एकीकडे टोल सुरू.. अन् दुसरीकडे बाजारपेठ बंद

By admin | Published: September 28, 2016 11:44 PM2016-09-28T23:44:25+5:302016-09-28T23:58:13+5:30

महाबळेश्वरात नागरिकांचा मोर्चा : वन व्यवस्थापन समितीच्या ‘टोल’ वसुलीला कडाडून विरोध; आंदोलन करण्याचा इशारा

On one hand, the toll is on | एकीकडे टोल सुरू.. अन् दुसरीकडे बाजारपेठ बंद

एकीकडे टोल सुरू.. अन् दुसरीकडे बाजारपेठ बंद

Next

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरातील नागरिकांच्या भावना धुडकावून वन विभागाने वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वेण्णा लेक येथे बुधवारपासून प्रवेश शुल्क या नावाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्तात टोल वसुली सुरू केली. या टोल वसुलीला विरोध दर्शवत स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद करून शहरात
मोर्चा काढला. तसेच तहसीलदार रमेश शेंडगे व उपविभागीय
अधिकारी दीपक हुंबरे यांना या
टोल विरोधात निवेदन देऊन टोल तत्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
गेली काही दिवसांपासून वन विभाग व महाबळेश्वर पालिकेचा टोल एकत्रिकरणावरून वाद सुरू आहे. अनेकवेळा जिल्हाधिकारी, पालकमंत्री, विधानसभा सभापती यांच्यासोबत बैठका होऊन देखील ठोस निर्णय न झाल्याने वन विभागाने पोलिस संरक्षणात बुधवारी येथील वेण्णा लेक येथे टोल वसुलीस सुरुवात केली.
वन विभागाने विविध पॉइंटवर वन व्यवस्थापन समिती स्थापन करून सुरुवातीला प्रती वाहन १० रुपयांप्रमाणे टोल वसुलीस प्रारंभ केला होता. पर्यटकांना त्याची सवय झाल्यानंतर त्यांनी प्रती व्यक्ती १० रुपये वसूल करण्यास सुरुवात
केली व या पॉइंटची देखभाल सुरू केली. त्यामुळे अनेक पॉइंटवर टोल वसुली करताना वाहनांची कोंडी होऊ लागली.
परिणामी पर्यटकांना अनेक अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे अनेकजण एकाच ठिकाणी टोल वसूल करावा, असा आग्रह धरत होते. त्याप्रमाणे वन विभाग व नगरपालिकेने एकाच ठिकाणी टोल वसूल
करावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले. परंतु या बैठकीमध्ये कोणी किती पैसे घ्यायचे यावरून एकमत झाले नाही. त्यामुळे वन विभागाने वेण्णा लेकवर आपला स्वतंत्र टोल बूथ बुुधवारी सुरू करून त्याचे उद्घाटन
उप वनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या उपस्थितीत टोल वसुली सुरू केली.
यावेळी कोणतीही अनुसूचित घटना घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तितक्याच प्रमाणात वन विभागाचे कर्मचारी वडूज, वाई, पाटण, खंडाळा या भागांतून आले होते. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.
हे वृत्त महाबळेश्वर बाजारपेठेत पसरल्याने शहरातून तीव्र संताप व्यक्त केला जाऊ लागला. दुपारी साडेबारा वाजता येथील राम मंदिरात नागरिकांची बैठक झाली. या
बैठकीत नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद करून वन विभागाच्या टोल विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच महाबळेश्वर पोलिस स्टेशन येथे उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक हुंबरे यांना नागरिकांनी मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर तहसीलदार रमेश शेंडगे
यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये वन विभागाने जबरदस्तीने सुरू केलेल्या वेण्णा लेक
येथील टोल तत्काळ थांबविला नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या मोर्चामध्ये नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांच्यासह नगरसेवक संदीप साळुंखे, कुमार शिंदे, संतोष (आबा) शिंदे, अफझल सुतार, अर्बन बँकेचे संचालक समीर सुतार, अतुल सलागरे, माजी नगरसेवक रवींद्र्र कुंभारदरे, सलीम बागवान, सूर्यकांत शिंदे, सुनील शिंदे, विशाल तोष्णीवाल, भाजप शहराध्यक्ष सनी उगले, टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र्र हिरवे, चंद्रकांत बावळेकर, हॉर्स अ‍ॅण्ड पोनी असोसिएशनचे अध्यक्ष जावेद खारकंडे, प्रशांत आखाडे, तौफिक पटवेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

महाबळेश्वर वेण्णा लेक येथे पर्यटकांना टोल वसुलीसाठी थांबविले असता पर्यटकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. वेगवेगळ्या ठिकाणी टोल घेऊन नागरिकांची प्रशासन लूट करत आहे. येथील रस्त्यांची दुरवस्था व इतर सुविधा न देता केवळ पैसे वसूल करणे योग्य नाही. महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही जागतीक दर्जाजी पर्यटनस्थळे असून येणाऱ्या पर्यटकांना मूलभूत सुविधा पुरविणे अत्यंत गरजेचे आहे.
- नितीन पांड्या,
पर्यटक, पुणे


कडेकोट पोलिस बंदोबस्त
वेण्णा लेक येथे नव्याने सुरू होणाऱ्या टोल नाक्यावरून शहरातून कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी वन विभागाने मोठा फौजफाटा जमा केला होता. वन विभागाचे महाबळेश्वर, वाई, खंडाळा, पाटण येथून कर्मचारी मागवून तैणात केले होते. तर पोलिस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैणात करण्यात आला होता. उपविभागीय अधिकारी दीपक हुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर पोलिस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने, वाईचे पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, पाचगणीचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्यासह महाबळेश्वर येथील पोलिस कर्मचारी उपस्थित होते. याचबरोबर दंगा नियंत्रण पथकाची सहा वाहने या ठिकाणी तैणात करण्यात आली होती.


बाजारपेठेत शुकशुकाट
वन व्यवस्थापन समितीच्या टोल वसुलीला विरोध दर्शवत बुधवारी महाबळेश्वरातील मुख्य बाजारपेठ व्यापाऱ्यांनी बंद ठेवली. या बंदला दुकानदार, हॉटेल व्यावसायिक तसेच लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदमुळे बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट पसरला होता. सायंकाळीही अशीच परिस्थिती होती.

Web Title: On one hand, the toll is on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.