प्रत्येक गावातून दोन उमेदवार; लोकसभेला करणार धमाका, सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 06:17 AM2024-03-03T06:17:35+5:302024-03-03T06:18:00+5:30

अहमदनगर जिल्ह्यातही सकल मराठा समाजाची बैठक झाली असून  जिल्ह्यात ५०० उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. बीड जिल्हा कार्यकारिणीने २५३४ मराठा उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला.

Two candidates from each village; Loksabha will be bombed, the decision will be taken in the meeting of the entire Maratha community | प्रत्येक गावातून दोन उमेदवार; लोकसभेला करणार धमाका, सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

प्रत्येक गावातून दोन उमेदवार; लोकसभेला करणार धमाका, सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: आरक्षणावरुन मराठा समाजामध्ये खदखद असून येत्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून किमान दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शासनाने दिलेले एसईबीसी १० टक्के आरक्षण मनोज जरांगे पाटील मान्य करीत नाहीत, म्हणून त्यांच्याविरोधात एसआयटी लावून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व राजकीय पक्षांविरोधात असहकार आंदोलन छेडण्याची तयारी सुरु आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातही सकल मराठा समाजाची बैठक झाली असून  जिल्ह्यात ५०० उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. बीड जिल्हा कार्यकारिणीने २५३४ मराठा उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच हजार उमेदवार
- छत्रपती संभाजीनगर जिल्हा सकल मराठा समाजाची बैठक शनिवारी  पार पडली. बठकीत सुमारे पाच हजार उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रा. चंद्रकांत भराट म्हणाले की, जरांगे यांनी दोन शिव्या घातल्या तर शासनाने त्यांच्यावर एसआयटी नियुक्त केली. 

- मराठा समाजाला यापूर्वी दोनवेळा दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. असे असताना पुन्हा तसेच ५० टक्क्यांबाहेर आरक्षण माथी मारण्यात आले. हे आरक्षण जरांगे यांनी नाकारल्याने त्यांच्याविरोधात सरकारने कट रचण्यास सुरुवात केल्याने मराठा समाज संतप्त आहे. 

राजकीय पक्षांच्या मोर्चा, सभा, बैठकांवर बहिष्कार 
 कोणत्याही राजकीय पक्षाची सभा असो किंवा मोर्चा, बैठकांवर मराठा समाजाने बहिष्कार घालावा अथवा निषेधाचे फलक घेऊन उभे राहावे, असा निर्णय घेण्यात आला.  

बैठकीत मंजूर झालेले ठराव
राजकीय स्टेजवर मराठा समाज जाणार नाही, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण आम्हाला मान्य नाही. त्यामुळे जरांगे-पाटील ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असा ठराव घेण्यात आला.

आमदार पुत्राला उद्घाटन करण्यास केला विरोध
तुगंत (ता. पंढरपूर) येथे एका विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त माढा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे हे आले होते. यावेळी गावातील मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेऊन रणजितसिंह शिंदे यांना घेराव घातला. गावात नेत्यांना बंदी असताना तुम्ही गावात का आलात? तुम्हाला कुणबी दाखला आहे, मग आम्हाला नको का? असे म्हणत रणजितसिंह यांना आंदोलकांनी गावातून काढता पाय घेण्यास भाग पाडले.

Web Title: Two candidates from each village; Loksabha will be bombed, the decision will be taken in the meeting of the entire Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.