मुंबई - मालाड पश्चिमेचे मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर अनधिकृत फेरीवाल्यांकडून जीवघेणा हल्ला झाला. त्यानंतर मनसेनं फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता मनसेच्या या आंदोलनाला काँग्रेसचे आमदार नितेश राणेंची साथ मिळाली आहे.

काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे प्रमुख नितेश राणे हेसुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. एका मराठी माणसाला फेरीवाल्यानं मारणं कदापि सहन करणार नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा का असेना,”, असे म्हणत नितेश राणेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांची पाठ थोपटली आहे. मुंबई काँग्रेस पक्ष हा दिवसेंदिवस उत्तर भारतीयांचा पक्ष होत चाललाय. काँग्रेसला मराठी माणसाची मते चालतात, पण मराठी माणूस चालत नाही, अशी टीकाही नितेश राणे यांनी संजय निरुपम यांच्यावर केली आहे. काय आहे प्रकरण?

मालाड पश्चिम येथे फेरीवाल्यांना दिलेल्या भेटीदरम्यान संजय निरुपम बोलले होते की, 'फेरीवाल्यांविरोधातील कारवाई ही पालिका प्रशासन, फडणवीस सरकार आणि मनसे यांची मिलीभगत आहे. माझे पोलिसांना सुद्धा सांगणे आहे की, या गरीब फेरीवाल्यांना जर कोणी मनसेचे फालतू गुंड त्रास देत असतील, दादागिरी करत असतील, तर त्यांना अडवा. त्यांच्यावर कठोर कारवाई करा. जर या गरीब फेरीवाल्यांना पोलिसांचे संरक्षण मिळाले नाही, त्यांना जर मारहाण होत राहील. तर ते कायदा हातात घेतील. रस्त्यावर उतरतील, मग कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडेल आणि त्याची जबाबदारी फक्त तुमच्यावर असेल'. 
एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट रेल्वे स्टेशनपर्यंत मोर्चा काढून रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती.  ही डेडलाइन संपल्यानंतर ठाणे, कल्याणसह अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलने आंदोलन सुरु केलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासही सुरुवात केली होती. राज ठाकरे यांनी मात्र फेसबुकच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांचं समर्थन केलं होतं. जिथे जिथे अन्याय, गैरप्रकार दिसेल तिथे महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं होतं.
दरम्यान राज ठाकरे यांनी आज कल्याण, डोंबिवली शहरातील  विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांची महापालिकेत जाऊन भेट घेतली. शहरातील विविध मुद्यांवरुन यावेळी राज ठाकरे यांनी आयुक्तांना फैलावर धरले.  फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक परिणामकारकपणे होण्यासाठी आपण स्वतः जातीने लक्ष घातले पाहीजे. केवळ खालील अधिकाऱ्यांवर ती जबाबदारी सोपवून फेरीवाले हटणार नाहीत, असं सांगत ही शहरं आपल्याला साफ हवीत की नको? शहर स्वच्छ कधी करणार?, असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी आयुक्तांना विचारला. तसेच कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाल्यांविरोधात कारवाई का होत नाही, असा सवालही यावेळी त्यांनी आयुक्तांना विचारला. फेरीवाल्यांना जास्तीत जास्त दंड आकाराल्यास त्यांचे वारंवार बसणे कमी होईल. रेल्वेने रेल्वेच्या हद्दीत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार महापालिकेनं महापालिकेच्या हद्दीत कारवाई करावी,अशी मागणीही यावेळी राज ठाकरे यांनी आयुक्तांकडे केली. सोबत, रेल्वेची हद्द आणि पालिकेची हद्द एकदाच निश्चित करण्याचीही मागणीही राज यांनी केली.