काश्मिरात खदखद , उर्वरित देशात शांतता...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 02:08 PM2019-03-11T14:08:05+5:302019-03-11T14:20:50+5:30

२०१४ ते २०१९  या कालावधीत देशाच्या अंतर्गत भागात असे दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण जवळजवळ नव्हते़. परंतु ;जम्मू काश्मीरमध्ये मात्र गोळीला गोळीने उत्तर या धोरणामुळे दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते़...

violance in Kashmir, peace in the country ... | काश्मिरात खदखद , उर्वरित देशात शांतता...

काश्मिरात खदखद , उर्वरित देशात शांतता...

googlenewsNext
ठळक मुद्देजम्मू काश्मीर, नक्षलग्रस्त भाग वगळता देशात तुलनेने शांतता २००४ ते २००८ या काळात १५ दहशतवादी हल्ले झाले़.२००८ ते २०१४ या काळात तब्बल २० दहशतवादी हल्ले झाले आहेत़. २०१४ ते आतापर्यंतच्या काळात ४ घटना घडल्या आहेत़. 

- विवेक भुसे-
पुणे : जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे़. त्यातही जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांचे वाढते हल्ले आणि त्याला पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचे असलेले पाठबळ यामुळे हा प्रश्न ज्वलंत बनला आहे़. २००४ ते २००८ आणि २००८ ते २०१४ या कालावधीत देशाच्या विविध भागात बॉम्बस्फोटाच्या अनेक घटना घडल्या़. त्या तुलनेत जम्मू काश्मीरात दहशतवादी, ईशान्येकडील राज्ये आणि नक्षलग्रस्त भागात नक्षलग्रस्तांनी केलेले हल्ले वगळता २०१४ ते २०१८ या वर्षांमध्ये देशाच्या अन्य अंतर्गत भागात शांतता दिसून आली़. 
२०१४ मध्ये झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर भाजपा सरकार सत्तेवर आले. त्याचवर्षी डिसेंबरमध्ये बेंगळुरु येथे बॉम्बस्फोट झाला होता़. त्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये बिहारमध्ये न्यायालयाचा आवारात बॉम्बस्फोटाची घटना झाली होती़. जुलै २०१५ मध्ये गुरुदासपूर येथे हल्ला झाला होता़ .आर्मीच्या वेशात आलेल्या तिघा दहशतवाद्यांनी केलेल्या फायरिंगमध्ये ३ नागरिक व ४ पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यु झाला होता़. मार्च २०१७ मध्ये मध्य प्रदेशातील भोपाळ - उज्जैन पॅसेंजरमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला होता़. त्यात १० प्रवासी जखमी झाले होते़. यातील एका दहशतवाद्याचा लखनौमध्ये झालेल्या चकमकीत मारला गेला तर अन्य ६ जणांना अटक करण्यात आली आहे़. सीमावर्ती भागाव्यतिरिक्त या महत्वाच्या ४ घटना गेल्या पाच वर्षांत घडलेल्या दिसून येतात़. 
या तुलनेत युपीएच्या दोन्ही कालखंडात देशाच्या अनेक भागात दहशतवादी घटना मोठ्या प्रमाणावर झाल्याचे आढळून आले आहे़. काँग्रेस प्रणित युपीए सरकारच्या पहिल्या कालखंडात १५ घटना घडल्या होत्या़. तर दुसऱ्या कालखंडात तब्बल २० दहशतवादी हल्ले घडले होते़. 
जुलै २००५ मध्ये अयोध्येत पाच दहशतवाद्यांनी राम जन्मभूमी परिसरात हल्ला केला होता़. ग्रेनेडच्या हल्ल्यात एक नागरिक ठार झाला होता़. सीआरपीएफच्या जवानांनी पाचही जणांना ठार केले होते़. जुलै २००५ मध्ये जौनपूर येथे श्रमजीवी एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट होऊन त्यात १३ जण ठार झाले होते़ त्यानंतर दिल्लीत ३ बॉम्बस्फोटाच्या घटना ऑक्टोबर २००५ मध्ये घडल्या होता़.  मार्च २००६ मध्ये वाराणसी येथे श्रीसंकटमोचन मंदिर आणि रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्बस्फोट झाले होते़. त्यानंतर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या लोकलवर झाला होता़. त्यात सात ठिकाणी प्रेशन कुकरचा वापर करुन बॉम्बस्फोट करण्यात आले होते़. त्यात २०९ जणांना प्राण गमवावे लागले होते़. 
मालेगाव येथे सप्टेंबर २००६ मध्ये मशिदीच्या बाहेर बॉम्बस्फोट होऊन ४० जणांचा मृत्यु झाला होता़. याप्रकरणात प्रथम सीमीच्या काही जणांना संशयावरुन अटक करण्यात आली होती़. त्यानंतर एटीएसने केलेल्या तपासात अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने हा स्फोट घडवून आणल्याचे समोर आले होते़. या पाठोपाठ समझौता एक्सप्रेसमध्ये फेब्रुवारी २००७ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता़. हैदराबाद, राजस्थान, लुधियाना, उत्तर प्रदेश, जयपूर येथेही बॉम्बस्फोट होऊन अनेकांना जीव गमवावे लागले होते़. 
२००८ ते २०१४ या कालखंडात देशभरात तब्बल २० दहशतवादी घटना घडल्या होत्या़. जुलै २००८ मध्ये बंगलुरु येथे ८ वेगवेगळ्या ठिकाणी कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले होते़. त्याच महिन्यात १७ वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाने अहमदाबाद शहर दरले होते़. त्यात ५६ जणांचा मृत्यु होऊन २०० जण जखमी झाले होते़. दिल्ली मार्केटमध्ये ५ ठिकाणी झालेले बॉम्बस्फोट झाले होते़. 
संपूर्ण देशाला हदरवून सोडणाऱ्या मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला कोणीही विसरु शकणार नाही़. त्यात १७४ जणांना प्राण गमवावे लागले़. 
फेब्रुवारी २०१० मध्ये जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाने शांत शहर हा पुण्याचा लौकिक धुळीला मिळाला़ या स्फोटात १७ जणांचा मृत्यु झाला तर ५४ जण जखमी झाले होते़. 
त्यानंतर जुलै २०११ मध्ये पुन्हा एकदा मुंबईला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते़. झवेरी बाजार, दादर आणि पेरा हाऊस येथे बॉम्बस्फोट झाले़ त्यात २६ जणांचा मृत्यु झाला तर १३० जण जखमी झाले होते़. याशिवाय देशभरातील बिहारमधील बुद्ध गया, पाटणा , पश्चिम बंगालमधील जलपायगुडी, हैदराबाद, बंगलुरु, झारखंड, तामिळनाडु अशा विविध ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ले केले होते़. 
२०१४ ते २०१९  या कालावधीत देशाच्या अंतर्गत भागात असे दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण जवळजवळ नव्हते़. त्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये मात्र गोळीला गोळीने उत्तर या धोरणामुळे दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते़. सुरक्षा जवानांकडून अतिरेक्यांना चकमकीत ठार करण्याचे प्रमाणातही वाढ झाली आहे़. 
़़़़़़़़़
सीमावर्ती भाग व नक्षलग्रस्त भाग वगळता झालेले दहशतवादी हल्ले.
२००४ ते २००८ या काळात १५ दहशतवादी हल्ले झाले़. 
२००८ ते २०१४ या काळात तब्बल २० दहशतवादी हल्ले झाले आहेत़. 
२०१४ ते आतापर्यंतच्या काळात ४ घटना घडल्या आहेत़. 

Web Title: violance in Kashmir, peace in the country ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.