संशयित माओवाद्यांविरुध्द ठोस पुरावे : पोलीस आयुक्तांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 09:21 PM2018-08-30T21:21:01+5:302018-08-30T21:32:27+5:30

पुणे पोसांनी अटक केलेल्या संशयितांचे माओवाद्यांशी संबंध असलेल्याचे ठोस पुरावे आहेत. आतापर्यंत झालेल्या कारवाया आणि यापुढे होणार असलेल्या कारवायांसाठीही हे पुरावे पुरेसे आहेत.

strong evidence against suspected Maoists : Police Commissioner's claim | संशयित माओवाद्यांविरुध्द ठोस पुरावे : पोलीस आयुक्तांचा दावा

संशयित माओवाद्यांविरुध्द ठोस पुरावे : पोलीस आयुक्तांचा दावा

ठळक मुद्देमिळालेल्या मुदतीत प्रतिज्ञापत्र सादर करूसंशयितांविरुद्ध कागदपत्रे, निधी गोळा करणे, विद्यार्थी नक्षलग्रस्त भागात पाठविणे याचे पुरावे शहरी नक्षलवाद आणि त्याच्याशी आरोपींचा संबंध याचे ठोस पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर करणार

पुणे : पुणेपोलिसांनी अटक केलेल्या संशयितांचे माओवाद्यांशी संबंध असलेल्याचे ठोस पुरावे आहेत. आतापर्यंत झालेल्या कारवाया आणि यापुढे होणार असलेल्या कारवायांसाठीही हे पुरावे पुरेसे आहेत.  या आरोपींना नजरकैदेत ठेवल्यानंतर मिळालेल्या मुदतीत आम्ही ठोस पुरावे व प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करू, असे पोलीस आयुक्त डॉ़ के. व्यंकटेशम यांनी सांगितले़ 
पुणे पोलिसांनी अटक केलेल्या डाव्या विचारसरणीच्या पाच जणांना सर्वोच्च न्यायालयाने पोलीस कोठडीऐवजी नजरकैदेत ठेवण्याचे आदेश बुधवारी दिले होते़. त्यानुसार त्यांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे़. याबाबत डॉ़ व्यंकटेशम यांनी आतापर्यंत झालेल्या कारवायांवरच पोलीस थांबणार नसून यापुढेही आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता असून त्याचे पुरावेही असल्याचे सूचित केले़.  डॉ़ व्यंकटेशम म्हणाले, प्रत्येकांचा सहभाग, त्यांची भूमिका, कटकारस्थानातील सहभाग, त्याची अंमलबजावणी आणि विचारसरणी कशी पसरावयाची याचे ठोस पुरावे आहेत. त्यांचा सहभाग निश्चित होईल अशा संदर्भातील कागदपत्रे, निधी गोळा करणे, विद्यार्थी नक्षलग्रस्त भागात पाठविणे याचे पुरावे आहेत़. शस्त्र खरेदी संबंधीची चर्चा, पैसे व निधी गोळा करण्यासंबंधीचे संभाषण तसेच शस्त्र खरेदीचे अधिकार कोणाला असावेत,  याबाबत त्यांच्यात झालेल्या चर्चांचे पुरावे पोलिसांकडे आहेत़.. 
एम ४ या शस्त्रांच्या खरेदी करण्यासाठी वरावरा राव यांच्याकडे अधिकार दिले होते, असे सांगून एम ४ चा फोटोही डॉ़ व्यंकटेशम यांनी यावेळी दाखविला़. ते म्हणाले, एल्गार परिषदेविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्या वेळी असलेले स्वरुप आणि आता त्याची व्यापी खूप वाढत गेली आहे़. ही सर्व मराठीतून सर्च वॉरंट काढली असली तरी त्यांना हिंदीतून समजावून सांगितली आहेत़. 
राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याविषयी ठोस पुरावा
राजीव गांधी यांच्याप्रमाणे देशातील वरिष्ठ राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याच्या कटाविषयी व्यंकटेशम म्हणाले, सीपीआय माओवादी संघटनेच्या वतीने शहरी भागात त्यांची आघाडीची संघटना स्थापन करुन त्या माध्यमातून देशविरोधी कृत्य, लोकशाहीवादी सरकार उलथवून लावण्याकरिता विविध प्रकारे प्रयत्न सुरु आहेत़. राजकीय पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करुन त्यांना संपविण्यासंबंधीचे कटकारस्थान त्यांनी आखले होते व ते घडविणार होते, त्याचे ठोस पुरावे पोलिसांकडे आहेत़. जप्त केलेल्या साहित्यातून शस्त्र खरेदी, अंमलबजावणी याबाबतचे पुरेसे पुरावे आमच्याकडे आहेत़. जप्त केलेल्या बाबी या फॉरेन्सिक लॅबला पाठविणार आहोत़.
या आरोपींना अटक करताना अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप केला जात असल्याचे विचारल्यावर त्यांनी सर्व काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही बाबी विचारल्या गेल्या असल्याचे सांगितले़. 
...................
नजरकैद ही पोलिसांना मिळालेली संधी
 नक्षलवादी चळवळीचे थिंक टँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पाच जणांची पोलीस कोठडी मिळण्यात पोलिसांना अपयश आले असे वाटते का, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी नजरकैद ही पोलिसांना मिळालेली चांगली संधी असल्याचे सांगितले़. पोलिसांना स्थानिक न्यायालयात पोलीस कोठडी मिळाली असती तर त्यासंबंधीचे पुरावे तेथेच सादर करावे लागले असते़. आता याची दखल उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने घेतल्याने देशभरातील शहरांमध्ये पसरविण्यात येत असलेल्या शहरी नक्षलवाद आणि त्याच्याशी या आरोपींचा असलेला संबंध याचे ठोस पुरावे आता सर्वोच्च न्यायालयात सादर करता येणार आहेत़. त्यातून यांच्या कटकारस्थानांची देशपातळीवर दखल घेतली जाईल़. दुसरीकडे न्यायालयाने त्यांना नजरकैदेत ठेवले असल्याने या काळात त्यांना  हालचाली करता येणार नाहीत़. पोलीस ठोस पुरावा एकत्र करू शकतील, असे त्यांनी सांगितले़.

Web Title: strong evidence against suspected Maoists : Police Commissioner's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.