अद्रकवरील ‘सॉफ्ट रॉट’वर नॅनो टेक्नॉलॉजीने मात, पुढील टप्प्यात फळे, भाज्या, मानवी आजारांवर शोधणार उपाय  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 07:28 PM2019-02-01T19:28:23+5:302019-02-01T19:28:54+5:30

अद्रकावरील ‘सॉफ्ट रॉट’ या किडीचा प्रादुर्भाव नॅनो टेक्नॉलॉजीने रोखण्याच्या संशोधनात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे जैवतंत्रज्ञान विभागाचे निवृत्त अधिष्ठाता आणि यूजीसीचे फॅकल्टी फेलो महेंद्रकुमार राय यांना यश आले आहे. 

Nano Technology on Soft Route at Asrcor, Next Steps to Find Facts, Vegetables, and Human Illness | अद्रकवरील ‘सॉफ्ट रॉट’वर नॅनो टेक्नॉलॉजीने मात, पुढील टप्प्यात फळे, भाज्या, मानवी आजारांवर शोधणार उपाय  

अद्रकवरील ‘सॉफ्ट रॉट’वर नॅनो टेक्नॉलॉजीने मात, पुढील टप्प्यात फळे, भाज्या, मानवी आजारांवर शोधणार उपाय  

Next

 - गणेश वासनिक 

अमरावती  - कृषिक्षेत्रात रासायनिक खते व कीटकनाशकांऐवजी नॅनो टेक्नॉलॉजीच्या प्रसारावर भर दिला जात आहे. या दृष्टीने पहिल्या टप्प्यात अद्रकावरील ‘सॉफ्ट रॉट’ या किडीचा प्रादुर्भाव नॅनो टेक्नॉलॉजीने रोखण्याच्या संशोधनात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे जैवतंत्रज्ञान विभागाचे निवृत्त अधिष्ठाता आणि यूजीसीचे फॅकल्टी फेलो महेंद्रकुमार राय यांना यश आले आहे. 

नॅनो टेक्नॉलॉजीवरील संशोधनाचा पुढील टप्पा मानवी आरोग्याशी निगडित रोगांवर नॅनो टेक्नॉलॉजीद्वारे उपाययोजनांवर केंद्रित केला आहे. त्यासाठी भारताने सन २००९ पासून सात देशांसोबत नॅनो टेक्नॉलॉजीवरील संशोधनासाठी सामंजस्य करार केला आहे. यामध्ये ब्राझील, अर्जेंटिना, स्वित्झरलँड, जर्मनी, इटली, स्पेन, पोलंड, चेक रिपब्लिक या देशांचा समावेश आहे. तेथील संशोधक वेळोवेळी माहितीचे आदान-प्रदान करीत आहेत. ब्राझील येथील कॅथिनाल विद्यापीठाचे प्रा. नेस्लन दुराण यांनी या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली आहे. 

दरम्यान, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रयोगशाळेत अद्रकवरील ‘सॉफ्ट रॉट’वर नॅनो टेक्नॉलॉजीने मात करण्याबाबत सन २०१७ पासून संशोधन केले जात होते. अर्जेटिना येथे जाऊन त्यासंबंधी प्रयोग केल्याची माहिती महेंद्रकुमार राय यांनी दिली. या संशोधनासाठी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांचे भरीव सहकार्य मिळाले. कर्नाटक येथील शेतकरी टॉम यांच्या शेतातील मातीपरीक्षण करण्यात आले. या संशोधनासाठी अनिकेत गादे यांचादेखील सहभाग आहे. पुढील वर्षी अद्रकवरील रोगावर अकोला कृषी विद्यापीठ आणि छिंदवाडा येथील कृषी विद्यापीठात संशोधन के ले जाणार आहे.

गंभीर आजारावरही उपायकारक
विविध रोग, आजार लवकर बरे होण्यासाठी मनुष्य अँटिबायोटिक औषध घेतात. मात्र, ही मानवी आरोग्यास अतिशय धोकादायक बाब आहे. पेनिसिलीन, अ‍ॅमॉक्स या एकेकाळच्या तात्काळ परिणामकारक औषधांचा प्रभाव संपुष्टात आल्याचे वास्तव आहे. याला मल्टी ड्रग रेजिस्टेंस असे म्हटले जाते. नॅनो टेक्नॉॅलॉजीच्या माध्यमातून प्रतिरोधक क्षमता निर्माण करता येते. चांदीमध्ये नॅनो पार्र्टिकल्स असून, त्यास बुलेटप्रमाणे  वापर करून गंभीर स्वरुपाचे आजारावरही मात करता येते, असे संशोधक हॅकाग वाँग यांनी सिद्ध केल्याचे राय यांनी सांगितले. एचआयव्ही, कॉलरादेखील बरा करता येईल, यासंदर्भात संशोधन सुरू आहे.

नॅनो जेलद्वारे बॅक्टेरियावर मात
नॅनो जेलद्वारे बॅक्टेरियावर मात करता येईल. जखमेवर हे जेल लावून प्रयोगदेखील करण्यात आला. आयरन नॅनो पार्टिकल्सद्वारे कर्करोग बरा होऊ शकतो. त्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. संत्री, सफरचंदावर जेलचे आवरण लावल्यास १५ ते २० दिवस हे फळ ताजे ठेवता येईल, असा प्रयोग करण्यात आला आहे. त्याचे पेटेंट फाइल केल्याची माहिती महेंद्रकुमार राय यांनी दिली. 

नवीन संशोधनातून प्रेरणा मिळावी. विद्यापीठानेदेखील नवसंशोधक घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. संशोधन केंद्रांचे बळकटीकरण झाले पाहिजे. त्यावेळीच मानव संसाधन वाढीस लागतील.
   - महेंद्रकुमार राय 
  फॅकल्टी फेलो, यूजीसी

Web Title: Nano Technology on Soft Route at Asrcor, Next Steps to Find Facts, Vegetables, and Human Illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.