चीनच्या आकाशात लटकेल कृत्रिम चंद्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 06:04 AM2018-10-28T06:04:10+5:302018-10-28T06:04:10+5:30

आपल्याकडे चिनी वस्तूंबाबत ‘चले तो चांद तक,नहीं तो रात तक..’ असे म्हटले जाते. पण हाच चीन आपल्या अवकाशात आता कृत्रिम चंद्रच लटकवणार आहे. सध्याच्या चंद्राच्या आठपट प्रकाश हा चंद्र देईल. शिवाय या चंद्राला ना अमावास्या असेल, ना चंद्रकला! पौर्णिमेच्या चंद्रासारखं ते पूर्णबिंब आकाशात कायम चमकत राहील!

Artificial moon will hang in the China's sky! | चीनच्या आकाशात लटकेल कृत्रिम चंद्र!

चीनच्या आकाशात लटकेल कृत्रिम चंद्र!

Next
ठळक मुद्देज्या चंद्राची आपण पूजा करतो, जो चंद्र आपल्या संस्कृतीचेही एक अंग आहे, तो चंद्रही कृत्रिम असू शकतो, अशी आपण कधी कल्पनाही केली नव्हती, पण ते आता खरं होऊ पाहतंय.

पवन देशपांडे

ज्या चंद्राची आपण पूजा करतो, जो चंद्र आपल्या संस्कृतीचेही एक अंग आहे, तो चंद्रही कृत्रिम असू शकतो, अशी आपण कधी कल्पनाही केली नव्हती, पण ते आता खरं होऊ पाहतंय.
अंतराळात प्रयोग करण्याची सध्या मोठी स्पर्धा सुरू आहे. कोणी सर्वांत शक्तिशाली अग्निबाण बनवत आहे. कोणी एकाच सॅटेलाइटद्वारे शेकडो उपग्रह अवकाशात सोडण्याचा प्रयत्न करत आहे. इलॉन मस्कसारखा बडा उद्योजक चंद्रावर सृजनशील व्यक्ती नेऊन त्यांना पर्यटन घडविण्याची योजना आखतो आहे, तर दुसरीकडे त्यानेच मंगळावर पर्यटक घेऊन जाण्याच्या योजनेवरही काम सुरू केले आहे. कोणी एखादा देश प्रतिस्पर्धी देशावर वॉच ठेवण्यासाठी उपग्रह सोडत आहे. कोणी आपली जीपीएस प्रणाली सक्षम करण्यासाठी तर कोणी संरक्षण प्रणालीसाठी अवकाश तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.
या स्पर्धेतून नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत. चीनच्या खासगी अवकाश संस्थेने अवकाशात कृत्रिम चंद्र सोडण्याची योजना बनवली, ती याच स्पर्धेचा परिपाक आहे.
स्ट्रीटलाइटसाठी जाळली जाणारी वीज आणि तेवढ्या विजेच्या निर्मितीसाठी होणारा इंधनाचा खर्च तसेच होणारी निसर्गाची हानी थांबविण्यासाठी चीनच्या चेंगडू एरोस्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम रिसर्च इन्स्टिट्यूट कॉर्पोरेशन या खासगी संस्थेने अवकाशात कृत्रिम चंद्र सोडायचे ठरवले. त्यामुळे रात्रीही रस्त्यांवर लख्ख प्रकाश असेल.
ही खासगी अवकाश संस्था २०२०मध्ये दोन उपग्रह अवकाशात सोडणार आहे. हे उपग्रह अवकाशातील आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन एवढ्या उंचीवर असतील. कृत्रिम चंद्र हा एक प्रकारे आरशांचा उपग्रह असणार आहे. हे आरसे सूर्याची किरणे पृथ्वीवर परावर्तित करतील. हे तीनही चंद्र ५०० किलोमीटर उंचीवर असणार आहेत.
आपला नैसर्गिक चंद्र पृथ्वीपासून तीन लाख ८० हजार किलोमीटर अंतरावर आहे. त्या तुलनेत या कृत्रिम चंद्राचे जमिनीपासून अंतर खूपच कमी असल्याने तो नेहमीच्या चंद्रापेक्षा आठ पट जास्त प्रकाश देईल, असा अंदाज आहे.
या कृत्रिम चंद्रांमुळे ८० किलोमीटरचा परिसर प्रकाशमान होईल. यामुळे स्ट्रीटलाइटची गरज भासणार नाही. म्हणजेच या शहरांत दिवसा सूर्याचा प्रकाश असेल आणि रात्री या कृत्रिम चंद्रांचा!
गेल्या वर्षापासून या मोहिमेवर काम सुरू होते आणि आता ते अंतिम टप्प्यात असल्याचा दावा या खासगी अवकाश संस्थेने केला आहे. विशेष म्हणजे २०२२ पर्यंत असे तीन चंद्र पाठवण्याची योजना आहे. ती यशस्वी होईल, असा दावा करण्यात येत आहे. चीनच्या या संस्थेने आखलेली ही योजना प्रत्यक्षात जरी आली तरी त्याने केवळ एका भागावरच प्रकाश पडणार आहे. त्यामुळे हा चंद्र केवळ एका भागापुरता असेल. संपूर्ण चीनला त्याचा फायदा होणार नाही. शिवाय, एखाद्याच शहरावर प्रकाश पाडायचा असल्याने त्याला एका जागी स्थिर करावा लागेल. त्याचा, सूर्याचा आणि पृथ्वीचा मेळ बसवावा लागेल.
कोन थोडाही चुकला तरी त्या कृत्रिम चंद्रांचा प्रकाश वेगळ्याच भागावर पडेल. शिवाय संपूर्ण चीनला कायम चंद्रप्रकाशात ठेवायचे असेल तर असे हजारो कृत्रिम चंद्र अवकाशात लटकत ठेवावे लागतील. त्यांच्यावर कायम काम करत राहावे लागेल. त्यांच्यावर कायम नजर ठेवावी लागेल आणि त्यांचे दुरुस्तीचे काम करायचे झाल्यास थेट अवकाशात जावे लागेल. हे सध्यातरी शक्य वाटत नाही. त्यामुळे कृत्रिम चंद्र अवकाशात पाठवण्याची चीनच्या संस्थेची ही योजना किती यशस्वी होते, ते पाहावे लागेल.
कारण, यापूर्वीही असे अनेक प्रयत्न झाले आहेत. ते यशस्वीतेच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. अपयशाचेच ग्रहण लागून ते प्रकल्प बासनात गुंडाळले गेले आहेत. रशियाने अशाच प्रकारचा प्रयत्न १९९० साली केला होता. सौर परावर्तन प्रणाली - ‘स्पेस मिरर’ असा हा प्रकल्प होता. याद्वारे जवळजवळ ३ ते ५ चंद्रांचा प्रकाश एकत्रितपणे तयार होईल अशी व्यवस्था करण्यात आली होती. पण हा प्रकल्प बंद पडला. चीनच्या या नव्या योजनेचे काय होते, याकडे आता साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.
चायनीज मालाबद्दल ‘चले तो चांद तक, नहीं तो रात तक..’, असे आपल्याकडे म्हटले जाते, पण तरीही चीनचा हा प्रकल्प यशस्वी झाला, तर प्रगतीच्या दिशेने टाकलेले ते आणखी पुढचे पाऊल ठरेल..

