कोळी आणि जैवविविधता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 07:35 AM2018-05-22T07:35:59+5:302018-05-22T07:35:59+5:30

जगाच्या पाठीवर कोळ्यांच्या एकूण ४७ हजार ५१८ प्रजाती आढळतात. यातही भारतातील संख्या १७१८ इतकी आहे.

Spiders and Biodiversity | कोळी आणि जैवविविधता

कोळी आणि जैवविविधता

googlenewsNext

पृथ्वीतलावर प्रत्येक सजीवाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातीलच एक दुर्लक्षित केला जाणारा प्राणी म्हणजे कोळी (स्पायडर) होय. जगाच्या पाठीवर कोळ्यांच्या एकूण ४७ हजार ५१८ प्रजाती आढळतात. यातही भारतातील संख्या १७१८ इतकी आहे.
वेगवेगळ्या हवामानामध्ये किंवा वातावरणात जसे पाणी, जमिनीत छिद्र करून किंवा झाडाच्या खोडात, फांद्यावर, पान गुंडाळून, पालापाचोळ्यात कोळ्यांचे वास्तव्य पाहायला मिळते. कोळी म्हणजे आठ पाय, आठ डोके, सिल्क ग्लँड (ज्याच्या साहाय्याने कोळी आपले जाळे तयार करतो), वेगवेगळे रंग असे हे कोळी. कोळ्यांबद्दल अनेक गैरसमज आहेत. जसे कोळी विषारी असतात. कोळी चावा घेतात. त्यामुळे झालेली जखम चिघळते. प्रत्यक्षात कोळ्याच्या विषाने फक्त किडे मरतात, मनुष्य नव्हे. कोळी त्याच्या वजनाच्या दहापट वजनाचे किडे रोज खातो. दोन-तीन दिवस खायला नाही मिळाले तरी त्याला फारसा फरक पडत नाही. बरेचसे कोळी निशिचर आहेत. कोळ्यांमध्ये प्रमुख दोन प्रकार आहेत. मेगलमोरफे, जे हाताच्या पंजाइतके मोठे असतात. दुसरा प्रकार म्हणजे अरेनिओमोरफे. यात इतर सर्व प्रकारचे कोळी येतात. मादीच्या पोटाच्या मागच्या बाजूस इपिजीन नावाचा आॅर्गन असतो. ज्याच्या मांडणीवरून आपण मायक्रोस्कोपच्या साहाय्याने तो कुठल्या जातीचा आहे हे समजते. नराच्या तोंडाच्या जवळ दोन पडीपाल्प असतात. यामध्ये शुक्राणू साठवलेले असतात.
एक मादी कोळी जवळपास २६०० अंडी देते. ही सर्व अंडी अंडकोशामध्ये असतात. कोळी मादी दहा ते १३ वेळा कात टाकते आणि वयात येते. नर हा तीन ते चार वेळा कात टाकतो. कोळ्यांचे आयुष्य हे फक्त सात ते नऊ महिने इतके असते. काहींचे ते एक ते तीन वर्षांपर्यंतसुद्धा असू शकते. कोळ्यांचे रेशीम हे वॉटरप्रूफ, अ‍ॅण्टीमायक्रोबायल, बायोडीग्रेडेबल असते. हे इतके मजबूत असते की, यापासून भूकंपरोधक घर, बुलेटप्रूफ जॅकेट फिशिंग नेटशिवाय बायोमेडिकल मटेरियल बनविले जाते.
कोळी शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो पिकांवरील कीड खातो. जमीन सछिद्र करून पावसाचे पाणी मुरण्यास मदत करतो. कोळी हा अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक आहे. परागीकरण करणाºया किड्यांचे मुख्य खाद्य हा कोळी आहे. म्हणून जर कोळी वाचतील तर अन्नसाखळी वाचेल आणि पर्यावरणसुद्धा.

- डॉ. मिलिंद शिरभाते,
सहा. प्राध्यापक, प्राणिशास्त्र विभाग,
शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोला

Web Title: Spiders and Biodiversity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.