सिंधुदुर्गातून शिवसेनेचा उमेदवार ठरला; दीपक केसरकरांचे सुतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 03:45 PM2019-01-30T15:45:42+5:302019-01-30T16:04:32+5:30

रत्नागिरी- सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ कायमच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेला राहिलेला आहे. 2009 मध्ये राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी सध्याचे भाजपचे राज्यसभा खासदार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांना धूळ चारली होती.

Shiv Sena loksabha candidate final from Sindhudurga ratnagiri : Dipak Kesarkar | सिंधुदुर्गातून शिवसेनेचा उमेदवार ठरला; दीपक केसरकरांचे सुतोवाच

सिंधुदुर्गातून शिवसेनेचा उमेदवार ठरला; दीपक केसरकरांचे सुतोवाच

Next

मुंबई : रत्नागिरी- सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून सध्याचे खासदार विनायक राऊत यांनाच उमेदवारी देण्यात येणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय अंतिम असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. यामुळे युती झाली तरीही ही जागा भाजपकडे जाणार नसून यामुळे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना स्वबळावरच लढावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी- सिंधुदुर्गमधील राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघालेले आहे. शिवसेना-भाजपमध्ये युतीवरून संभ्रम असताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नुकतीच स्वतंत्र महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या झेंड्यावर लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. यामुळे शिवसेना-भाजपमध्ये युती होणार अशी चर्चा सुरु झाली होती. आता शिवसेनेने भाजपला 15 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. 


रत्नागिरी- सिंधुदुर्ग हा मतदारसंघ कायमच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेला राहिलेला आहे. 2009 मध्ये राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी सध्याचे भाजपचे राज्यसभा खासदार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांना धूळ चारली होती. मात्र, 2014 मध्ये निलेश राणे यांचा विक्रमी मतांनी पराभव झाला होता. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणे यांच्यावर 1,50,051 अशा जादुई आकड्यांनी विजय मिळविला होता. 2019 च्या निवडणुकीमध्ये निलेश राणे की नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवितात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार असून शिवसेनेने आधीच आपला उमेदवार जाहीर केल्याने येत्या काळात राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. 

सुरेश प्रभूंचे काय? 
शिवसेनेला केंद्रात मंत्रीपद देण्यात येणार होते. मात्र, यासाठी पंतप्रधान मोदी यांची सुरेश प्रभू यांच्या नावाला पसंती होती. तर शिवसेना अनिल देसाई यांना मंत्री बनवू इच्छित होती. यामुळे मोदींनी सुरेश प्रभू यांना भाजपमध्ये प्रवेश देत रेल्वेमंत्री पद दिले होते. यानंतर आंध्रप्रदेशमधून राज्यसभेवर पाठवत खासदारकी दिली होती. मात्र, 2019 च्या मताधिक्याच्या गणितात सुरेश प्रभू यांना भाजपकडून रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघात उभे करण्यासाठी चाचपणी करण्यात येत होती. मात्र, मतदारसंघात प्रभू यांची प्रतिमा जरी चांगली असली तरीही मतदारांशी जोडलेले नसल्याने त्या जागी नारायण राणेंची साथ घेत शिवसेनेला शह देण्याची योजना आखली होती.

Web Title: Shiv Sena loksabha candidate final from Sindhudurga ratnagiri : Dipak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.