आयटीआय प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त कधी ?

By admin | Published: May 30, 2016 03:53 AM2016-05-30T03:53:59+5:302016-05-30T03:53:59+5:30

राज्यातील तरुणांना कौशल्य विकास आणि उद्योजकतेचे धडे देणाऱ्या आयटीआय प्रवेश प्रक्रियेचे यंदा तीनतेरा वाजण्याची शक्यता आहे.

When did you enter the ITI admission process? | आयटीआय प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त कधी ?

आयटीआय प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त कधी ?

Next


मुंबई : राज्यातील तरुणांना कौशल्य विकास आणि उद्योजकतेचे धडे देणाऱ्या आयटीआय प्रवेश प्रक्रियेचे यंदा तीनतेरा वाजण्याची शक्यता आहे. कारण दहावीचा निकाल काहीच दिवसांत लागणार असून, आयटीआय प्रवेश प्रक्रियेबाबत व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाकडून (डीव्हीईटी) कोणत्याही हालचाली दिसत नाहीत.
राज्यात एकूण ४१७ आयटीआय असून, त्यातील सुमारे १ लाख ३० हजार प्रवेश गेल्या तीन वर्षांपासून आॅनलाइन पद्धतीने केले जात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून आॅनलाइन पद्धतीला विद्यार्थ्यांचीही पसंती मिळत असल्याचे प्रवेश अर्जांच्या संख्येवरून स्पष्ट होते.
गेल्या तीन वर्षांतच दोन लाख प्रवेश अर्जांची संख्या अडीच लाखांवर गेली आहे. त्यासाठीच या वर्षी हा विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडे वर्ग करण्यात आला.
जूनच्या पहिल्या आठवड्यात आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होते. त्याआधी संकेतस्थळावर सर्व माहिती प्रसिद्ध केली जाते. मात्र या वर्षी मे महिन्याचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत, मात्र अद्याप प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचाच पत्ता नाही. शिवाय विद्यार्थ्यांना ९०हून अधिक कोर्सेसची माहिती पुरवणाऱ्या पुस्तिकेच्या छपाईबाबतही कोणतीच प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
परिणामी, गेल्या वर्षी दहावीच्या निकालाच्या एक आठवड्याआधी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. मात्र यंदाची परिस्थिती पाहता प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
>विद्यार्थ्यांची पसंती गमावणार?
गेल्या काही वर्षांतच उद्योगांकडून प्रशिक्षित विद्यार्थ्यांना वाढती मागणी आहे. आयटीआय प्रशिक्षण म्हणजे १०० टक्के रोजगार असे सूत्रच त्यामुळे तयार झाले आहे. त्यामुळेच ५० ते ६० टक्के गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसह ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थीही आयटीआय कोर्सेसला पसंती देत आहेत.
मात्र आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया बंद झाल्यास पुन्हा भ्रष्टाचाराला खतपाणी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आवडती प्रशिक्षण संस्था न मिळाल्याने विद्यार्थी याकडे पाठ फिरवण्याचा धोका निर्माण झाला आहे.
>प्रवेश प्रक्रियेला विलंब का?
व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयाच्या महारोजगार पोर्टलवरून आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. मात्र एका वर्षानंतर शासनाच्या प्रस्तावाविना प्रवेश प्रक्रिया राबविल्याने या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती डीव्हीईटीच्या एका अधिकाऱ्याने दिली.
त्यानंतर या वर्षी निविदा मागवून प्रवेश प्रक्रिया घेण्यात येणार होती. मात्र चार कंपन्यांनी प्रतिसाद दिल्यानंतरही आॅनलाइन प्रक्रिया अधिकाऱ्यांना नकोशी झाल्याचे बोलले जात आहे.

Web Title: When did you enter the ITI admission process?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.