ओबीसींची एकच चळवळ, छगन भुजबळ! अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर चौकात झळकले फलक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 08:27 PM2023-12-11T20:27:20+5:302023-12-11T20:29:59+5:30

भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला आता थेट अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनीही पाठिंबा दिला आहे.

Students put up posters in Times Square in US in support of Chhagan Bhujbals OBC reservation agitation | ओबीसींची एकच चळवळ, छगन भुजबळ! अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर चौकात झळकले फलक

ओबीसींची एकच चळवळ, छगन भुजबळ! अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर चौकात झळकले फलक

महाराष्ट्रात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याने राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून काढलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावीत, अशी मागणी करत आंदोलन सुरू केलं आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसींनी एल्गार मेळावे आयोजित करत जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. राज्यभरात यावरून वाद-प्रतिवाद सुरू असताना भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील लढ्याला आता थेट अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनीही पाठिंबा दिला आहे. याबाबतचे फोटो छगन भुजबळ यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

छगन भुजबळ यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, " एकच पर्व,आता सातासमुद्रापारही ओबीसी पर्व! गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आपल्या ओबीसी लढ्याचा आवाज आता साता समुद्रापार पोहचलाय. अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांनी न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअर चौकात आपल्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाला पाठिंबा देणारे फलक झळकावले आहेत. परदेशात आपला ओबीसी आवाज बुलंद करणाऱ्या या युवकांचे मनापासून आभार आणि अभिनंदन."

भुजबळ यांनी आपल्या पोस्टमधून अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांना लक्ष्य केलं आहे. "गेल्या काही महिन्यांपासून दहशतीखाली वावरणारा आपला ओबीसी समाज आता एकजूट झाला आहे आणि काही ठराविक लोकांच्या झुंडशाहीला, दादागिरीला ना घाबरता आपले हक्काचे आरक्षण वाचविण्यासाठी हिमतीने लढतोय, हे आपल्या या लढ्याचं खूप मोठं यश आहे. आजही आपल्या ओबीसीमधील अनेक घटक शिक्षण, नोकरी आणि सरकारी सवलतींपासून वंचित आहे. त्यांना अजूनही प्रगतीची, विकासाची दारे उघडणं दूरच, किलकिली देखील झालेली नाहीत. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचं आहे आणि अमेरिकेत शिकणाऱ्या आपल्या या युवकांप्रमाणेच सक्षम आणि सुशिक्षित करायचं आहे. ओबीसीमधील ३७५ जातींमधील प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत विकासाचा हा किराणा पोहचत नाही तोपर्यंत आपला हा लढा सुरूच राहणार आहे. त्यासाठी झुंडशाहीच्या बळावर सरकारवर दबाव आणून आपल्या ओबीसी आरक्षणात मागच्या दाराने बेकायदेशीरपणे घुसखोरी करू पाहणाऱ्यांना आधी आपल्याला तोंड द्यायचं आहे. त्यासाठी आपली ही एकजूट अशीच कायम ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी ओबीसींमधील प्रत्येक घटकाच्या साथीने आपण लढत राहूया," असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे.

दरम्यान, "मित्रांनो, तुम्ही उचललेलं हे पाऊल कोट्यवधी ओबीसी युवकांना नक्कीच एक ऊर्जा आणि प्रेरणा देईल, यात शंकाच नाही," असंही छगन भुजबळ म्हणाले.

Web Title: Students put up posters in Times Square in US in support of Chhagan Bhujbals OBC reservation agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.