सात तासांत उदयनराजे बाहेर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 05:22 AM2017-07-26T05:22:57+5:302017-07-26T05:23:00+5:30

udayanraje-released-district-court-granted-bail | सात तासांत उदयनराजे बाहेर!

सात तासांत उदयनराजे बाहेर!

Next

सातारा : उद्योजकाच्या हत्येचा प्रयत्न तसेच खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात मंगळवारी सकाळी ९ वाजता स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. उदयनराजे भोसले अवघ्या सात तासांत बाहेरही आले. सकाळी दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर सायंकाळी ४ वाजता जिल्हा न्यायालयाने त्यांना काही अटींवर तात्पुरता जामीन मंजूरही केला.
पन्नास हजारांचा जातमुचलका अन् एक दिवसाआड हजेरी या अटी घालण्यात आल्या आहेत. लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे उद्योजक राजीव जैन यांनी एप्रिल महिन्यात उदयनराजे यांच्यासह १५ जणांविरुद्ध फिर्याद दिली होती. तीन महिन्यांपासून पोलिसांना हवे असलेले उदयनराजे अखेर मंगळवारी सकाळी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी तत्काळ त्यांना अटक केली. त्या वेळी पोलीस ठाण्यासमोर हजारोंचा जमाव होता. दोन तासांनंतर अटकेची प्रक्रिया झाली. त्यानंतर उदयनराजेंना निर्भया पथकाच्या गाडीतून न्यायालयात नेण्यात आले.
पोलिसांनीच न्यायालयीन कोठडी मागितली. त्यानंतर त्यांना प्रकृती अस्वस्थामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दुपारी १ वाजता उदयनराजे यांच्या वतीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल झाला. ४ वाजता त्यावर सुनावणी झाली.
जामीन मिळाल्यानंतर काही वेळातच उदयनराजे रुग्णालयातून घरीही गेले.

पोलीस निरीक्षकाला मारली मिठी
उदयनराजे हे सकाळी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या रिकाम्या केबिनमध्ये जाऊन खुर्चीवर बसले. मात्र, तेथे कोणी नसल्याने ते जलमंदिरकडे निघाले. त्याचवेळी सारंगकर आले, त्यांना पाहताच उदयनराजेंनी खुर्चीवरून उठून त्यांना मिठी मारली. एका पोलिसाच्या मोबाइलवरून उदयनराजेंनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर साडेनऊला स्वत:च्या गाडीतून ते सातारा तालुका पोलीस ठाण्यातील ‘शिवतेज’ हॉलमध्ये गेले.

सातारा, बीडमध्ये बसवर दगडफेक
सातारा येथे पाच गाड्यांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर सकाळी ११पासून सातारा आगारातील सुमारे सव्वाशे फेºया रद्द करण्यात आल्या. बीड येथे समर्थकांनी बसवर दगडफेक केली. बुधवारी बीड बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

राजेंना साताºयात ठेवायचं की बाहेर?
जामीन अर्जावर निर्णय देताना जिल्हा अतिरिक्त न्यायाधीश डी. ए. धोळकिया यांनी सारंगकर यांना विचारले की, उदयनराजेंना साताºयात ठेवायचं आहे की बाहेर पाठवायचं आहे? त्यावर सारंगकर यांनी सांगितले की, त्याची काही गरज नाही. फक्त एक दिवसाआड त्यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावावी.

साताºयात उत्स्फूर्त बंद
सकाळी शहरातील सर्व दुकाने उत्स्फूर्तपणे बंद झाली. शाळा अन् महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही घरी पाठवण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव धरणे यांनी उदयनराजे यांच्याशी चर्चा केली.

खामगावला भाजपा नगरसेवकाविरुद्ध गुन्हा
उदयनराजे यांच्याविषयी अवमानजनक पोस्ट सोशल मीडियातून प्रसारित केल्याप्रकरणी खामगाव (जि. बुलडाणा) येथील भाजपाचे नगरसेवक ओमप्रकाश शर्मा यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सकल मराठा समाजाने तक्रार दिली होती. पोस्टमुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: udayanraje-released-district-court-granted-bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.