प्रकाशक परिषदेचा विरोध अखेर मावळला

By admin | Published: February 11, 2015 04:33 AM2015-02-11T04:33:23+5:302015-02-11T04:33:23+5:30

घुमानला मराठी भाषिकांची संख्या कमी असल्याने पुस्तकांची विक्री होणार नाही, या भूमिकेवर ठाम राहून इतर प्रकाशक संमेलनाला गेले

Prakashak Parishad's opposition finally came to an end | प्रकाशक परिषदेचा विरोध अखेर मावळला

प्रकाशक परिषदेचा विरोध अखेर मावळला

Next

पुणे : घुमानला मराठी भाषिकांची संख्या कमी असल्याने पुस्तकांची विक्री होणार नाही, या भूमिकेवर ठाम राहून इतर प्रकाशक संमेलनाला गेले तर व्यावसायिक संबंध संपुष्टात येतील, असा धमकीवजा इशारा देत बहिष्काराचे शस्त्र उपसणाऱ्या राज्य मराठी प्रकाशक परिषदेने अखेर साहित्य महामंडळाशी चर्चेची कवाडे खुली केली. सकारात्मक चर्चेनंतर साहित्यिक आणि प्रकाशक एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची उपरती झाल्याने अखेर आपली जहाल भूमिका मवाळ करीत संमेलनाला असलेला विरोध आता मावळल्याचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यामुळे प्रकाशक आणि महामंडळ यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्याला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागण्यांवर महामंडळाच्या हैदराबाद येथे २८ फेब्रुवारीला होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय होणार असल्याने संदिग्धता अजूनही कायम आहे.
मराठी प्रकाशक परिषद व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य आणि प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अरूण जाखडे यांनी भूमिका मांडली. महामंडळाचे प्रकाश पायगुडे, सुनील महाजन, मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष रमेश कुंदूर, कार्यवाह अनिल कुलकर्णी, कोषाध्यक्ष अरविंद पाटकर आणि ग्रंथविक्रेते रमेश राठीवडेकर उपस्थित होते.
डॉ. वैद्य म्हणाल्या, संमेलनातील ग्रंथप्रदर्शनामुळे अनेक वादाचे मुद्दे उपस्थित झाल्याने ताणतणावाची स्थिती निर्माण झाली होती. शेवटपर्यंत प्रकाशकांसाठी चर्चेचे दरवाजे खुले राहतील, अशी महामंडळाची भूमिका होती. अखेर त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि आम्हीही झाले गेले विसरून पुढे जाण्याचे धोरण स्वीकारले. प्रकाशक परिषदेने त्यांच्या मागण्यांचे निवेदनपत्र महामंडळाला दिले आहे. महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक २८ फेब्रुवारीला हैदराबाद येथे होणार असून, यामध्ये सकारात्मक निर्णय जाहीर केला जाईल. यामुळे प्रकाशक आणि महामंडळ यांच्यातील वादाला पूर्णविराम मिळाला आहे. प्रकाशकांनी महामंडळांशी संवाद साधून घेतलेला निर्णय स्वागताहार्य आहे.
प्रकाशकांची व्यावसायिकता या मुद्द्यावर अडून बसणाऱ्या व सुरुवातीला महामंडळाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या जाखडे यांनी नरमाइचे धोरण स्वीकारुन सर्वांनाच आश्चयार्चा धक्का दिला. ते म्हणाले, २८ तारखेला महामंडळाच्या बैठकीत आमच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. तरीही इतर प्रकाशकांनी घुमानला जायचे किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आमची कोणतीही हरकत नाही. भविष्यातील संमेलन व प्रकाशक यात वाद होऊ नये याकरिता काळजी घेण्याची मागणी महामंडळाला करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Prakashak Parishad's opposition finally came to an end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.