नाशिकमधील कुख्यात टिप्पर गँगच्या नऊ जणांना मोक्कान्वये सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 05:26 PM2018-02-21T17:26:03+5:302018-02-21T20:33:07+5:30

nashik,cidco,tipper,gang,mocca,conviction | नाशिकमधील कुख्यात टिप्पर गँगच्या नऊ जणांना मोक्कान्वये सक्तमजुरी

नाशिकमधील कुख्यात टिप्पर गँगच्या नऊ जणांना मोक्कान्वये सक्तमजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देसिडकोत दहशत : टोळीवर ५७ गंभीर गुन्हेप्रत्येकी १५ लाख रुपये दंड

नाशिक : दरोडा, लूट, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न आदी प्रकारचे विविध पोलीस ठाण्यांमध्ये ५७ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या सिडकोतील कुख्यात टिप्पर गँगमधील नऊ सराईत गुन्हेगारांना बुधवारी (दि़ २१) जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ शर्मा यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) आठ वर्षे सक्तमजुुरी व प्रत्येकी १५ लाख रुपये अशी एकूण एक कोटी ३५ लाख २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ टिप्पर गँगला झालेल्या या शिक्षेमुळे गुन्हेगारांना चपराक बसणार आहे़

टिप्पर गँगचा म्होरक्या नागेश भागवत सोनवणे (२८, उपेंद्रनगर, नाशिक), समीर नासीर पठाण (२४, रा़ नंदनवन चौक, उत्तमनगर, सिडको), नितीन बाळकृष्ण काळे ऊर्फ नित्या खिचड्या (२३, राजरत्ननगर, सिडको), अनिल पंडित अहेर (२८, उत्तमनगर, सिडको), सुनील दौलत खोकले (२५, उपेंद्रनगर, सिडको), सागर जयराम भडांगे (२५, मोरे मळा, पंचवटी), सोनल ऊर्फ लाल्या रोहिदास भडांगे (२०, रामनगर, हनुमानवाडी, मोरे मळा, पंचवटी), गणेश सुरेश वाघ ऊर्फ गण्या कावळ्या (२१, मोरे मळा, पंचवटी), सुनील भास्कर अनार्थे (२६, अशोकनगर, श्रीरामपूऱ, मूळ रा़ चिंचबन, ता़ नेवासा, जि़ अहमदनगर) यांचा शिक्षा झालेल्यांमध्ये समावेश आहे, तर कृषा चत्रू पाटील (२२, पवननगर, नाशिक), नितीन भास्कर माळोदे व पंकज भाऊसाहेब दुंडे या तिघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली़ 

अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सिडकोतील भोळे मंगल कार्यालयाजवळील यश आर्केडच्या गाळा नंबर ५ व ६ मधील शिल्पा स्ट्रॉक ब्रोकर प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयात २७ सप्टेंबर २०१२ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास टिप्पर गँगने नियोजनबद्धरीत्या शस्त्रास्त्रासह दरोडा टाकून एक कोटी तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लुटून नेली होती़ टिप्पर गँगमधील अनिल आहेर व सुनील खोकले यांनी फिर्यादी मुकुंद निंबा मांडगे यांच्याकडे जमिनीच्या व्यवहारासाठी येणाºया मोठ्या रकमेबाबत गँगचा म्होरक्या गणेश वाघ ऊर्फ गण्या कावळ्या यास माहिती दिल्यानंतर पंचवटीतील मोरे मळ्यात दरोड्याचा कट रचण्यात आला़ यानंतर टिप्पर गँगने मांडगे व त्यांच्या साथीदारास पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवत गावठी पिस्तुलाने एक राउंड फायर करून ही रक्कम लुटून नेली होती़ 

अंबड पोलीस ठाण्यात या लूट प्रकरणी मुकुंद मांडगे यांच्या फिर्यादीनुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ अंबड पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण बोरकर यांनी या टोळीतील गँगविरोधात दाखल विविध पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांची माहिती मागवून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) लावण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली होती़ त्यानुसार पोलीस आयुक्तांनी ५ नोव्हेंबर २०१२ रोजी मोक्का लावला होता़ न्यायाधीश शर्मा यांच्या न्यायालयात मोक्कान्वये सुरू असलेल्या या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. सुधीर कोतवाल यांनी ३३ साक्षीदार तपासून आरोपींविरोधात सबळ पुरावे सादर केले़ 

न्यायाधीश शर्मा यांनी आरोपींना दरोडा टाकणे, कट रचणे, आर्म्स अ‍ॅक्ट व मोक्का कायद्यान्वये दोषी धरून आठ वर्षे सक्तमजुुरी व प्रत्येकी १५ लाख रुपये असा एकूण एक कोटी ३५ लाख २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी एक वर्षाची शिक्षा सुनावली़ आरोपींना शिक्षा मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयातील प्रॉस्युकेशन सेलचे अधिकारी, पैरवी कर्मचारी, अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी परिश्रम घेतले़


टिप्परची दहशत
शहरातील विविध ५७ गुन्ह्यांमध्ये टिप्पर गँगचा सहभाग असल्याची गुन्ह्यांची जंत्रीच पोलिसांनी न्यायालयात सादर केली़ या गँगमधील गणेश वाघ ऊर्फ गण्या कावळे याच्यावर ३१, गँगचा म्होरक्या नागेश सोनवणे (१०), सुनील अनर्थे (१५) असे गुन्हे आहेत़  जिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा न्यायालयात पोलीस अधिकारी यांच्यावर आरोपी समीर पठाण याने हल्ला केला, तर शिवसेनेचे नगरसेवक  सुधाकर बडगुजर यांच्यावर गण्या कावळ्या याने हल्ला केला होता़ विशेष म्हणजे, या गँगने नाशिकरोड कारागृहातही धुडगूस घातल्याने त्यांना वेगवेगळ्या कारागृहांमध्ये हलविण्यात आले होते़ 


मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या खटल्याचे कामकाम जलद गतीने करण्यात आले़ या गँगच्या दहशतीमुळे साक्षीदार न्यायालयात येण्यासाठी घाबरत होते़ गँगचा म्होरक्या नागेश सोनवणे याने पोलिसांकडे दिलेला कबुलीजबाब व पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपींना शिक्षा सुनावली़ सोनवणेचा कबुलीजबाब हा महत्वाचा पुरावा ठरला़ गुंडाविरोधात साक्ष देण्यासाठी सामान्य नागरिकांनी पुढे येणे तसेच पोलिसांनीही न्यायाच्या दृष्टीने वागणे गरजेचे आहे़
- अ‍ॅड़ सुधीर कोतवाल, सरकारी वकील़

Web Title: nashik,cidco,tipper,gang,mocca,conviction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.