Only if the Marathi man persists, Marathi language will be reserved - Raj Thackeray | महाराष्ट्राची स्थिती बिघडली असताना मराठी साहित्यिक गप्प का ? - राज ठाकरे

सांगली : मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणून आता चर्चा होत आहेत. मात्र मराठी भाषेअगोदर मराठी माणूस टिकला पाहिजे. जर आजची परिस्थिती निघून गेली, तर पश्चाताप करण्याशिवाय काहीही राहणार नाही, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी औदुंबर (जि. सांगली) येथे व्यक्त केले. औदुंबर साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते.

ते म्हणाले की, क-हाडमध्ये १९७५मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दुर्गाताई भागवत होत्या. त्यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तरीही दुर्गाताई भागवतांनी आणीबाणीवर सडेतोड टीका केली. परिस्थिती काहीही असली तरी, तुमची भूमिका महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या सध्याच्या बिघडलेल्या परिस्थितीबाबत साहित्यिक कोणतीही भूमिका मांडताना दिसत नाहीत. महाराष्ट्राचे भले करायचे असेल, तर अगोदर या राजकारणाच्या आणि जातीपातीच्या भिंती पाडायला हव्यात.
केवळ एक दिवस साहित्यिकांचा सन्मान करायचा, पण त्यांचे साहित्य आपण वाचणार नसू, तर साहित्य संमेलने भरवून काही फायदा आहे का? इतर राज्यात त्यांच्या भाषांप्रती असलेली आस्था महाराष्ट्रात दिसत नाही. दक्षिणेतील तीन भाषांना अभिजात दर्जा मिळाला, पण मराठीला अद्याप तो मिळाला नाही. कदाचित गुजरात भाषेला अर्ज न करताही हा दर्जा मिळू शकतो. पंतप्रधान हा देशासाठी असावा. जर पंतप्रधानांना गुजरातचा आदर असेल, तर मी महाराष्ट्राचा आदर केला तर काय बिघडले? मी माझी भूमिका घेऊनच काम करणार.

सद्भावना मनापासून असावी लागते!
राज ठाकरे यांनी सांगलीतील सद्भावना रॅलीचाही समाचार यावेळी घेतला. ते म्हणाले, सांगलीत म्हणे सद्भावना रॅली काढली गेली. अशा रॅल्या काढून सद्भावना निर्माण होत नसते, तर त्यासाठी सद्भावना मनातून निर्माण व्हावी लागते. संयोजकांनी मला त्यात सहभागी होण्याची विनंती केली. मी त्यांना लगेच सांगितले, माझा सहभाग तुम्हाला पेलणार नाही.


Web Title: Only if the Marathi man persists, Marathi language will be reserved - Raj Thackeray
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.