पंचनामा बॉम्बस्फोटांचा!

By Admin | Published: June 17, 2017 03:26 AM2017-06-17T03:26:59+5:302017-06-17T03:26:59+5:30

१९९३ च्या मार्चमध्ये साखळी बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली. २५७ जणांना नाहक जिवाला मुकावे लागले. ७१३ जण जखमी झाले. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला

Panchnama bombings! | पंचनामा बॉम्बस्फोटांचा!

पंचनामा बॉम्बस्फोटांचा!

googlenewsNext

१९९३ च्या मार्चमध्ये साखळी बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली. २५७ जणांना नाहक जिवाला मुकावे लागले. ७१३ जण जखमी झाले. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्याला फासावरही लटकविण्यात आले. या खटल्याच्या दुसऱ्या टप्प्यात मुस्तफा डोसा, अबू सालेम, फिरोज अब्दुल रशिद खान, ताहीर मर्चंट, रियाझ सिद्दीकी, अब्दुल कयुम शेख आणि करीमुल्लाह यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. त्यामुळे टाडा कोर्टाच्या आजच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या साखळी बॉम्बस्फोटांचा घटनाक्रम, दोषींवर ठेवण्यात आलेले आरोप आणि निकाल जाहीर झाल्यानंतर उमटलेल्या प्रतिक्रियांचा आढावा...

कही खुशी, कही गम
१९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींना शिक्षा देण्यासाठी तब्बल २४ वर्षे लागली. न्यायालयाने अवघ्या सव्वा तासात सहा जणांच्या दहशतवादी कृत्याचा पाढा वाचत त्यांना दोषी ठरवले. तर एकाची सुटका केली. कोर्ट रुमध्ये हसत प्रवेश करणाऱ्या आरोपींचे चेहरे निकाल लागल्यानंतर पडले होते. त्यांच्या नातेवाईकांना रडू आवरेना. तर सुटका केलेल्या कय्युमच्या चेहरऱ्यावरील हसू कायम राहिले.

मुख्य आरोपी आणि त्यांच्यावरील आरोप
मुस्तफा डोसा :
मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी चार पथके नियुक्त करण्यात आली. त्यातील एका पथकाचा मुस्तफा डोसा मुख्य होता. शस्त्रे, आरडीएक्स, एके-५६, हँड ग्रेनेड, डिटोनेटर्स इत्यादींचे स्मगलिंग केले. मुस्तफा डोसाने टायगर मेमन आणि छोटा शकीलच्या मदतीने पाकिस्तान व भारतात तरुणांना शस्त्र चालवण्याचे व स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण दिले. शस्त्रे चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी देशातील काही तरुणांना दुबईद्वारे पाकिस्तानमध्ये पाठवले. तसेच या बॉम्बस्फोटासंदर्भात पनवेल व दुबईत झालेल्या सर्व बैठकांना उपस्थिती लावली. विशेष न्यायालयाने डोसाला बॉम्बस्फोटाचा कट रचल्याप्रकरणी, हत्या व आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांखाली दोषी ठरवले. तसेच टाडा, शस्त्रास्त्रे कायदा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणीही दोषी ठरवले.
अबू सालेम :
जानेवारी १९९३मध्ये अबू सालेम एका फरारी आरोपीसह गुजरातमध्ये भरूचला गेला. तेथून त्याने शस्त्रे, १०० हँड ग्रेनेड आणि काही बंदुकीच्या गोळ्या घेतल्या. एका व्हॅनमधून हे सर्व सामान मुंबईत आणले. त्यातील काही शस्त्रे आणि स्फोटके त्याने बॉलीवूड अभिनेता संजय दत्तच्या घरी ठेवली आणि दोन दिवसांनी परत घेतली. सालेमलाही कट रचणे, हत्या व आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांखाली दोषी ठरवले. टाडा कायदा, शस्त्रास्त्रे कायदा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणीही दोषी ठरवले आहे.
ताहीर मर्चंट-ताहेर टकल्या :
दाऊद आणि टायगर मेमनचा खास. बाबरी मशीद पाडल्यानंतर त्याचा बदला घेण्याचे ताहीरनेच दाऊद व मेमनच्या मनावर बिंबवले. बॉम्बस्फोटासंदर्भातील दुबईतील बैठकीत ताहीर उपस्थित होता. भारतात बेकायदा शस्त्रास्त्रांचा कारखाना सुरू करण्यासाठी त्याने निधीची जमवाजमव केली होती. विशेष न्यायालयाने त्यालाही कट रचल्याप्रकरणी, हत्या, टाडा व अन्य कायद्यांतर्गत दोषी ठरवले.
रियाझ सिद्दिकी :
भरूचवरून मुंबईत शस्त्रे, स्फोटके पाठवण्यासाठी सालेमला पांढऱ्या मारुती व्हॅनची व्यवस्था करून दिली. विशेष न्यायालयाने याला केवळ टाडा अंतर्गत दोषी ठरवले आहे.
फिरोज अब्दुल रशीद खान :
मुस्तफा डोसा व त्याचा भाऊ मोहम्मद डोसाचा अतिशय जवळचा. आरडीएक्स, शस्त्रे व स्फोटके दिगी व शेखाडी बंदरावर उतरवण्यापूर्वी मुस्तफा डोसाने फिरोजला भारतात पाठवून तेथील कस्टम व पोलीस अधिकाऱ्यांना सामान उतरवण्याचा दिवस व वेळ कळवली. संबंधित अधिकाऱ्यांना त्यासाठी लाचही दिली. दुबईतील बैठकीतही तो हजर होता.
करीमुल्ला शेख :
करीमुल्ला शेखने त्याच्या मित्राला शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानमध्ये पाठविले. त्यानंतर त्याला मुंबईत शस्त्रे आणि आरडीएक्स आणण्यासाठी मदत केली. मुख्य सूत्रधार व फरारी आरोपी टायगर मेमनबरोबर खानने काम केले आहे.
अब्दुल कय्युम :
कय्युमवरील आरोप सरकारी वकील सिद्ध करू शकले नाहीत. त्याची एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका करण्यात आली.

