महाराष्ट्रातील ८३ किल्ले बनले राज्य संरक्षित स्मारक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 04:58 AM2019-04-26T04:58:01+5:302019-04-26T04:58:30+5:30

गड-किल्ले संवर्धन समितीचा निर्णय; ठाण्यातील ११, रायगडमधील ९ किल्ल्यांचा समावेश

State Protected Monuments, 83 Forts In Maharashtra | महाराष्ट्रातील ८३ किल्ले बनले राज्य संरक्षित स्मारक

महाराष्ट्रातील ८३ किल्ले बनले राज्य संरक्षित स्मारक

googlenewsNext

पोलादपूर : महाराष्ट्र शासनाच्या गड-किल्ले संवर्धन समितीने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे महाराष्ट्रातील ८३ किल्ले राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यातील ११, तर रायगड जिल्ह्यातील नऊ किल्ल्यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती गडसंवर्धन समितीचे सदस्य अमर आडके यांनी दिली. ८३ किल्ल्यांपैकी ५१ किल्ले राज्य संरक्षित स्मारक घोषित होण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत.

पोलादपूर तालुक्यातील ढवळे विभागातील किल्ले चंद्रगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. चंद्रगड, कंगोरीगड या गडांवर गेल्या चार-पाच वर्षांत पर्यटक मोठ्या संख्येने येत असून ढवळे, चंद्रगड ते और्थर सेट महाबळेश्वर असा ट्रेक अनेकजण करतात, त्यामुळे चंद्रगडला विशेष महत्त्व आहे. १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड स्वराज्यात आणला. जोर खोरे, ढवळे घाट, जावळी खोरे या सर्व विभागांवर नजर ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग केला जात होता. हा गड राज्य संरक्षित स्मारक झाल्याने सोयी-सुविधा उपलब्ध होऊन पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी होतील आणि स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, अशी आशा आडके यांना आहे.

गडसंवर्धन समितीच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे किल्ले पहिल्या टप्प्यात संरक्षित करण्याचा निर्णय झाला. हे किल्ले ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असूनही ते अनेक वर्षे संरक्षित केले गेले नव्हते. म्हणजे त्या किल्ल्यांना राज्य संरक्षित स्मारक हा दर्जा नव्हता. ज्या असंरक्षित किल्ल्यांवर अवशेष शिल्लक आहेत व ज्यांचा पुरातत्त्वीय संकेतानुसार विकास करण्यास वाव आहे, असे असंरक्षित किल्ले महाराष्ट्र शासनाने ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करावेत, अशी मागणी समिती सदस्यांनी ६ एप्रिल २०१६ रोजी केली होती, अशी माहिती आडके यांनी दिली. त्यानुसार बैठकीमध्ये पुढील किल्ले लवकरात लवकर संरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पहिल्या टप्प्यातील किल्ले
ठाणे जिल्हा - तारापूर, केळवे, माहिम, तांदूळवाडी, कोहोज, अशेरी, गोरखगड, गंभीरगड, सेगवा, भवानगड, मलंगगड
रायगड जिल्हा - खांदेरी, थळ, सागरगड, साम्राजगड, कर्नाळा, मृगगड, सांकशी, सरसगड, पेब, चंद्रगड
रत्नागिरी जिल्हा - कनकदुर्ग, साटवली, पालगड, महिपतगड, सुमारगड, नवते किंवा गुढे किल्ला
सिंधुदुर्ग जिल्हा - देवगड
सातारा जिल्हा - चंदन, वंदन, वैराटगड, पांडवगड, अजिंक्यतारा, वारुगड, संतोषगड, भूषणगड, वर्धनगड, वसंतगड, दातेगड, कमळगड, वासोटा, नांदगिरी, केंजळगड, भैरवगड
सांगली जिल्हा - प्रचितगड, भूपाळगड, मच्छींद्रगड
कोल्हापूर जिल्हा - शिवगड, कलानिधीगड, गंधर्वगड, पारगड, गगनगड, पावनगड, सामानगड, महिपालगड
पुणे जिल्हा - तिकोना, तुंग, घनगड, हडसर, चावंड, रोहिडा
अहमदनगर जिल्हा - बहादूरगड, हरिश्चंद्रगड, पट्टा, अलंग, कुलंग आणि मदन
नाशिक जिल्हा - कावनई, त्रिंगलवाडी, त्रिंबकगड, हर्षगड, भास्करगड, चौल्हेर, धोडप, हातगड, अहिवंतगड, रवळ्या, जवळ्या, माकंर्डेया, इंद्राई, राजदेहेर, चांदवड, डेरमाळ
औरंगाबाद जिल्हा - सुतोंडा

५१ किल्ले राज्य संरक्षित स्मारक
विशेष म्हणजे, या ८३ किल्ल्यांपैकी ५१ किल्ले राज्य संरक्षित स्मारक घोषित होण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. पुरातत्त्व विभागाने सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. अशा प्रकारे एकाच वेळी ५१ किल्ले राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्र शासनाने गठीत केलेल्या गडसंवर्धन समितीचे आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे हे यश आहे. या यादीत जे किल्ले नाहीत; पण ऐतिहासिक तसेच पुरातत्त्वीय दृष्टीने महत्त्वाचे आहेत अशा किल्ल्यांची नावे पुढील टप्प्यात समाविष्ट करण्यात येणार आहेत.

Web Title: State Protected Monuments, 83 Forts In Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.