ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 17 - महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असल्याने नेतेमंडळीच्या प्रचारसभांचा सपाटा लागला आहे. एकामागोमाग एक सभा असल्याने नेत्यांची चांगलीच धावपळ होताना दिसत आहे. अशाचप्रकारे प्रचारासाठी निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रचारसभेला पोहोचण्यासाठी बाईकवरुन प्रवास करावा लागला. वाहतूक कोंडीमुळे अडकलेल्या सुप्रिया सुळे यांनी वेळेत पोहोचावं यासाठी बाईकचा पर्याय निवडला आणि तिथेच वादाचा गेअर पडला. 
 
सुप्रिया सुळे ज्या बाईकवर बसल्या होत्या त्या बाईक चालकाने हेल्मेटच घातलं नव्हतं. तरीही सुप्रिया सुळे यांनी कोणताच आक्षेप न घेता प्रवास केला. इतकंच नाही तर सोबत असणा-या कार्यकर्त्यांनीही वाहतुकीच्या नियमाचं सर्रासपणे उल्लंघन करत विनाहेल्मेट प्रवास केला. 
 
सुप्रिया सुळे लोकसभेत खासदार आहेत. त्यांनीच अशा प्रकारे नियम पायदळी तुडवले असल्या कारणाने लोकांकडूनही संताप व्यक्त केला जात असून आमच्यासारख्या सामान्यांवर ट्राफिक पोलीस लगेच कारवाई करतात मग यांच्यावर का नाही असा सवाल विचारत आहेत. सोशल मीडियावर सुप्रिया सुळे यांचा व्हिडीओ शेअर करुन प्रश्न विचारले जात आहेत.