विशेष प्रतिनिधी 
मुंबई : शासकीय नोक-यांमध्ये ‘गट - क’च्या कर्मचा-यांची भरती करताना आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या पाल्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यामुळे अडचणीत असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी आज ही माहिती दिली.
सुरुवातीला केवळ आपल्या (परिवहन) विभागापुरताच आपण असा प्रस्ताव तयार केला होता पण आता सर्वच विभागांसाठी तो लागू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणीही यानिमित्ताने पूर्ण झाली आहे. याबाबतचा शासकीय आदेश येत्या काही दिवसांत काढण्यात येईल, अशी माहिती रावते यांनी दिली.