खेळ निसर्गाचा कुणाला कळला!

By admin | Published: July 5, 2015 02:49 AM2015-07-05T02:49:26+5:302015-07-05T02:49:26+5:30

एका बाजूला जंगलांचे प्रमाण कमी होतेय, तर दुसऱ्या बाजूला हवेतील कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण वाढतेय. त्यामुळे वाढणारा हा कार्बन वायू कोण शोषून घेणार?

Someone knows the nature of the game! | खेळ निसर्गाचा कुणाला कळला!

खेळ निसर्गाचा कुणाला कळला!

Next

- डॉ. मधुकर बाचूळकर

(लेखक हे निष्णात पर्यावरण संशोधक व प्राध्यापक आहेत.)

एका बाजूला जंगलांचे प्रमाण कमी होतेय, तर दुसऱ्या बाजूला हवेतील कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण वाढतेय. त्यामुळे वाढणारा हा कार्बन वायू कोण शोषून घेणार? त्याचे हवेतील प्रमाण वाढल्यानेच जागतिक तापमानातही वाढ झाली आहे. वातावरण तापते आहे, निसर्गाचे चक्रच बदलत आहे. आपण निसर्गाशी खेळत आलो आहोत, आता निसर्ग आपल्याशी खेळू लागलाय का, असा प्रश्न भेडसावू लागला आहे.

पर्यावरणाचा संबंध जंगलाशी आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी एकूण जमिनीच्या ३३ टक्के जंगल आवश्यक असते. हे प्रमाण विकसित असो, वा विकसनशील कोणत्याच देशात राहिलेले नाही. शासकीय आकडेवारीनुसार, भारतात २० टक्के जमिनीवर जंगल आहे. महाराष्ट्रात ते २० ते २२ टक्के जमिनीवर आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते मात्र भारतात केवळ १० टक्के जमिनीवरच जंगल शिल्लक राहिले आहे. मानवाने स्वत:च्या विकासासाठी जंगलांवर कुऱ्हाड चालविली त्याचाच हा परिणाम. असे असेल, तर कसा टिकणार निसर्गाचा समतोल?
निसर्गाचा समतोल ढळण्याला जशी जंगलतोड कारणीभूत आहे त्याचप्रमाणे जागतिक तापमानात होणारी वाढही तितकीच कारणीभूत आहे. जागतिक तापमानवाढ कशामुळे होतेय तर हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे. हवेतील विषारी वायू घटक वाढल्यामुळे. यालाच ग्रीन हाउस इफेक्ट किंवा हरित वायूंचे उत्सर्जन असे म्हणतात. या हरित वायूंमध्ये प्रामुख्याने कार्बन डायआॅक्साइड, मिथेन आणि नायट्रोस आॅक्साइड यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत जगभरात कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण जवळपास ३३ ते ३६ टक्क्यांनी वाढले आहे आणि जागतिक तापमानवाढीला कार्बन डायआॅक्साइडच ७० टक्के कारणीभूत आहे.
जंगल आणि कार्बन डायआॅक्साइडचा अन्योन्य संबंध आहे. मानवाला जसे जगण्यासाठी आॅक्सिजनची गरज आहे तशीच गरज वनस्पतींना कार्बन डायआॅक्साइडची आहे. वनस्पती कार्बन डायआॅक्साइड शोषून घेतात आणि आॅक्सिजन बाहेर सोडतात. यालाच शास्त्रीय भाषेत प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. एका बाजूला जंगलांचे प्रमाण कमी होतेय, तर दुसऱ्या बाजूला हवेतील कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण वाढतेय. त्यामुळे वाढणारा हा कार्बन वायू कोण शोषून घेणार? त्याचे हवेतील प्रमाण वाढल्यानेच जागतिक तापमानातही वाढ झाली आहे. मिथेन वायूचे प्रमाणही असेच वाढत आहे. रवंथ करणारे प्राणी मिथेन वायू सोडतात. भातशेतीतून तसेच जनावरांचे शेण कुजल्यानंतर त्यातून बाहेर पडणारा वायूही मिथेनच. त्याचेही प्रमाण वाढतच आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल डिझेलसारख्या इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडणारा वायू म्हणजे नायट्रोस आॅक्साईड. औद्योगिकीकरणाबरोबरच वाहनांची वाढती संख्याही नायट्रोस आॅक्साइडच्या वाढीस कारणीभूत आहे. या तीन वायूंच्या उत्सर्जनाचा परिणाम म्हणूनच ग्लोबल वॉर्मिंगची समस्या उद्भवली आहे. परिणामी, ध्रुव प्रदेशातील बर्फ वितळू लागले आहे. बर्फाचे होणारे हे पाणी नदीमार्गे समुद्रात मिसळत आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे .

