कधी काय घडेल, कोणी सांगावे या धरतीवर!

By admin | Published: July 5, 2015 02:41 AM2015-07-05T02:41:53+5:302015-07-05T02:41:53+5:30

बारामती, खंडाळा तालुक्यात काश्मीरसारखी बर्फाची चादर, दर महिन्याला अवकाळी पाऊस, चक्रीवादळसदृश वादळी वारे हे चित्र गेल्या सहा महिन्यांत दक्षिण महाराष्ट्राने कमी-अधिक प्रमाणात अनुभवले आहे.

What ever will happen, someone will tell you on earth! | कधी काय घडेल, कोणी सांगावे या धरतीवर!

कधी काय घडेल, कोणी सांगावे या धरतीवर!

Next

- चंद्रकांत कित्तुरे

बारामती, खंडाळा तालुक्यात काश्मीरसारखी बर्फाची चादर, दर महिन्याला अवकाळी पाऊस, चक्रीवादळसदृश वादळी वारे हे चित्र गेल्या सहा महिन्यांत दक्षिण महाराष्ट्राने कमी-अधिक प्रमाणात अनुभवले आहे. यात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. निसर्गाचे संतुलन बिघडल्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांचा हा परिणाम टाळता न येणारा आणि कधी काय घडेल याचा अंदाजही न देणारा.
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर हे पाच जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातले. प्रचंड नैसर्गिक, भौगोलिक विविधता असलेला हा प्रदेश. यातील कोल्हापूर जिल्हा दुष्काळापासून कोसो दूर. सांगलीतील खानापूर, आटपाडी हे तालुके कायमचे दुष्काळी छायेतले. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण आणि खंडाळा तालुक्यांतील परिस्थितीही जवळपास अशीच. हे तालुके वगळता हे दोन्ही जिल्हे निसर्गसंपन्न; पण या निसर्गसंपन्नतेवर मानवाचे होत असलेले
अतिक्रमण त्याचा समतोल ढळण्यास कारणीभूत ठरत आहे. मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड, जागतिक तापमानात होणारी वाढ याचा
परिणाम पर्यावरणावर होत आहे. हवामानात अचानक बदल होत आहेत. त्यांचा मानवी जीवनावर परिणाम होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात यंदा दर महिन्याला पाऊस झाला आहे. बारमाही पाऊस होण्याचे हे इतिहासातील पहिलेच वर्ष असावे. निसर्गाच्या असमतोलामुळे हवामानात होणाऱ्या बदलाचा परिणाम म्हणून असे घडले असल्याचे सांगितले जाते. यंदा उन्हाळ्यात देशाच्या अन्य भागात उष्णतेची लाट असताना या जिल्ह्यात मात्र तापमानाची सरासरीही गाठली गेली नाही. वार्षिक सरासरीपेक्षा ते सुमारे दोन अंशानी कमीच राहिले. याला कारण दर महिन्याला हवामानात बदल होऊन झालेला पाऊसच आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तर यंदाच्या अवकाळी पावसाची सरासरी ही पावसाळ्यातील सरासरीपेक्षा जास्त आहे.
कोल्हापूरचे तापमान कमाल ४२, तर किमान ७ अंश सेंटिग्रेड इतके, तर सरासरी ३८ अंश सेंटिग्रेड असते. यंदा मात्र जिल्ह्यातील तापमानाने पस्तिशी ओलांडलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात असणारी वनराई आणि वर्षभराचा पाऊस यामुळे येथील लोकांना उन्हाळा सुसह्य झाला. हीच परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात सातारा, सांगली जिल्ह्यांतीलही आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि बारामती तालुके वगळता तापमानाची वार्षिक सरासरी कमीच राहिलेली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, इंदापूर हे तालुके आणि बारामती तालुक्याचा काही भाग दुष्काळी पट्ट्यात मोडतो. यंदा गारपीट अनेक ठिकाणी झाली असली, तरी बारामती, पुरंदर, दौंड आणि खेड तालुके तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील गारपीट काश्मीरचा अनुभव देणारी होती. सर्वत्र बर्फाची चादर पसरल्यासारख्या गारा पडल्या होत्या. गारांचा आकारही मोठा होता. या गारपिटीचा शेतातील उभ्या पिकांना मोठा फटका बसून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.
बदलते पाऊसमान आणि हवामानाचा परिणाम शेतीवर खूप मोठा झाला आहे. कोणती पिके घ्यावीत याचा फेरविचार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

ग्लोबल वॉर्मिंग आणि त्याचे परिणाम १९९२मध्ये रिओ येथे झालेल्या वसुंधरा परिषदेत तज्ज्ञांनी सांगितले होते.
मात्र, ते हसण्यावारी नेण्यात आले. आज त्याची सत्यता अनुभवास येत आहे. सरकारने दूरगामी विचार करून आपली धोरणे ठरविली पाहिजेत. त्यात समाजाबरोबरच पर्यावरण संतुलनाचाही विचार झाला पाहिजे, अन्यथा भविष्यात याहून गंभीर नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागेल.
- डॉ. जय सामंत,
पर्यावरण तज्ज्ञ, कोल्हापूर

Web Title: What ever will happen, someone will tell you on earth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.