Popular Marathi celebrities on the silver screen are still far from Delhi! | रूपेरी पडद्यावरील लोकप्रिय मराठी सेलिब्रेटींना दिल्ली अजूनही दूरच!
रूपेरी पडद्यावरील लोकप्रिय मराठी सेलिब्रेटींना दिल्ली अजूनही दूरच!

- अजय परचुरे
मुंबई : नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांमधून अभिनय करणारे मराठी रूपेरी पडद्यावरील चेहरे रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असले, तरी लोकसभेत पोहोचण्यासाठी मराठी सेलिब्रेटींना आत्तापर्यंत वाटच पाहावी लागली आहे. आपल्या पडद्यावरील लोकप्रियतेतून निवडणुकीत ‘मत’परिवर्तन करण्यात हे मराठी सेलिब्रेटी कमीच पडले आहेत. दाक्षिणात्य आणि बॉलीवूडमधील कलाकार निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी होत असताना मराठी सेलिब्रेंटीच्या पदरी मात्र आत्तापर्यंत निराशाच आलेली आहे.
आत्तापर्यंत लोकसभेत एकाही मराठी सेलिब्रेटीला स्थान मिळालेलं नाही. १९९६ च्या निवडणुकीत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव शिवसेनेच्या तिकिटावर कोल्हापूरातून निवडणूक लढले. मात्र, काँॅग्रेसच्या उदयसिंगराव गायकवाड यांच्यासमोर त्यांचा पराभव झाला. १९९८ साली १२व्या लोकसभा निवडणुकीत कोकणचो अभिनयसम्राट मच्छिंद्र कांबळी यांनी राजापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र, शिवसेनेच्या सुरेश प्रभूंनी त्यांचा पराभव केला. यानंतर, थेट २०१४ साली मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी निवडणूक लढविली. मात्र, शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांच्यासमोर त्यांचीही डाळ शिजली नाही. २०१४ साली बीडमधून आम आदमी पार्टीने अभिनेते नंदू माधव आणि अहमदनगरमधून अभिनेत्री दीपाली सय्यदला लोकसभेच्या मैदानात उतरवलं होतं. मात्र, या दोघांचाही निवडणुकीत पराभव झाला.
काही दिग्गज कलाकार निवडणुकीच्या रिंगणात न उतरता राजकीय पक्षांचा प्रचार करण्यात अग्रेसर होते. दादा कोंडके यांनी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना शिवसेनेचा जोरदार प्रचार केला होता. तर ज्येष्ठ अभिनेते निळू फुले आणि सदाशिव अमरापूरकर यांनी कायम समाजवादी पक्षांचा प्रचार केला. मात्र, त्यांनीही निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी कधी उडी घेतली नाही. दाक्षिणात्य कलाकारांच्या तुलनेत मराठीतील कलाकार एकदमच फिके पडले. त्यांचा विशेष प्रभाव ना राजकारणात पडला ना सत्ता स्थापनेत. ते थेट राज्यकर्ते म्हणूनही कधी पुढे येऊ शकले नाहीत. उलट दक्षिणेतील रूपेरी पडदा गाजविलेले एम. जी. रामचंद्रन, एन. टी. रामाराव, एम. करुणानिधी, जयललिता यांनी अभिनयातून थेट राजकारणात उडी घेतली आणि ते राज्यकर्तेही झाले.
सुनील दत्त, गोविंदाने मैदान जिंकले!
मराठी कलाकार निवडणुकीत अयशस्वी होत असताना सुनील दत्त आणि गोविंदा या बॉलीवूडच्या अभिनेत्यांनी मुंबईतून मैदान मारले आहे. सुनील दत्त हे तर मुंबईतील पूर्वीच्या वायव्य (उत्तर-पश्चिम) मतदारसंघातून पाच वेळा (१९८४, १९८९, १९९१, १९९९, २००४) निवडून आलेले आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्रीही होते, तर २००४ साली अभिनेता गोविंदाने भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव करून खळबळ उडवून दिली होती.

अमोल कोल्हे जिंकणार का ?

शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर उभा राहिलेला अभिनेता अमोल कोल्हे मराठी सेलिब्रेटींचा हा दुष्काळ संपविणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. संभाजी मालिकेमुळे घरांघरांत पोहोचलेल्या अमोलला त्याच्या या लोकप्रियतेचा फायदा होतो की नाही आणि त्याच्या रूपाने लोकसभेत महाराष्ट्राचा पहिला सेलिब्रेटी पोहोचतो की नाही, हे आता पाहणं आता औतसुक्याचं ठरणार आहे.

2014 साली बीडमधून आम आदमी पार्टीने अभिनेते नंदू माधव आणि अहमदनगरमधून अभिनेत्री दीपाली सय्यदला लोकसभेच्या मैदानात उतरवलं होतं. मात्र, या दोघांचाही निवडणुकीत पराभव
झाला.


Web Title:  Popular Marathi celebrities on the silver screen are still far from Delhi!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.