शिवसेनेने फोडले निवडणूक यंत्रणेवर खापर, भाजपाला केले टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 06:07 AM2018-06-01T06:07:53+5:302018-06-01T06:07:53+5:30

पालघर पोटनिवडणुकीत साडेआठ लाख मतदारांपैकी सहा लाख मतदारांनी भाजपाला नाकारले.

Shivsena split on election machinery, targets BJP | शिवसेनेने फोडले निवडणूक यंत्रणेवर खापर, भाजपाला केले टार्गेट

शिवसेनेने फोडले निवडणूक यंत्रणेवर खापर, भाजपाला केले टार्गेट

Next

मुंबई : पालघर पोटनिवडणुकीत साडेआठ लाख मतदारांपैकी सहा लाख मतदारांनी भाजपाला नाकारले. मतदान यंत्रांमधील गडबडींमुळे भाजपाला विजय मिळाला, या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टार्गेट तर केले पण शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडण्याबाबत मात्र त्यांनी मौन बाळगले.
निकालानंतर आयोजित पत्रपरिषदेत ठाकरे यांनी पालघरच्या निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित करून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची नि:पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. ते म्हणाले, भाजपा उमेदवार राजेंद्र गावित यांनी मागणी करताच मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली होती. जिल्हाधिकाºयांनी मतदानाची अंतिम आकडेवारी त्यांच्या सहीने जारी केल्यानंतर लाखभर मतदान कसे वाढले याची चौकशी झाली पाहिजे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. मी आज जे मुद्दे मांडत आहे ते अधिक गंभीर आहेत आणि ते जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे सांगत त्यांनी विषयाला बगल दिली.
निवडणूक अधिकारी सरकारचे बाहुले बनून काम करणार असतील तर क्रिकेटमध्ये अंपायर जसे बाहेरून बोलावतात तसे निवडणूक निरीक्षकही बाहेरून बोलावण्याची वेळ आली आहे. मतदानादरम्यानचे घोळ असेच वाढले तर लोकांचा लोकशाहीवर विश्वासच राहणार नाही, असे ठाकरे म्हणाले. लोकशाहीची थोडी बूज असेल तर निवडणूक आयोग पालघरमधील निवडणूक प्रक्रियेची चौकशी करेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शिवसेनेने पालघरमधील जागा निसटत्या मतांनी गमावली. चार-पाच तगडे उमेदवार असल्याने भाजपाचे जमले. खरेतर, हा भाजपाचा विजयच नाही, असे सांगून ठाकरे म्हणाले, अलीकडे भाजपा ज्या पद्धतीने वागत आणि बोलत आहे त्यावरून त्यांना मित्रपक्षांची गरज राहिलेली दिसत नाही.
पालघरमध्ये वनगा परिवाराला न्याय देण्यासाठी आम्ही लढलो. निवडणुकीच्या काळात पालघरवासीयांना जी आश्वासने शिवसेनेने दिली ती पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध राहू, असेही ते म्हणाले.

Web Title: Shivsena split on election machinery, targets BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.