संजय राऊतांची नार्वेकरांवर बोचरी टीका; भाजपा आमदार सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 07:28 PM2024-01-10T19:28:35+5:302024-01-10T19:51:18+5:30

Shiv Sena MLA Disqualification Hearing:  शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

 Shiv Sena MLA Disqualification Hearing After Sanjay Raut criticized Rahul Narvekar, BJP MLA Ram Kadam has said that he will bring a disqualification motion in the House  | संजय राऊतांची नार्वेकरांवर बोचरी टीका; भाजपा आमदार सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार

संजय राऊतांची नार्वेकरांवर बोचरी टीका; भाजपा आमदार सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार

मुंबई: अवघ्या देशाच्या राजकारणाचं लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केला. या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्षच मुख्य शिवसेना असल्याचे निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवले. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर बोचरी टीका केली. नार्वेकरांनी दिल्लीतून आलेली स्क्रीप्ट वाचली असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षांनी निकाल जाहीर करताच संजय राऊत यांनी सामना कार्यालयाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू असून दिल्लीतील ताकद यासाठी दुर्दैवाने मराठी माणसाचाच  वापर करत आहे. एका मराठी माणसानेच शिवसेना संपवण्यात हातभार लावला. शिवसेना संपवण्याचा भाजपाचा कट असून हे त्यांचे जुने स्वप्न होते. जनतेच्या मनामनात असलेली शिवसेना अशी संपणार नाही. आजचा निकाल अंतिम नाही, आम्ही सर्वोच्च न्यायालयात आवाज उठवूच... पण एकनाथ शिंदेंना जनता कधीच माफ करणार नाही, त्यांनी केलेले पाप कधीच पुसणार नाही, असेही राऊतांनी म्हटले. 

राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल 
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल बोलताना राऊतांनी बोचरी टीका केली. ज्यावरून भाजपा आमदार राम कदम यांनी राऊतांविरोधात सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे म्हटले. "राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात आम्ही नक्कीच सर्वोच्च न्यायालयात जाऊ. त्यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला हे स्पष्ट दिसले. त्यांनी नोंदवलेले निरीक्षण हे त्यांचे हे नसून दिल्लीतून आले आहे. याची सर्वांनाच कल्पना आहे, पण शिवसेना संपवण्यासाठी मराठी माणूसच पुढे आला हे दुर्दैव आहे. जनता तुम्हाला माफ करणार नाही", अशा शब्दांत संजय राऊतांनी नार्वेकरांचा समाचार घेतला. 

तसेच विधानसभा अध्यक्षांकडे आज इतिहास लिहण्याची सुवर्णसंधी होती. पण त्यांनी तसे काही न करता महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे पाप केले आहे. त्यांनी जाहीर केलेला निर्णय म्हणजे मॅच फिक्सिंग होती. या निर्णयावरून जे टाळ्या वाजवत आहेत, फटाके फोडण्यात मग्न आहेत, ते सर्व गद्दार आणि बेईमान असून त्यांना जनता धडा शिकवेल, असेही राऊंतानी नमूद केले.

राम कदम आक्रमक
संजय राऊतांनी नार्वेकर यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर केल्याचा दाखला देत राम कदम यांनी सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे सांगितले. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले, "श्रीमान संजय राऊत यांच्यावर विधान सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार... राऊत यांनी  मा. विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर करत स्वतःच्या पराभूत उध्वस्त मानसिकतेचे दर्शन घडविले... हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. पवित्र अशा महान परंपरा असणाऱ्या विधानसभेचा अपमान आहे." 

विधानसभा अध्यक्षांचा मोठा निकाल 
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सर्व १६ आमदारांना पात्र ठरवले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या १६ पैकी एकाही आमदाराला अपात्र ठरवता येणार नाही, असे राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचताना स्पष्टपणे सांगितले. विशेष म्हणजे भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती देखील विधानसभा अध्यक्षांनी वैध ठरवली आहे.

Web Title:  Shiv Sena MLA Disqualification Hearing After Sanjay Raut criticized Rahul Narvekar, BJP MLA Ram Kadam has said that he will bring a disqualification motion in the House 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.