भावी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरेंचा बॅनर; संजय राऊतांनी ३ वाक्यात स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 11:38 AM2023-03-22T11:38:40+5:302023-03-22T11:39:08+5:30

संजय राऊतांनी भाजपासह मंत्री दादा भूसेंचाही समाचार घेतला.

Thackeray group MP Sanjay Raut reacted On Banner of Raj Thackeray as future Chief Minister | भावी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरेंचा बॅनर; संजय राऊतांनी ३ वाक्यात स्पष्टच सांगितले

भावी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरेंचा बॅनर; संजय राऊतांनी ३ वाक्यात स्पष्टच सांगितले

googlenewsNext

मुंबई - मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी दादर परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यात शिवसेना भवनासमोरील एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले. जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी हा बॅनर सभास्थळी लावला आहे. या बॅनरवरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, देशात लोकशाही आहे. सामान्य नागरिकसुद्धा पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्री होऊ शकतो. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. जर बहुमत असेल तर तुम्ही त्या पदावर जाऊ शकता. शेवटी हा आकड्यांचा खेळ आहे. बहुमत हे नेहमी चंचल असते. आज आमच्याकडे बहुमत असेल तर उद्या दुसऱ्यांकडे असेल. त्यामुळे बहुमताच्या खेळावर कुणी अवलंबून राहू नये असं मत त्यांनी व्यक्त केले. 

राजीनामा द्या अन् निवडणुकीला सामोरे जा
दादा भूसेंच्या दाढीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करतायेत. मी कुणावरची व्यक्तिगत आरोप केला नाही. मी त्यांच्यावरही आरोप केलेला नाही. मालेगाव भागातील शेतकरी १ फेब्रुवारीपासून रस्त्यावर उतरले. गिरणा अॅग्रो सुगर फॅक्टरीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करण्यात आले. माझ्या हिशोबाने १७५ कोटी ५० लाख अशी ती रक्कम आहे. त्याचा हिशोब द्यावा. मी कुठे म्हटलं त्यांनी अमुक केले, तमुक केले, पैसे खाल्ले, हिशोब मागितला मग तुमची दाढी का जळावी? त्या पैशाचे काय केले ते सांगा. कोट्यवधी रुपये गोळा केले आणि हिशोब दीड-दोन कोटींचा दाखवता. शिवसेनेने तुम्हाला आमदार बनवले, तुम्ही शिवसेनेच्या मतांवर निवडून आलात आणि गद्दारी केली. तुम्ही आम्हाला सांगू नका, राजीनामा द्या अन् निवडणुकीला सामोरे जा अशा शब्दात संजय राऊतांनी दादा भूसेंना फटकारलं आहे. 

शिवसेना ही महाराष्ट्राची गुढी
महाराष्ट्राचा स्वाभिमान दाबण्याचा प्रयत्न भाजपाने केला. आगामी काळात महाराष्ट्रात शिवसेनेची गुढी उभारणार, हा जनतेचा संकल्प आहे. महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी उत्साहाने शोभायात्रा काढली जातेय. गेल्या काही काळात महाराष्ट्रात अनेक भागात शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस, गारपीट याने नुकसान झाले आहे. नवीन वर्ष येऊनसुद्धा शेतकऱ्यांच्या आयुष्यात काही फरक पडला नाही. शिवसेना ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गुढी आहे. शिवसेनेच्या रुपाने ही गुढी पुन्हा घराघरावर फडकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. 
 

Web Title: Thackeray group MP Sanjay Raut reacted On Banner of Raj Thackeray as future Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.