फरारी आरोपी
१९९३ बॉम्बस्फोटांप्रकरणी ३३ जण फरारी आहेत. त्यात दाऊद इब्राहिम, अनिस इब्राहिम, टायगर मेमन आणि मोहम्मद डोसा यांचा समावेश आहे.

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट - घटनाक्रम :-
१२ मार्च १९९३ : एका तासात संपूर्ण मुंबई १२ बॉम्बस्फोटांनी हादरली.
४ नोव्हेंबर १९९३ : या बॉम्बस्फोटांप्रकरणी १८९ जणांवर १० हजारपेक्षा अधिक पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात संजय दत्तचाही समावेश होता.
१९ नोव्हेंबर १९९३ : केस सीबीआयकडे वर्ग करण्यात आली.
१९ एप्रिल १९९४ : खटल्यास सुरुवात झाली.
३० जून १९९४ : मोहम्मद जमील आणि उस्मान झनकानान हे दोन्ही आरोपी ‘माफीचे साक्षीदार’ झाले.
२९ मार्च १९९६ : प्रमोद दत्ताराम कोदे यांची विशेष टाडा न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
१२ सप्टेंबर २००६ : टाडा न्यायालयाने निकाल जाहीर केला. मेमन कुटुंबातील चार जणांना दोषी ठरवत, तीन जणांची सुटका केली. १२ जणांना फाशीची शिक्षा आणि २० जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
नोव्हेंबर २००६ : संजय दत्तलाही आर्म्स अ‍ॅक्टअंतर्गत दोषी ठरवले. तर टाडा कायद्यांतर्गत त्याची सुटका करण्यात आली.
१ नोव्हेंबर २०११ : संजय दत्त, अन्य १०० जण आणि राज्य सरकारने केलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली.
३० जून २०१५ : याकूब मेमनला फाशी देण्यास काही तास शिल्लक असताना दोन वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा अर्ज केला. १४ दिवस त्याच्या फाशीला स्थगिती द्यावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली. सर्वोच्च न्यायालयाने मध्यरात्री कामकाज सुरू करीत मेमनचा हाही अर्ज फेटाळला. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात याकूबला फाशी देण्यात आली.
२९ मे २०१७ : विशेष टाडा न्यायालयाने १६ जून रोजी ‘केस-बी’चा निकाल देणार असल्याचे जाहीर केले.

तेव्हाच न्याय मिळेल
या निकालाविषयी मी फारशी उत्सुक नाही. या सर्व आरोपींवर करदात्यांचे पैसे का खर्च केले जात आहेत? या बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिमला येथे आणण्यात येईल आणि त्याला शिक्षा होईल, तेव्हाच न्याय मिळेल.
- कमला मलकानी (सेंच्युरी बाजारामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील पीडिता)

आरोपींना फाशीची शिक्षा द्या
माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. परंतु, न्याय मिळण्यास विलंब झाला आहे. दोन-तीन वर्षात निकाल लागला असता तर न्याय मिळाल्यासारखे वाटले असते. आता दोषी ठरवलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. त्यांना कोणत्याही प्रकारची दया दाखवू नये.
- नरेश सराफ (नरेश यांनी बॉम्बस्फोटात पाय गमावला)

निकालास विलंब
२४ वर्षानंतर निकाल देण्यात येत आहे. सकारात्मक निर्णय आहे. मात्र दाऊदला भारतात आणून शिक्षा देण्यात येईल तेव्हा न्याय मिळाल्यासारखे वाटेल.
- तुषार देशमुख (सेंच्युरी बाजारामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात त्याने आई गमावली)

बाबरी मशीद पाडल्याचा बदला म्हणून बॉम्बस्फोट घडविण्यात आले, हा आमचा युक्तिवाद न्यायलयाने मान्य केला. पीडितांना न्याय मिळाला.
- दीपक साळवी (विशेष सरकारी वकील)

माझी बॉम्बस्फोट प्रकरणातून सुटका करण्यात आली, याबद्दल मला खूप आनंद आहे. ‘दोषी’ चा कलंक लागण्यापासून वाचलो.
- अब्दुल कय्युम

Web Title: Panchnama bombings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.