राज्यात ऑनलाइन पशुधन गणना ; गोवंश, म्हशींच्या संख्येत घट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 07:00 AM2019-05-16T07:00:00+5:302019-05-16T07:00:02+5:30

पशुसंवर्धन हा शेतीवर अवलंबून असणा-या कुटुंबाला आर्थिक उत्पन्न देणारा महत्वाचा व्यवसाय आहे.

Online livestock counting in the state; Decrease in number of cow, buffaloes | राज्यात ऑनलाइन पशुधन गणना ; गोवंश, म्हशींच्या संख्येत घट

राज्यात ऑनलाइन पशुधन गणना ; गोवंश, म्हशींच्या संख्येत घट

Next
ठळक मुद्देपशुसंवर्धन विभागाचे ८९.१४ टक्के पशुगणनेचे काम पूर्ण राज्यातील काही पाळीव पशुंच्या संख्येत २०१२ च्या तुलनेत घटकेंद्र शासनाच्या सुचनेनुसार १ ऑक्टोबर २०१८ पासून विसावी पशुगणना

पुणे: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्याच्या पशुसंवर्धन विभागातर्फे ऑनलाईन पध्दतीने पाळीव पशुंच्या गणनेचे काम केले जात आहे. गेल्या पाच वर्षात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीसह इतर कारणांमुळे राज्यातील काही पाळीव पशुंच्या संख्येत २०१२ च्या तुलनेत घट झाली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागातील सूत्रांनी दिली. 
 पशुसंवर्धन हा शेतीवर अवलंबून असणा-या कुटुंबाला आर्थिक उत्पन्न देणारा महत्वाचा व्यवसाय आहे.त्यामुळे शासनातर्फे दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. पहिली पशुगनणा १९१९-२० मध्ये घेण्यात आली होती.तर महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर १९६१ मध्ये नववी पशुगणना ब्युरो ऑफ इकोनॉमिक्स व स्टॅटिस्ट्क्स यांच्या मार्फत घेण्यात आली होती. तर १९७८ पासून पशुसंवर्धन विभागामार्फत पशुगणना घेतली जात आहे. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार १ ऑक्टोबर २०१८ पासून विसावी पशुगणना केली जात असून पशुगणनेचे ८९.१४ टक्के काम पूर्ण झाले आहे.
पशुसंवर्धन विभागातर्फे विसाव्या पशुगणनेत पशुवर्गाची प्रजाती निहाय माहिती संकलित केली जात असून एकूण १५ पाळीव प्राण्यांची गणना केली जात आहे. प्रामुख्याने गाई-बैल (देशी,विदेशी,संकरीत ) म्हशी व रेडे, मेंढरे (देशी,विदेशी,संकरीत ) शेळ्या, डुकरे, घोडे, खेचर, गाढवे, उंट, कुत्रे, हत्ती,ससे यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.त्याचप्रमाणे कोंबड्या, कोंकडे, बदके, क्लेव, टर्की, इमू आदी पक्षांचीही गणना करण्यात आली.
पशुसंवर्धन विभागाने २०१७ मध्ये पशुगणना करणे अपेक्षित होते. परंतु,केंद्र शासनाने देशात एकाच वेळी आॅनलाईन पध्दतीने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्राणी गणनेचे काम सुरू केले. त्यासाठी प्रत्येक गावात/वार्डात प्रत्यक्ष भेटी देवून घरोघरी असणा-या पशुंची गणना केली आहे. त्यासाठी राज्यात एकूण ७ हजार १२६ टॅबलेटस् खरेदी करण्यात आले.तसेच ग्रामीण भागात ४ हजार ५०० कुटुंबास एक प्रगणक व शहरी भागात ६ हजार कुटुंबास एक या पध्दतीने गाव व वार्डामध्ये जावून माहिती जमा केली आहे. परंतु,पशुगणनेचे दहा टक्के काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
पशुगणना करण्याची पशुसंवर्धन विभागातर्फे २००७ मध्ये आणि २०१२ मध्ये प्राणी गणना करण्यात आली होती. त्यात ९ ते १० टक्के पाळीव पशुमध्ये घट झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच २०१२ पासून सुमारे दोन ते तीन वर्ष राज्यात पडलेला दुष्काळ,सततची पाणी टंचाई, चारा पिके सोडून नगदी पिके घेण्याचे वाढलेले प्रमाण, शेतीत काम करण्याबाबत तरूणाईमध्ये असणारी उदासिनता आदी कारणांमुळे काही पाळीव पशुंची संख्या कमी झाली आहे,असेही सूत्रांनी सांगितले.
----------------------------
राज्यात २०१२ मध्ये १४ लाख ४४ हजार ६५९ दुभत्या गाई ,५ लाख ९३ हजार आटलेल्या गाई आणि ७७ हजार १२८ एकदाही न व्यालेल्या गाई अशा एकूण २१ लाख १४ हजार ८५१ संकरीत गाई होत्या.तर ३२ लाख ४० हजार गावठी गायी होत्या.त्याचप्रमाणे २१ लाख ६१ हजार ९९० दुभत्या म्हशी,१० लाख ९ हजार ४८५ आटलेल्या म्हशी १ लाख ४८ हजार ७३४ एकदाही न व्यालेल्या म्हशी अशा एकूण ३३ लाख २० हजार २०९ म्हशी होत्या. त्यात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Online livestock counting in the state; Decrease in number of cow, buffaloes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.