Traffic jam on the Ratnagiri-Mumbai-Goa highway, bypassing the tanker, the rows of vehicles on both sides of the highway | मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक धिम्या गतीने , क्रेनच्या मदतीन उलटलेला टँकर हटवला

मुंबई: रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यात दाभिळ येथे ॲसिडचा टँकर उलटून वायूगळती झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. तीन तासांनी वायूगळती थांबवून रस्ता धुतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. सुट्ट्यांमुळे महामार्गावरील वाहतूक वाढलेली असताना हा अपघात झाल्याने अनेक वाहने रखडली.
नायट्रेट ॲसिडची वाहतूक करणारा एक टँकर शनिवारी मध्यरात्री दाभिळ येथे उलटला. रस्त्याच्या कडेला तो पडला असल्याने वाहतूक सुरू होती. मात्र पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास या टँकरमधून वायूगळती सुरू झाली. त्यामुळे पोलिसांनी वाहतूक थांबवली.
प्रथम वायूगळती थांबवण्यात आली. क्रेनच्या सहाय्याने टँकर हलवण्यात आला. मात्र रस्यावर नायट्रेट ॲसिड पसरले होते. त्यामुळे औद्योगिक वसाहतीचा अग्निशमन बंब आणून रस्ता धुण्यात आला. तब्बल तीन तासांनी वाहतूक पूर्ववत झाली. मात्र तोपर्यंत असंख्य वाहने रस्त्याच्या दुतर्फा खोळंबली होती.

 एक्सप्रेस-वे: मुंबईकडे जाणारी वाहने एक तासाच्या अंतराने सोडणार-

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सलग सुट्टयांमुळे आज दुसर्‍या दिवशीही झालेली वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणारी वाहने लोणावळा एक्झिट जवळ रोखून धरण्याचा निर्णय महामार्ग पोलीसांनी घेतला आहे. एक एक तासाच्या अंतराने ही रोखलेली वाहने पुन्हा सोडण्यात येणार आहेत. या एक तासाच्या दरम्यान मुंबईहून पुण्याकडे येणारी सर्व वाहने ही मुंबई व पुणे या दोन्ही मार्गिकांवरुन सोडण्यात येणार असल्याचे महामार्गचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी सांगितले.
सलग सुट्टयांमुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज दुसर्‍या दिवशी देखिल खंडाळा ते आडोशी बोगदा दरम्यान व खालापुर टोलनाका परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. लाख प्रयत्न करुन देखिल वाहनांची संख्या वाढल्याने ही कोंडी सुटत नसल्याने यावर पर्याय म्हणून द्रुतगती मार्गावरुन मुंबईकडे जाणारी सर्व वाहने लोणावळा एक्झिटजवळ थांबविण्यात येणार आहे. यापैकी लहान वाहने लोणावा शहरातून सोडण्यात येतील व अवजड वाहने पुर्णपणे थांबविण्यात येणार आहे. एक एक तासाच्या अंतराने ही वाहने सोडण्यात येतील. या दरम्यान मुंबईकडून येणारी सर्व वाहने ही मुंबई व पुणे या दोन्ही मार्गीकांवरुन सोडण्यात येणार आहे. याकरिता महामार्ग पोलीसांचा ताफा द्रुतगतीवर तैनात करण्यात आला आहे.


Web Title: Traffic jam on the Ratnagiri-Mumbai-Goa highway, bypassing the tanker, the rows of vehicles on both sides of the highway
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.