काँग्रेसच्या इशाऱ्यावर शिवसेना नांदेड महानगरपालिकेच्या मैदानात, मुख्यमंत्र्यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 01:16 PM2017-10-09T13:16:30+5:302017-10-09T14:16:48+5:30

काँग्रेसच्या इशाऱ्यावर शिवसेना नांदेड महानगरपालिकेच्या मैदानात उतरली आहे. नांदेडमधील शिवसेना अशोक चव्हाण यांच्या तालावर नाचणारी आहे, केवळ भाजपाला पराभूत करण्यासाठीच शिवसेना...

Shiv Sena at the behest of Congress, Nanded municipal ground | काँग्रेसच्या इशाऱ्यावर शिवसेना नांदेड महानगरपालिकेच्या मैदानात, मुख्यमंत्र्यांचा घणाघात

काँग्रेसच्या इशाऱ्यावर शिवसेना नांदेड महानगरपालिकेच्या मैदानात, मुख्यमंत्र्यांचा घणाघात

नांदेड - काँग्रेसच्या इशाऱ्यावर शिवसेना नांदेड महानगरपालिकेच्या मैदानात उतरली आहे. नांदेडमधील शिवसेना अशोक चव्हाण यांच्या तालावर नाचणारी आहे, केवळ भाजपाला पराभूत करण्यासाठीच शिवसेना नांदेडमध्ये निवडणूक लढवत आहे, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. नांदेड-वाघाळा महानगपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री नांदेडमध्ये आले होते. काँग्रेसला केवळ पैसे खाण्यासाठी सत्ता हवी आहे. मात्र यावेळी काँग्रेसच्या नांदेडच्या बालेकिल्ल्यात भाजपाचं कमळ फुलेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.  
सात्यत्याने भाजपा आणि मोदींविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी प्राचारसभेदरम्यान भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. तसेच नांदेडमध्ये लढण्यासाठी भाजपाला उमेदवार मिळत नसल्याचा आरोप केला होता. दरम्यान,  भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्र सोडणाऱ्या उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट लक्ष्य केले. "नांदेडमधील शिवसेना अशोक चव्हाण यांच्या तालावर नाचणारी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या इशाऱ्यावर शिवसेना नांदेड महानगरपालिकेच्या मैदानात उतरली आहे.  केवळ भाजपाला पराभूत करण्यासाठीच शिवसेना नांदेडमध्ये निवडणूक लढवत आहे. मात्र त्यांना फारसे यश मिळणार नाही," असे मुख्यमंत्री म्हणाले. 
यावेळी नांदेड महानगरपालिकेतील सत्ताधारी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही मुख्यमंत्र्यांनी टीकेचे लक्ष्य केले." अशोक चव्हाणांनी केवळ नांदेडच्या अधोगतीचे काम केले आहे. मात्र आता काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काँग्रेसला फक्त पैसा खाण्यासाठी सत्ता हवी आहे. काँग्रेसला विकास नव्हे तर कमिशनमध्येच जास्त रस आहे," असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. 
नांदेडमध्ये प्रचार करताना उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारभारावही उद्धव ठाकरेंची टीका केली. "राज्य सरकारच्या कारभारामुळे राज्यातून विकासासोबत प्रकाशही गायब झाला आहे. अंधाराचे राज्य निर्माण झाले आहे. दुसरीकडे सरकारकडून सौभाग्य योजनेची घोषणा झाली आहे. पण आधी वीज तर द्या, असा टोला त्यांनी लगावला." सध्या गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साडे तीन वर्षांनंतर आपली शाळा आठवली आहे. असा चिमटा उद्धव यांनी काढला होता.
नांदेडमध्ये भाजपाला मदत करणारे आमदार प्रताप चिखलीकर यांच्यावरही उद्धव ठाकरेंनी नाव न घेता टीका केली," सर्वत्र सत्ता मिळवूनही भाजपाला नांदेडमध्ये उमेदवार सापडलेले नाहीत. भाजपाच्या लाटेतही केवळ शिवसैनिक म्हणून मतदारांनी तुम्हाला निवडून दिले आहे. आता नांदेडमध्ये वाघांना मत द्यायचे की बेडकांना हे तुम्ही ठरवा. शिवसेनेच्या वाघांनाच मत द्या, असे आवहनही. त्यांनी केले." तसेच राज्यातील सरकारला वाचवणारे हात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील असल्याची टीकाही त्यांनी केली. 

Web Title: Shiv Sena at the behest of Congress, Nanded municipal ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.