किती वाचेल वीज, पैसा?
कृत्रिम चंद्र अवकाशात पाठवून विजेवर होणारा खर्च वाचविण्याचा उद्देश आहे. कारण जेवढा खर्च स्ट्रीट लाइटवर होतो, त्यापेक्षा कमी खर्च या चंद्रासाठी होईल असा दावा चेंगडूच्या अवकाशतज्ज्ञांनी केला आहे. ५० चौरस किलोमीटरच्या परिसरात स्ट्रीट लाइट्स सुरू ठेवण्यासाठी विजेवर होणारा खर्च १२६५ कोटी रुपयांनी वाचवला जाऊ शकतो. शिवाय कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या काळात बत्ती गुल होण्याचा धोका असतो. तो या चंद्रामुळे नसेल. भूकंप येवो की महापूर, रात्री रस्त्यांवर रोषणाई कायम असेल. पण उपग्रहावर होणारा खर्च हा विजेवर १५ वर्षे होणाºया खर्चाएवढा आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करता चंद्रासाठी केली जाणारी ही गुंतवणूक किती फायद्याची ठरते, याचे गणित नव्याने मांडावे लागेल.

कायम ‘दिवस’!
रात्रीच्या कायमच्या प्रकाशामुळे काही वन्यप्राण्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होईल, असा काही तज्ज्ञांचा दावा आहे. रात्रीच्या प्रखर प्रकाशामुळे काही प्राण्यांना रात्र झाल्याची जाणीवच होणार नाही. त्यामुळे त्यांचा जगण्याचा ताळमेळच बिघडून जाईल. काही प्राणी प्रकाशाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असतात. त्यांना फटका बसू शकतो. चेंगडू हे शहर अगोदरच नको तेवढे उजळलेले आहे. तेथील लोक रात्रीच्या अतिरिक्त प्रकाशाने हैराण आहेत. त्यात या नव्या प्रकाशाची भर पडली तर त्यांचे जगणेच मुश्कील होईल.
(लेखक लोकमत वृत्तपत्रसमुहात वरिष्ठ मुख्य उपसंपादक आहेत.)
pavan.deshpande@lokmat.com

Web Title: Artificial moon will hang in the China's sky!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.