सिन्नरमध्ये कोकाटेंची भूमिका ठरणार महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 05:33 PM2019-07-17T17:33:45+5:302019-07-17T17:37:21+5:30

कोकाटे हे विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवणार की पुन्हा लोकसभाप्रमाणे अपक्ष उभे राहणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

sinnar assembly constituency important kokate decision | सिन्नरमध्ये कोकाटेंची भूमिका ठरणार महत्त्वाची

सिन्नरमध्ये कोकाटेंची भूमिका ठरणार महत्त्वाची

googlenewsNext

मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे गणित सर्वच पक्षाकडून लावणे सुरु झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघात सुद्धा मोठ्याप्रमाणात इच्छुकांची गर्दी पहायला मिळत आहे. युतीकडून विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव निश्चित समजले जात आहे. मात्र महाआघाडीकडे अजूनही सक्षम असा उमदेवार नसल्याने शोधाशोध सुरु आहे. तर मागच्यावेळी भाजपकडून रिंगणात असलेले आणि लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे माजी आमदार माणिकराव कोकाटे हे कोणत्या झेंड्याखाली निवडणूक लढवणार हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे  सिन्नर मतदारसंघात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

२००९ मध्ये सिन्नर मतदारसंघात माणिकराव कोकाटे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीकडून उमदेवारी न मिळाल्याने कोकाटे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र २०१४ मध्ये भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या कोकाटेंचा शिवसेनेचे उमदेवार राजाभाऊ वाजे यांनी पराभव केला होता. तर यावेळी पुन्हा सिन्नर मतदारसंघात आजी-माजी आमदारांची लढत महत्त्वाची ठरणार आहे. असे असली तरीही कोकाटे मात्र कोणत्या झेंड्याखाली निवडणूक लढवणार याची उत्सुकता त्यांच्या कार्यकर्त्यांना लागली आहे.

लोकसभा निवडणुकीत कोकाटे यांना एकट्या सिन्नरमधून ९१ हजार मते मिळाली होती. हीच मते विधानसभेत मिळतील अशी अपेक्षा कोकाटे यांच्या समर्थकांना आहे. तर दुसरीकडे मात्र मधल्या काळात झालेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनला मोठ यश मिळाले होते. त्यामुळे विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे यांना सुद्धा आपलाच विजय होणार अशी अपेक्षा आहे.

सिन्नर मतदारसंघात युतीत शिवसेनेला तर महाआघाडीत काँग्रेसकडे ही जागा आहे. त्यामुळे कोकाटे हे विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवणार की पुन्हा लोकसभाप्रमाणे अपक्ष उभे राहणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. या बरोबरच कोकाटे हे त्यांच्या कन्या सीमंतीनी कोकाटे यांना सुद्धा अपक्ष म्हणून रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सिन्नरमधील लढतीत कोकाटेंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Web Title: sinnar assembly constituency important kokate decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.