यवतमाळच्या वाघाडी नदीसाठी ९८५ कोटींची पुनरुज्जीवन योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 04:54 AM2018-08-10T04:54:06+5:302018-08-10T04:54:15+5:30

शाश्वत शेतीसाठी सिंचन आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने नदी पुनरुज्जीवनाचा सात वर्षीय प्रकल्प हाती घेतला

Revival Scheme of Rs.985 crores for Yavatmal's Waghadi river | यवतमाळच्या वाघाडी नदीसाठी ९८५ कोटींची पुनरुज्जीवन योजना

यवतमाळच्या वाघाडी नदीसाठी ९८५ कोटींची पुनरुज्जीवन योजना

Next

यवतमाळ : शाश्वत शेतीसाठी सिंचन आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने नदी पुनरुज्जीवनाचा सात वर्षीय प्रकल्प हाती घेतला असून त्याची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी नदीपासून करण्यात येणार आहे. बुधवारी वाघाडी पुनरुज्जीवनाच्या ९८५ कोटींच्या प्रकल्प आराखड्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली. या प्रकल्पातून नदी काठावरील साडेपाच हजार शेतकऱ्यांचे उत्पन्न पाचपट वाढविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
प्रकल्प आराखडा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून त्याबाबत काम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील वाघाडी ही महत्त्वाची नदी यवतमाळ, कळंब, घाटंजी तालुक्यातून वाहते. पैनगंगेची उपनदी असलेली वाघाडी पुढे गोदावरी नदीला जाऊन मिळते. उन्हाळ्यातील चार महिने आणि इतरही काही महिन्यांत ही नदी कोरडी पडते. ती बारमाही वाहती राहावी यासाठी इशा फाउंडेशनने काही दिवसांपूर्वी सर्व्हे करून पुनरुज्जीवनाचा आराखडा शासनास सादर केला.
ईशा फाउंडेशनचा पुढाकार
ईशा फाउंडेशनचे सद्गुरू जग्गी वासुुदेव यांनी देशभरात ‘रॅली फॉर रिव्हर’ प्रकल्प सुरू केला आहे. त्या अंतर्गतच वाघाडीचे पुनरुज्जीवन
केले जाणार आहे. त्याचा प्रकल्प आराखडा बुधवारी सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या उपस्थितीत राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांना सादर करण्यात आला. शासनाने प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखविली असून जिल्हा प्रशासनाकडे हा आराखडा पोहोचला आहे.
सरकार आणि ‘रॅली फॉर रिव्हर’ने घेतलेल्या या पुढाकाराचे राज्यपालांनी कौतुक केले आणि यवतमाळचा हा प्रकल्प संपूर्ण देशासाठी ‘मॉडेल’ ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शेतकरी कल्याण आणि पर्यावरणरक्षण याविषयी पुरोगामी धोरण ठेवून महाराष्ट्र सरकारने यात दाखविलेल्या तत्परतेची सद््गुरूंनी प्रशंसा केली.
सद््गुरूंनी भारतातील नद्यांच्या शोचनीय अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी १६ राज्यांमधून ९,३०० किमीची रॅली काढून ‘रॅली फॉर
रिव्हर’ मोहीम गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरू केली. त्यानंतर त्यांनी नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या योजनेचा आराखडा पंतप्रधानांना सादर केला. त्यानंतर
ज्या सहा राज्यांनी या मोहिमेअंतर्गत नदी पुनरुज्जीवनाचे सामंजस्य
करार केले, त्यात महाराष्ट्र पहिले
राज्य होते.
>विजय दर्डा यांचे सद्गुरू जग्गी वासुदेव यांना निमंत्रण
लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी गुरुवारी ईशा फाउंडेशनचे सद्गुरू जग्गी वासुदेव यांची भेट घेऊन प्रकल्पाबद्दल चर्चा केली. या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी आमच्यातर्फे संपूर्ण सहकार्य मिळेल, असा शब्द त्यांनी दिला. तसेच सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी एकदा यवतमाळला जरूर यावे, त्यांच्या ‘यूथ अ‍ॅण्ड ट्रूथ’ या कार्यक्रमांतर्गत यवतमाळच्या युवकांना मार्गदर्शन करावे, असे निमंत्रणही विजय दर्डा यांनी दिले.
>असा राबविला जाणार प्रकल्प
वाघाडी नदीच्या काठावर किमान एक किलोमीटर परिसरात झाडांची संख्या वाढविणार.
यात प्रामुख्याने फळझाडे लावली जाणार
पहिल्या वर्षी प्रकल्पाबाबत नदी काठावरील गावांमध्ये जनजागृती करणार
दुसºया वर्षी ३० टक्के, तिसºया वर्षी ६० टक्के आणि चौथ्या वर्षी १०० टक्के वृक्षलागवड पूर्ण करणार.
पाच वर्षांत ६० लाख फळझाडे लावली जाणार
नदी काठावरील शेतकºयांना सेंद्रिय शेतीसाठी प्रवृत्त केले जाणार
पारंपरिक पिकांपेक्षा फळशेती, सामूहिक शेती करण्यास प्रवृत्त करणार
शेतकरी उत्पादन संस्था स्थापन करून फळांची विक्री केली जाणार

Web Title: Revival Scheme of Rs.985 crores for Yavatmal's Waghadi river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी