिखल किंवा शेणाने बरबटल्या असतील तर पाण्याच्या जोरदार फवाºयाने त्यांना अंघोळी घातल्या जातात. त्याला अर्थातच फार थोडा वेळ लागतो कारण पाण्याचे फवारे मोठे व चांगले शक्तिमान असतात.
प्रत्येक गाय दिवसाला साधारणत: २० ते २१ लिटर दूध देते. हे दूध नेण्यासाठी दुधाच्या कंपन्यांशी शेतकºयांचे करार असतात. दिवसातून एकदा अथवा दोनदा कंपनीकडून दूध नेण्याचे टँकर येतात. गंमत म्हणजे या सर्व गोष्टी यंत्राच्या साहाय्याने होत असल्याने दुधाला कोणाचाही स्पर्श होत नाही त्यामुळे दूध खराब होण्याचे प्रमाण शून्य असते.
न्यूझीलंड या पिटुकल्या देशातील गायींची संख्या २०१७ साली ४.८ मिलियन म्हणजे ४८ लक्ष एवढी तर देशातील माणसांची लोकसंख्या ४७,०५,८१८ एवढी होती! यातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे न्यूझीलंड या देशात मुळात कधी गायी नव्हत्याच.
१९१४साली सॅम्युएल मार्सडेन या मिशनरीने न्यू साउथ वेल्स येथून शॉर्टहॉर्न गायी न्यूझीलंडमध्ये आणल्या. १८४० सालापासून आॅस्ट्रेलिया व इंग्लंडमधून अधिकाधिक गायी न्यूझीलंडमध्ये आणल्या जाऊ लागल्या. सध्या न्यूझीलंडमध्ये असलेल्या गायी मुख्यत: जर्सी व फ्रेसियन या जातीच्या असतात. त्या इंग्लंड व युरोपमधून आलेल्या आहेत. आता गायींची पैदास न्यूझीलंडमध्येच होते.
येथील गायी भारतातील गायींपेक्षा वेगळ्या दिसतात. एक म्हणजे गायींची शिंगे दिसतच नाहीत. याचे कारण वासरू जन्मल्यानंतर २-३ महिन्यातच त्यांची शिंगे कापून त्यावर एक प्रकिया केली जाते. त्याला डी-हॉर्निंग म्हणतात. त्यामुळे गायींचे एकमेकींवर, शेतकºयांवर किंवा कुंपणावर हल्ले होणे पूर्णत: टाळले जाते. पूर्वी गायींच्या शेपट्याही कापल्या जात. म्हणत. आता मात्र गायींच्या शेपट्या राखल्या जातात. दुसरा फरक म्हणजे भारतीय गायींना जसे वशिंड असते तसे या गायींना नसल्याने त्यांची पाठ सरळसोट दिसते. शिवाय भारतात गायीच्या गळ्यात घंटा असण्याची आपल्याला सवय असते. इकडे गायींच्या गळ्यात घंटा बांधण्याची पद्धत नाही.
गायींचा पैदास करण्याचा ठरावीक काळ असतो. साधारणत: आॅक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात बहुतेक गायींचे कृत्रिम गर्भादान केले जाते. कधी कधी खास पैदाशीच्या बैलांचा वापर करूनही त्यांचे मीलन केले जाते. जुलै महिन्याचा मध्य ते पुढच्या मे महिन्यापर्यंत गायी दूध देतात. गायी व्यायल्यानंतरचे पहिल्या दहा दिवसाचे दूध म्हणजे चीक, जो आपल्याकडे खास खरवस करण्यासाठी वापरला जातो त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. इकडे खरवस कोणाला ठाऊक नाही. वासरांनाच तो भरविला जातो व खूप झाला तर दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्माण करणाºया कंपन्या तोही विकत घेतात. गायींचे दुभते आयुष्य साधारणत: १२ वर्षे एवढे असते.
मारी व गॉर्डन यांच्या फार्म हाउसमध्ये फिरत असताना त्यांच्याकडून ही सारी माहिती मिळाली.
न्यूझीलंडमधील दुधाच्या सर्वात प्रसिद्ध कंपनीचं नाव आहे फॉण्टेरा. याशिवाय टाटुआ, वेस्टलॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या व आइस्क्र ीमसाठी प्रसिद्ध असलेली टिप-टॉप आइस्क्रीम याही जगप्रसिद्ध कंपन्या आहेत. त्या दूध, दुग्धजन्य पदार्थ, विविध प्रकारचे चीज, लोणी, दही, अर्भकांसाठी तसेच मोठ्या माणसांसाठी दुधाची पावडर असे शेकडो पदार्थ विविध कारखान्यांकडून बनवून घेऊन जगभर पुरवतात.
दुधाच्या पावडरचा उपयोग आजारी माणसाला जेव्हा नाकात नळी घालून अन्न पुरवावे लागते त्यावेळी लागणारी विशिष्ट पावडर बनविण्यासाठी केला जातो. अस्थमा असलेल्या लोकांना चोंदलेले नाक मोकळे होण्यासाठी जे इनहेलर वापरावे लागतात त्यातही दुधाच्या पावडरचा वापर केला जातो. कॉम्प्युटरच्या सर्किट बोर्डमध्येही दूध पावडरचा वापर केला जाई यावर विश्वास बसणे कठीण आहे. पण ते सत्य आहे.
शेतकरी ज्या कंपनीला दूध पुरवतात त्यांचे शेअर शेतकºयांना मिळून कंपनीच्या फायद्यात त्यांनाही वाटा मिळतो. त्यामुळे इथले शेतकरी सधन असतात. फार्म हाउसवर जाण्यासाठी मारीनं परवाच घेतलेली चाळीस हजार डॉलर्सची नवी कोरी गाडी दाराशी थांबविली तेव्हा इथल्या ‘सधन’ शेतकºयांच कल्पना आली..
 


(लेखिका न्यूझीलंडस्थित रहिवासी आहेत.)

kalyani1804@gmail.com

Web Title: From the country of milk ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.