नाशिकमध्ये २६५ ग्रॅम एमडी ड्रग जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:31 PM2018-05-16T15:31:49+5:302018-05-16T15:31:49+5:30

नाशिक : २०१५ मध्ये बंदी घातलेला एमडी हा घातक अंमलीपदार्थ नाशिकमध्ये विक्री करण्यासाठी येणाऱ्या तिघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने बुधवारी (दि़१६)पहाटे पाथर्डी रोडवर सापळा लावून अटक केली़ रणजित गोविंदराव मोरे (३२,रा़२०५, सी विंग, हरीविश्व सोसायटी, पाथर्डी फाटा), पंकज भाऊसाहेब दुंडे (३१ रा. वृंदावन नगर, त्र्यंबक हौसिंग सोसायटी, आडगाव शिवार) व नितीन भास्कर माळोदे (३२, रा. श्रीसाई रो हाऊस नंबर २, वृंदावन नगर, जत्रा हॉटेल जवळ) अशी या तिघांची नावे आहेत़

Nashik,police,MD,drug,seized | नाशिकमध्ये २६५ ग्रॅम एमडी ड्रग जप्त

नाशिकमध्ये २६५ ग्रॅम एमडी ड्रग जप्त

Next
ठळक मुद्देयुनिट एकची कारवाई : तिघांना संशयितांना अटकएमडी ड्रगसह साडेसोळा लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : २०१५ मध्ये बंदी घातलेला एमडी हा घातक अंमलीपदार्थ नाशिकमध्ये विक्री करण्यासाठी येणाऱ्या तिघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने बुधवारी (दि़१६)पहाटे पाथर्डी रोडवर सापळा लावून अटक केली़ रणजित गोविंदराव मोरे (३२,रा़२०५, सी विंग, हरीविश्व सोसायटी, पाथर्डी फाटा), पंकज भाऊसाहेब दुंडे (३१ रा. वृंदावन नगर, त्र्यंबक हौसिंग सोसायटी, आडगाव शिवार) व नितीन भास्कर माळोदे (३२, रा. श्रीसाई रो हाऊस नंबर २, वृंदावन नगर, जत्रा हॉटेल जवळ) अशी या तिघांची नावे आहेत़ त्यांच्याकडून ५ लाख ३० हजार रुपये किमतीचे २६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, टाटा सफारी व मोबाईल असा एकूण १५ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे़

शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांना मुंबईहून टाटा सफारी वाहनातून (एमएच १५, ईक्यु ५००५) एमडी ड्रग्ज विक्रीसाठी पाथर्डी फाट्यावरील रायबा हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार वाघ यांनी पोलिसांच्या दोन टीम तयार केल्या़ सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, सहायक पोलीस उपनिरीक्षक जाकिर शेख, पोलीस हवालदार पांडव, पोलीस नाईक दिलीप मोंढे, पोलीस शिपाई विशाल काठे, विशाल देवरे, स्वप्निल जुंद्रे, शांताराम महाले, प्रविण चव्हाण, गणेश वडजे, हेमंत कपिले शेख जाकीर अमजाद हुसेन यांचा समावेश असलेल्या पथकाने रात्री एक वाजेपासून परिसरात सापळा लावला़

रात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास पाथर्डी फाट्याकडून पाथर्डी गावाकडे जाणारी संशयित सफारी (एमएच १५, ईक्यु ५००५) वाहन जात असताना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने पलायन करण्याचा प्रयत्न केला़ या वाहनाचा पाठलाग करून हॉटेल रायबाजवळ पकडून या तिघांना ताब्यात घेतले़ पथकान संश्यितांची अंगझडती घेतली असता संशयित रणजित मोरे याच्याकडे ९० ग्रॅम एमडी अंमली पदार्थ व १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, संशयित पंकज दुंडे याच्याकडे ९० ग्रॅम एमडी अंमली पदार्थ व दोन मोबाईल तर तिसरा संशयित नितीन माळोदे याच्याकडे ८५ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ व पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल आढळून आला़ पोलिसांनी ड्रग्ज, मोबाईल व सफारी गाडी असा १५ लाख ७६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे़ या प्रकरणी पोलीस हवालदार रविंद्र बागूल यांच्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात एनडीपीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे .


संशयितांकडून उडवा-उडवीची उत्तरे
गुन्हे शाखेने अटक केलेल्या या तिघांची कसून चौकशी सुरू केली़ संशयितांना एमडी ड्रग्ज कोठून आणले, कोणाला विक्री केले जाणार होते याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़ दरम्यान, नाशिक शहरातील कॉलेजरोड परिसरात मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जची विक्री केली जात असल्याचे समोर आले असून काही वर्षांपुर्वी कॅनडा कॉर्नर परिसरात एका तरुणीचा चालत्या वाहनातून बाहेर ढकलण्यात आले होते़ या तरुणीने एमडी ड्रग्जची नशा केल्याचे समोर आले होते़


एमडी २ हजार रुपये ग्रॅम


पोलिसांनी जप्त केलेल्या या एमडी ड्रग्जी प्रतिग्रॅम दोन हजार रुपये किमत लावली असली तरी बाजारात यापेक्षा अधिक चढ्या दराने ते विकले जाते़ पोलिसांनी ड्रग्ज जप्त केल्यानंतर तत्काळ न्याय प्रयोग शाळेच्या वैज्ञानिक सहाय्यक प्रतिमा गोसावी यांना पाचारण करण्यात आले होते़ त्यांनी जप्त केलेले एमडी ड्रग्ज असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे सांगून प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमूने ताब्यात घेतले आहेत़

Web Title: Nashik,police,MD,drug,seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.