‘आघाडी’ झाली तरी ‘युती’ नाहीच! - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 04:32 AM2018-05-07T04:32:24+5:302018-05-07T04:32:24+5:30

विधान परिषदेच्या सहा जागांपैकी तीन जागांवर शिवसेनेने उमेदवार दिले आहेत. उर्वरित ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. ही निवडणूक वेगळी असल्याने हा फॉर्म्युला वापरण्यात आला असला तरी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मात्र असा फॉर्म्युला राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला आहे.

No Alliance With BJP For Lok Sabha Election - Uddhav Thackeray | ‘आघाडी’ झाली तरी ‘युती’ नाहीच! - उद्धव ठाकरे

‘आघाडी’ झाली तरी ‘युती’ नाहीच! - उद्धव ठाकरे

Next

नाशिक  - विधान परिषदेच्या सहा जागांपैकी तीन जागांवर शिवसेनेने उमेदवार दिले आहेत. उर्वरित ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. ही निवडणूक वेगळी असल्याने हा फॉर्म्युला वापरण्यात आला असला तरी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मात्र असा फॉर्म्युला राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली तरी शिवसेना स्वबळावरच निवडणूक लढविणार, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
उत्तर महाराष्ट्रातील पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, या प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्याने आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे. परंतु देशात समुद्रकिनारा नसलेल्या सात ठिकाणी रिफायनरी प्रकल्प आहेत. त्यामुळे कोकणात प्रकल्प सुरू करण्याचा संबंध येत नाही. मुळात भाजपाचे आमदार देशमुख यांनी माझी भेट घेऊन हा प्रकल्प विदर्भात नेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या पक्षाच्या अन्य आमदारांनीदेखील मागणी केली असल्याने हा प्रकल्प विदर्भात न्यावा, असा सल्ला ठाकरे यांनी दिला. विदर्भाचा विकास करू असे म्हणून विकास होणार नाही, तर तेथे अशाप्रकारचे उद्योग आणून विकास केला पाहिजे असेही ते म्हणाले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मिळालेला जामीन आणि भाजपाचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मिळालेली क्लीन चीट यावर मात्र ठाकरे बोलले नाहीत. जे घडले ते सर्वांसमोर आहे, त्यात काय भूमिका असणार, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

वनगा यांना उमेदवारी देण्याची तयारी : डहाणू येथील भाजपाचे माजी खासदार चिंतमन वनगा यांच्या कुटुंबीयांनी भाजपाने दिलेल्या वागणुकीमुळे शिवसेनेत प्रवेश केला आहे. आदिवासी भागात हिंदुत्व रुजवणाऱ्या वनगा कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना उभी राहील. वनगा यांच्या मुलांपैकी कोणी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी करण्याची तयारी दर्शविल्यास शिवसेना त्यांच्याबरोबर राहील, असेही ठाकरे म्हणाले.

कर्नाटकातील मराठी भाषिकांना आवाहन

कर्नाटक निवडणुकांबाबत बोलताना नावातच कर नाटक आहे, त्यामुळे काय बोलायचे अशी शाब्दिक कोटी करून ठाकरे यांनी कर्नाटकच्या सीमाभागातील मराठी मतदारांनी मतभेद न बाळगता एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

मोदींना सांगा, ते समुद्रही आणतील!
तेल रिफायनरीचा प्रकल्प समुद्रकिनारीच असावा म्हणून विदर्भात नेता येत नसेल, तर नरेंद्र मोदींना सांगा; ते पाच मिनिटांत विदर्भात समुद्र आणतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. अलीकडे तर रजनीकांतही मोदींना घाबरतो. अर्थात, मी गमतीने म्हणतोय नाहीतर उद्या माझ्यात आणि रजनीकांतमध्ये वाद व्हायचा असेही ते मिश्कीलपणे म्हणाले. रिफायनरी समुद्रकिनाºयाशिवाय होऊ शकत नाही असे मुख्यमंत्र्यांचे मत असेल तर त्यावर कार्यशाळा घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

Web Title: No Alliance With BJP For Lok Sabha Election - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.