अमेरिका सर्वाधिक जबाबदार
समुद्राच्या पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवावयाची असेल, तर जागतिक तापमान नियंत्रणात ठेवले पाहिजे. त्यासाठी जंगल, वनसंपत्ती वाढली पाहिजे. कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण कमी केले पाहिजे.
याची जाणीव सर्वच देशांना आहे. जागतिक पातळीवर या विषयांवर बैठकाही होतात, पण कोणताही देश ही बाब गांभीर्याने घेत नाही. कार्बन डायआॅक्साइडचे हवेतील प्रमाण वाढविण्यास कारणीभूत असलेल्या देशांमध्ये अमेरिकेचा क्रमांक पहिला आहे.
चीन दुसऱ्या स्थानावर आहे. तर युरोपीयन युनियन आणि भारताचा अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक लागतो.

१४वा मोठा उन्हाळा
अंटार्क्टिकावरील बर्फाची तसेच महासागरातील पाण्याची मोठ्या प्रमाणावर वाफ झाली आहे. ही प्रचंड प्रमाणात झालेली वाफ पृथ्वीच्या वातावरणात अति उंचीपर्यंत साठत गेली. त्यामुळे पृथ्वीच्या अनेक भागांत गारांचा मारा आणि अतिवृष्टी झाली.
महत्त्वाचे म्हणजे कार्बन डायआॅक्साइड हा वायू पृथ्वीकडून परावर्तित होणारी उष्णता धरून ठेवतो. परिणामी, वातावरणातील तापमान अधिकाधिक वाढते आहे. सलग १५ वर्षांचा विचार करता हा १४वा मोठा उन्हाळा आहे.

जगभरातील महत्त्वाच्या हवामानशास्त्र संस्था व विभाग
ब्युरो आॅफ मेटेरॉलॉजी
आॅस्ट्रेलिया परिसरासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. १९०८ पासून कार्यरत असणाऱ्या या वेधशाळेचे मुख्यालय मेलबर्न, डॉकलँड्स येथे आहे. पूरस्थिती, वादळे यांसारख्या आपत्तींची माहिती ही संस्था देते.
मेटेरॉलॉजिकल
सर्व्हिसेस आॅफ कॅनडा
ही कॅनडामधील हवामान, वातावरणातील बदल, अंदाज तसेच इतर माहिती प्रसारित करणारी संस्था आहे. टोरंटो व ओंटारिओ
येथे मुख्यालय असणाऱ्या या वेधशाळेची स्थापना १८७१ साली झाली आहे. एन्व्हायर्नमेंट कॅनडा या पितृसंस्थेच्या अंतर्गत ही वेधशाळा काम करते.
हायड्रो-मेटेरॉलॉजिकल
सेंटर आॅफ रशिया
रशियामधील हवामानविषयक अभ्यास करणारी संस्था मॉस्कोमध्ये आहे. सागरी हालचाली, हवामान, बदल तसेच हवामान अंदाज वर्तविणे आदी क्षेत्रांमध्ये
आयआयटीएम
इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी (आयआयटीएम) ही संस्था पुण्यात पाषाण येथे असून, मान्सून व इतर हवामानविषयक माहिती देऊन अंदाजही वर्तविते.
चायना मेटेरॉलॉजिकल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन
१९४९ मध्ये या संस्थेची बीजिंगमध्ये स्थापना झाली. ३१८ मेटेरॉलॉजिकल उपवेधशाळा असून, येथून सर्व माहितीचे संकलन केले जाते.
इंडियन मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट
याची स्थापना १८७५ साली ब्रिटिशांनी केली. याचे मुख्यालय नवी दिल्लीमधील मौसम भवन येथे आहे. याच्या अनेक उप वेधशाळा असून, अंटार्क्टिकावर देखील याची प्रयोगशाळा आहे. भारत, हिंदी महासागर, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर येथील हवामान व जल हालचालींची माहिती प्रसिद्ध करण्याचे व हवामानाचा अंदाज व्यक्त करण्याचे काम केले जाते.
जपान मेटेरॉलॉजिकल एजन्सी
टोकियो येथे मुख्यालय असणाऱ्या या संस्थेची स्थापना १९५६ मध्ये झाली. पीत समुद्र, साऊथ चायना समुद्र, सी आॅफल जापान, सुलू समुद्र येथिल जल हालचालींची माहिती व हवामानाचा अंदाज वतर्विण्याचे काम केले जाते.
अमेरिकेतील संस्था
अमेरिकेमध्ये नॅशनल सेंटर आॅफ अ‍ॅटमॉस्फेरिक रिसर्च, नॅशनल ओशॅनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक रिसर्च, नॅशनल सिव्हिअर स्टॉर्म्स लॅबोरेटरी, नॅशनल क्लायमेटिक डेटा सेंटर, नॅशनल व्हेदर सर्व्हिसेस, नॅशनल सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट प्रेडिक्शन, नॅशनल हरिकेन सेंटर, स्टॉर्म प्रेडिक्शन सेंटर अशा संस्था काम करतात.

Web Title: Someone knows the nature of the game!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.